माझा राम हा लावण्यकोटी

0

करुणाष्टक- 8

सबळ जनक माझा राम लावण्यकोटी I
म्हणवुनि मज पोटी लागली आस मोठी II
दिवस गणित बोटीं ठेवूनी प्राण कंठी I
अवचट मज भेटी होत घालीन मिठी II

एखादी बाब डोळ्यांनी पाहणे, कानांनी ऐकणे, मनाने कल्पणे व त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे यात फरक असतो. श्रीखंड खूप छान असतं असं म्हणणं वेगळं व प्रत्यक्ष त्याचा अवीट आस्वाद, तो एक बोट चाखून खाणं यातच मिळतो. सगुण व निर्गुण भक्ती ही या प्रकारात मोडते. समर्थांना आत्माराम ठाऊक नव्हता ? तरीही त्या सगुण-साकार स्वरूपाची एकदा तरी भेट व्हावी असे त्याचे अंर्तंमन वाट पाहात होते.

त्यांचा राम हा त्यांचे सर्वस्व होता. तोच कर्ता होता, करविता होता, पालनकर्ता होता, वत्सल करुणेचा सागर दयानिधी, पतीतालाही पावन करणारा होता. माझा राम हा लावण्याकोटी आहे. त्याचे राजीव लोचन पाहताच माझी दृष्टी अंत:र्यामी वळेल. त्याचे अजानबाहु मला पाहताच भवसागरातून पैलपार नेण्यासाठी पुढे सरसावतील. त्या अभयकरांमुळे मी निर्भय होईल. त्याच्या ह्रदयकमळावर माझे मस्तक निश्चिंत पावेल व त्याच्या पदकमळाचे दर्शन होताच माझे मन संसारापासुन पूर्ण निवृत्त होऊन शांत व वैराग्य वर्धक होईल.

या साऱ्या साठी मला त्याच्या दर्शनाची मोठी आस लागली आहे. तो मला केव्हा भेट देईल ? मी तर अहोरात्र त्याच चिंतन करत आहे. त्यांना तो निजीध्यासच लागला होता. व हा निजीध्यास त्यांना इतर लौकिकाची व ऐहिकाची तहान भुक विसरायला लावत होता.

ते शपथपूर्वक सांगतात हा रामराया माझा स्वामी आहे. तोच आनंदाचे धाम आहे. तोच एक सत्य आहे. बाकी सारे मिथ्या आहे आणि खरं सांगू का तो माझ्या प्राणांचाही प्राण आहे.

पुढे ते म्हणतात, “दिवस गणित बोटीं ठेवून प्राण कंठीI” त्यांचे प्राण असे कंठाशी येतात कारण रामरायाची त्यांना निकड, गरज वाटत असते.

आपलेही प्राण अनेक वेळा कंठाशी येतात. लेकीच्या लग्नाला किती दिवस राहिले ? रिटायरमेंटला किती दिवस राहिले ? शेअर मध्ये पैसे गुंतवले असतील तर शेअरचे भाव वधारले की गडगडले ? टीव्ही वरची क्रिकेटची मॅच अगदी शेवटचा अर्धा तास राहिला, आता कोण जिंकणार ? बस थांब्यावर, रेल्वे स्थानकावर आपण जेव्हा वाट पहात उभे असतो तेव्हा आपली ही स्थिती याहून निराळी नसते. पण प्रभू भेटीसाठी ही तळमळ आपल्या ठायी नसते.

समर्थ रामरायाला अनन्यशरण होते. ती आपली माऊली आहे. माता आहे व आपण लेकरू आहोत हा त्यांचा भाव होता. रामराया आपल्यापासून दूर आहे, तो आपल्याला प्रेमाने आलिंगन का देत नाही ? पुढेही जाऊन ते म्हणतात, तो वत्सलतेने आपले मुख त्यांच्या पीतांबरा ने पुसेन काय ? व कडेवर धरून हनुवटीला स्पर्श करून गुजगोष्टी करेल काय ? मला पाहून त्याला प्रेमाचा पान्हा फुटावा या सर्व त्यांच्या मागण्यातून त्यांना लागलेली दर्शनाची आस असामान्य होती हे लक्षात येण्यासारखे आहे.

समर्थांनी एक-दोन महिने नाही पूर्ण बारा वर्ष एकांतात टाकळी या क्षेत्री तपश्चर्या केली.
“अखंड एकांत सेवावा II
अभ्यासाची करत जावा II”

हे स्वतः करून नंतर ते लोकान्तात आहे. तीर्थयात्रा केल्या. जनमाणसांचे सुक्ष्म निरक्षण केले. तत्कालीन समाज त्याचा अज्ञान त्याचे दारिद्र्य हे नाहीसे करण्यासाठी प्रयत्न केले. व जनासहित जनताजनार्दना बरोबर त्यांनी आपला काळ सार्थकी लावला.

पण तत्पूर्वी साधक अवस्थेत त्यांनी देहाची पर्वा न करता जे उदंड कष्ट केले, देहदंड सोसला त्याला तोड नाही. त्यांची रामराया वरची प्रीती ही असामान्य होती म्हणूनच ते म्हणतात.

“अवचट माझा भेटी होत घालीन मोठीI”. एक क्षण असा येईल तू अचानक अवचित येशील व मला भेटशील. मीही तुला अलिंगन देईल. त्यांचे हे स्वप्न न राहता साक्षात साकार झालं कारण त्यांची असीम भक्ती पाहून रघुनाथांनी त्यांच्यावर कृपा केली, व हा सर्वोत्तम दास धन्य झाला.

” बहुत दिसा आपली भेट झाली I
विदेहीपणे सर्व काय निवाली I”

व ही आत्मअनुभती प्रचिती घेऊन समर्थ पुढे चालले व आपल्या भक्तगणांना ते आत्मविश्वासाने सांगू शकले “अरे हा माझा राम निळा सावळा. तो लावण्यरुपी आहे. महावीर, गंभीर. पूर्ण प्रतापी आहे. संकटकाळी तो धावून येतो. म्हणुन प्रभात काळी तुम्ही त्याचे एकदा तरी चिंतन करा असा आग्रह त्यांनी धरला.”

II जय जय रघुवीर समर्थ II

लेखिका – भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.