चपळपण मनाचे मोडता मोडवेना II

0

करुणाष्टक – 5

चपळपण मनाचें मोडितां मोडवेना I
सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना II
घडि घडि बिघडे हा निश्चयो अंतरींचा I
म्हणवुनि करुणा हे बोलतों दीनवाचा II

मनाच तंत्रच असं आहे, ते दिसत नाही डोळ्यांना पण त्याचा व्याप मात्र जाणवतो. बहिणाबाई म्हणतात तसे हे मन आता भूमीवर तर लगेच आकाशात. त्या उपमा देतात समर्पक की अरे विंचू- साप बरे ते चावले तर मांत्रिक उतरवतात. पण हे मन याला कुठलाही उपाय नाही किंवा रामबाण औषध नाही. ते ताब्यात यावा म्हणून मनाच्या करामती सतत चालू असतात. म्हणतात ना, ” मन चिंते ते वैरी न चिंती” त्याची अजब सत्ता आहे त्याचा स्वभावच मुळी चपळ आहे. सर्व इंद्रियांमध्ये श्रेष्ठ आहे. हो ना? तेच आहे ते हातावर तुरी देऊन केव्हा निसटून जाते हे सांगता येत नाही.

हे मन ताब्यात याव म्हणून मोठे मोठे ऋषी मुनी हे गिरीकंदरात जाऊन बसले. त्यांच्या दाढीच्या जटा झाल्या. एक वेळ माणूस सात समुद्र पार करून येईल पण एका ठिकाणी शांत स्वस्थ बसायला सांगितले तर त्याला ते जमणार नाही. मनाच हे महात्म्य समर्थांना उघडलं होतं म्हणून ते म्हणतात, तुझा चपळपणा तू सोडत नाहीस यातून बाहेर पडणार नाही. एखाद्यावेळेस संसार सोडून अरण्यात जाईल व तेथे पुन्हा मुलाबाळांना पत्र लिहिले अशी फसगत त्यांना होऊ देऊ नये. कारण वैराग्य क्षणात पुरतं पण ते टिकवायला हवं ना? नाहीतर स्मशान वैराग्य आपणा सर्वांना ठाऊक आहे. पण ते थोड्या वेळ टिकते पण पुढे पुन्हा तू कोण? मी कोण? चालू होतेच. आपले कुटुंबीय, आप्त, नातेवाईक, मित्र परिवार हे सारे घनिष्ठ संबंधाचे धागे तुटण्या सारखे नसतात. उलट आपल्याला त्यांचा खूप अभिमान असतो. आपण एखाद्या संघ परिवाराला जात असतो किंवा केंद्र परिवारात कार्य चालूही असते पण कधीकधी त्याचा अहंकार होण्याचा संभव नाकारता येत नाही. सारे पाश सोडून उदंड कर्म करत असून त्यात गुंतून न जाता आपलं असणं ही कठीण गोष्ट आहे.

त्यासाठी मारुतीराया सारखे दास व्हावे लागेल. एकदा मारुतीरायाला विचारण्यात येते, आज तिथी कोणती तर ते उत्तर देतात मला तिथि वार महिना काही माहीत नाही. मला एकच ठाऊक आहे रामाचं नाव ‘श्रीराम’. व्यावहारिकदृष्ट्या हे तुम्हाला पटणार नाही पण इतकी अनन्य भक्ती लागते तेव्हा चिरंजीव पद मिळते.

आपण वीस-बावीशीत तरुणपणी जर नाम घेऊ लागलो किंवा सद्ग्रंथ वाचू लागलो तर पटकन कोणीही बोलून जातं अजून अवकाश आहे एवढ्यात कशाला सुरुवात चाळिशीनंतर पहा. की झालं आपला निश्चय लगेच डळमळीत. पण समर्थ, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम यासारखे संतश्रेष्ठ वृद्धपणी परमार्थाला लागले नाही. हा विचार मनात ठेवावा लागतो नाहीतर बाहेरच्या जगतात इतके आकर्षण आहेत की, “घडि घडि बिघडें हा निश्चय अंतरीचा” हे घडल्याशिवाय राहणार नाही. समर्थ दूरदर्शी होते हा धोक्याचा कंदील त्यांनी आधीच दाखविला. एक तर तीन दिवसात साक्षात्कार, सहा महिन्यात पर्सनल भगवंत भेटीचा वर्ग कोठे ही नसतो. या मार्गावरून चालत राहावं लागतं निष्ठेने, श्रद्धेने, प्रेमाने.

साधना करणारा, इंद्रिय दमन करणार श्रेष्ठ भक्त समर्थांना अभिप्रेत आहे. परमात्मा दृश्य आहे तो दिसत नाही दीर्घकाळ साधना झाली की त्याची प्रचिती येऊ शकते व सुख, समाधान, तृप्ती,शांती, आनंद हे आंतरिक फळं मिळू लागतात. पण सध्या फास्ट पुढच्या इन्स्टंट जमान्यात एवढा धीर कोणाला? सवड कोणाला ? पण येथे वाल्याकोळी व्हायला हवा. वाटमारेकरी होते पात्रता नाही म्हणून नारदांनी उलट नाम घ्यायला सांगितले त्यात मरा मरा करता करता राम राम झाले. एका जागी बसले ते हलले नाहीत. पण बाहेर जगासमोर प्रसिद्ध झाले ते वाल्मिकी ऋषी म्हणूनच. निश्चयाचा प्रताप हा शब्दातीत आहे.

समर्थ करुणापणाने, कोमल अंतकरणाने मृदू भावाने म्हणत आहेत, “तू करुणाकर, तू कृपा कर. मी असमर्थ आहे. दुर्बल आहे माझी इच्छा तू पूर्ण कर.”

II जय जय रघुवीर समर्थ II

लेखिका -भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.