बोगस डॉक्टरांची माहिती दडवली ; आरोग्य जन माहिती अधिकाऱ्याचा कुप्रताप !

0

खामगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

बोगस डॉक्टर शोध मोहीमे अंतर्गत शहर व तालुक्यात मुन्नाभाई डॉक्टर आढळून आल्यानंतरही अनेकांकडून चिरमिरी घेवून अभय देण्यात आल्याचा आरोप होत आहे. तर एका बोगस डॉक्टर बाबत पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिल्यानंतरही माहिती अधिकारात “त्या” बोगस डॉक्टराविषयी माहिती देण्यास आरोग्य विभागाच्या जनमाहिती अधिका­याकडून टाळाटाळ करण्यात आली आहे. बोगस डॉक्टर आढळल्यानंतरही जन माहिती अधिकाऱ्याने माहिती दडवून ठेवण्याचा कुप्रताप केला असून यामागील रहस्य काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे यांनी आपले हात ओले करुन घेतल्याने सदरचा प्रकार घडत असल्याचे बोलले जात असून या प्रकरणी वरिष्ठांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

कोरोना काळात बोगस डॉक्टरांनी गोरगरीब रुग्णांच्या अज्ञानतेचा फायदा घेवून त्यांची लुट केल्याची बाब समोर आली होती. या अनुषंगाने शासनाच्या आरोग्य विभागाने सन 2022 मध्ये राज्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जुलै 2022 मध्ये खामगांव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे यांच्या नेतृत्वात शहर व तालुक्यात ही मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये अनेक मासे गळाला लागले होते. परंतु डॉ. अभिलाष खंडारे यांनी गिळंकृत केल्याचे बोलले जात आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये काही मुन्नाभाई जवळ अॅलोपॅथी औषधांचा साठाही सापडला होता. तर एका बोगस डॉक्टराबाबत डॉ. खंडारे यांनी स्वत: शिवाजी नगर पोलीस स्टेशनला तक्रारही दिली आहे. पण जबाब न दिल्यामुळे संबंधीत बोगस डॉक्टराविरुध्द योग्य ती कारवाई होऊ शकली नाही असे तपास अधिका­याचे म्हणणे आहे. एकंदरीत गौडबंगाल पाहता प्रस्तुत प्रतिनिधीने डॉ. अभिलाष खंडारे यांना यासंदर्भात माहिती विचारली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन ताकाला तूर लागू दिली नाही व बोगस डॉक्टरांची माहिती देण्यास टाळाटाळ केली.

त्यामुळे माहिती अधिकारान्वये खामगांव तालुका आरोग्य विभागाचे जनमाहिती अधिघकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी खामगांव जनमाहिती अधिकारी यांचेकडे बोगस डॉक्टरांबाबत माहिती मागविण्यात आली होती. पोलीस विभागाने एका बोगस डॉक्टराबाबत माहिती दिली पण आरोग्य विभागाच्या जनमाहिती अधिकारी डॉ. श्रुती गांधी यांनी मात्र बोगस डॉक्टरची माहिती निरंक असल्याचे पत्र देऊन आपल्या अकलेचे तारे तोडले. विशेष बाब म्हणजे मागितलेल्या माहितीच्या विविध मुद्यांबाबत नंतर माहिती कळविण्यात येईल असे पत्रात नमुद करुन वेळ मारुन नेण्याचा प्रकार केला व प्रथम अपिल दाखल करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रकार डॉ. श्रुती गांधी (लढ्ढा) यांनी केला आहे. याबाबत संबंधिताने डॉ. गांधी यांना प्रत्यक्ष भेटून जाब विचारला असता त्यांनी कानावर हात ठेवून बोगस डॉक्टरविषयी काहीच माहिती नसल्याचे सांगीतले. तर मग डोळ्यावर पट्टी बांधून माहिती निरंक असल्याचे पत्र कसे दिले? याबाबतही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. निश्चित माहिती दडवण्याच्या प्रतापामागील बोलविता धनी डॉ. अभिलाष खंडारे असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाच्या या बोगस प्रकारामुळे बोगस डॉक्टरांचे फावत असून गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ खेळण्याचा प्रकार अजुनही सुरु आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमातून उहापोह होत असतांनाही जिल्हा प्रशासनही काहीच हालचाल कसे करीत नाही? असा सवाल सुज्ञ नागरीक करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.