आडमार्गी कोणी जन जे जातील । त्यातून काढील तोची ज्ञानी…॥

0

संत तुकोबांचे अभंग म्हणजे समाजाला सुचवलेलं शहाणपण.. अंध:कार ज्ञान, घन यांच्या मदात उन्मत झालेल्यांना जागे करुन ते सन्मार्गाला लागण्यासाठी केलेला खटाटोप… तुकोबा ज्ञानोबांच्या अभंगानी समाजातलं पाखंड खंडण करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन समाजव्यवस्थेत त्यांना विरोध झाला परंतू; हाती घेतलेले काम त्यांनी सोडुन दिले नाही. त्रास झाला, यातना भोगाव्या लागल्या पण न डगमगता संतांनी समाजातली अंधश्रध्दा अनिष्ट रुढी, परंपरा व जे जे अहंकाराने मत्त होते त्या-त्या सर्वांना वठणीवर आणण्याचे कार्य संत मंडळींनी केले.

॥ सार्थ १२ अभंग॥ या संत तुकाराम महारज कृत अभंग मालिकेतली ही छोटी पुस्तिका म्हणजे सहज खिशात मावेल एवढी तुकोबांची छोटी गाथाच..! ह.भ.प. काशिनाथ शिगवण महाराज यांनी प्रकाशित केलेल्या या मालिकेत निवडक १२ अभंग या पुस्तिकेत घेतले आहेत. समाजाचं प्रबोधन, उद्बोधन व दोहन व्हावं या उदात्त हेतूने तुकोबारायांनी लिहिलेल्या अभंगानी समाजरचनेला शुद्ध सात्वीक वळण लावण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात….

जन्माचे ते मुळ पाहिले शोधून । दु:खासी कारण जन्म घ्यावी ॥
पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी । नरदेहा येऊन हानी केली ॥

मानवी जन्माचे मुळ पाहिले तर गर्भवासाची कल्पना न केलेली बरी. दुर्गंधी मल मुत्राचा गाभात हा जीव ‘सोहम’ भावाने आपली सुटका तर करुन घेतो आणि संसारात आल्यावर दु:ख भोगतो.. मग यासाठीच तू अट्टाहास केला का ? दु:खाचे कारण हा संसार आहे. या संसारात बायका, पोरे, आप्त, स्वकीय, नातेवाईक हे सारे दु:ख देतात. राजकारण करणारे तरी कुठे सुखी असतात. वारेमाप पैसा कमविणारे रात्री सुखाने झोपू शकत नाहीत ? षडरिपुंच्या दुष्टचक्रात अडकलेला जीव यातना, कष्ट भोगतो. मान कमी पण, पाऊलो पावली अपमान होतो हेटाळणी होते शिव्या शापांचा धनी होतो? म्हणून हे मानवा तू मानवी जीवनात येऊन या नरदेहाची हानी करुन घेतली आहे. जन्मानंतर तुला भगवंताने सुंदर नरदेह दिला बालपण खेळण्यात गेले..? तारुण्य मस्तीत भोग सुखात तू घालवले..? म्हातारपणात डोळयांनी दिसत नाही, कानांनी ऐकून येत नाही? खाण्याचे दात पडले? तुला देवपूजा नामस्करण, भजन, पूजन करण्यासाठी वेळच मिळाला नाही ? सन्मार्गाला न जाता तू नेहमी आडमार्गी गेला ? माझ जन्म कशासाठी झाला ? हे तुला कळलेच नाही. हे जीवा ….

रज, तम, सत्व आहे ज्यांचे अंगी । याच गुणे जगी वाया गेला ॥
तम हणजे काय नरकची केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥
तुका म्हणे एैका सत्वाचे सामर्थ्य । करवी परमार्थ अहर्निंशी ॥

मानसाच्या अंगी रज, तम, सत्व हे तीन गुण असतात. या गुणांच्या प्रभावाने तो संसारात कर्म करीत असतो. सत्व गुणी माणसं संसारात परमार्थाकडे वाटचाल करतात. ते विवेकी असतात. पाप करतांना ते धजावत नाहीत घाबरतात. या उलट तमोगुणी माणसं दुसऱ्याला लुबाडतात नको ते दुष्कर्म करतात. धनसंपदा असली म्हणजे ते अनाठायी पैसा खर्च करतात. भोग विलासी असतात. वारंवार ते संतापतात, डाफरतात अंगावर जातात. माझे ते माझे तुझे ते माझे आणि हे ते अत्र तत्र सर्वत्र जे आहे ते माझे अशा वृत्तीने वागणारी माणसं तमोगुणी असतात.

रजोगुणी माणसं मायेच्या पाशात अडकलेली असतात. गावात किर्तन हरिनाम सप्ताह असेल आणि रजोगुणी मानसाला जर बायकोन सांगितलं आज नको, ‘उद्या किर्तनाला जाऊ’, सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी जुजबी देणगी देऊन दोघ जण जेवून येऊ..! अशा वृत्तीचे असतत. रजोगुणी मानसांना तमाशा, सिनेमा, ऐशोआराम प्रिय असतो. वडिलोपार्जीत धन खर्च करतांना ते आपल्यासाठी खर्च करतात. ते दानी नसतात. थोडक्यात जन्माला आला हेला । आणि पाणी वाहता वाहता मेला ॥ अशी त्यांची गत होते.

सत्व गुणी माणसं विचारी असतात. आपल्या हातून भलेही पुण्यकर्म होत नसेल पण म्हणून काय पाप करायचे ? ते अशा प्रवृत्तीचे असतात. देव, धर्म, देशप्रेम, मातृ, पितृ, गुरुभक्ति यामुळे ते साधु संत ऋषी मुनी ज्या मार्गाने जातात किंवा ते जे सांगून गेले त्याचे अनुकरण करतात. विवेकशील, वैराग्यवंत व पुण्यवंत, पुण्यात्मा, महात्मा या सत्प्रवृत्तीचे असे सत्वगुणी माणसं समाजाला योग्य दिशादर्शक मार्गदर्शक असतात. अहर्निश रात्रंदिवस ते परमार्थाचा विचार करतात. अशा व्यक्तिचे जगणे आदर्शवत ठरते. असे तुकोबा म्हणतात..! सगळ झालं हो… देव धर्म झाले मुंबई पुण्यात डॉक्टर झाले.. औषधोपचारात हयगाई नाही ? आता मात्र अमुक तमुक त्या गावाात एक भगत आहे तो धागे दोरे करतो त्याचा चांगला गुण येतो, नदीवर अंघोळपण घालतो ? अशी भलावण करणारी माणसं आडमार्गी जातात. तुकोबांनी अशा दुष्प्रवृत्तींवर प्रहार केला आहे. वेळप्रसंगी रांडीचे म्हणून बटकीचे म्हणून जोरकसपणे समाजातले पाखंड दूर करण्याचा प्रयत्न केला आहे…!

रमेश जे. पाटील
आडगांव ता. चोपडा जि. जळगाव
मो. 9850986100

Leave A Reply

Your email address will not be published.