उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकन कामकाजात सहभाग न घेतलेल्या शिक्षकांवर होणार कारवाई

0

जळगाव;- परीक्षेच्या कामकाजात ज्या शिक्षकांनी जाणून-बुजून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकन कामकाजात सहभाग घेतला नाही त्या शिक्षकांवर कार्यवाही करण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. १७ जानेवारी रोजी परीक्षा व मूल्यमापन मंडळाची बैठक झाली. मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील यांनी बैठकीत झालेल्या निर्णयाविषयी माहिती दिली. परीक्षेच्या कामकाजाबाबत विद्यापीठाच्या आदेशाचे पालन न करणे ही बाब महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ मधील कलम ४८(४) मध्ये नमूद तरतुदीचे उल्लंघन करणारी असून ज्या शिक्षकांनी जाणून-बुजून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकन कामकाजात सहभाग घेतला नाही, त्या शिक्षकांवर कार्यवाही करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. हिवाळी २०२३ च्या ज्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत त्यांचे फोटोकॉपी, गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन, निकाल जाहीर होण्याची संभाव्य तारीख, निकाल सुधारित होण्याचा कालावधी याबाबत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर NEWS AND ANNOUNCEMENTS या लिंकवर प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्या अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले नाहीत, त्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सदर माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे असे प्रा. योगेश पाटील यांनी सांगितले.

उन्हाळी २०२४ परीक्षेचे अर्ज भरण्याची मूदत संपण्यापूर्वीच हिवाळी परीक्षेचे फोटोकॉपी, गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा दि. २६ ऑक्टोबरपासून सुरू होवून दि. १५ जानेवारीपर्यंत पार पडल्या. या सर्व परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर झाले आहेत. मूल्यांकन प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांचे तसेच मूल्यांकन प्रक्रियेतील इतर सर्व घटकांचे या बैठकीत अभिनंदन करण्यात आले.

विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभापासून ते ३१ व्या दीक्षांत समारंभापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रांसाठी अर्ज करूनही प्रमाणपत्र नेलेले नाही किंवा टपालाव्दारे पाठविलेले पत्र अपु-या पत्त्यामूळे परत आलीत व संपर्क क्रमांक बदललेले आहेत. त्या अवितरीत प्रमाणपत्रांची एकत्रित तपशिलवार सुची विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ई-मेल दिले आहेत त्यांना प्रमाणपत्र घेवून जाण्याबाबत सुचित करण्यात यावे असे या बैठकीत ठरल्याची माहिती प्रा. योगेश पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.