तुजविण रामा मज कंठवेना II

करुणाष्टक- 31

विश्रांती देहीं अणुमात्र नाहीं I
कुळाभिमानें पडिलों प्रवाहीं II स्वहीत माझें होतां दिसेना I
तुजविण रामा मज कंठवेना II

‘फास्ट लाईफ’, ‘बिझी रुटीन’ किंवा ‘जीवनाची गती’ यावरूनच फक्त माणसाची किंमत होते काय ? असे गतिमान जीवन आज झालंय हे निश्चित. नोकरीसाठी अप-डाऊन, सकाळी सहाला घराबाहेर पडलेली माणसं रात्री घरी परत येतात. त्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. यंत्रवत जीवन वर्षांनुवर्षे घालवावे लागते. त्याशिवाय गत्यंतर नसते. प्रपंच सुख- समृद्धीचा करायचा असेल, वृद्धापकाळाची सोय करायची असेल तर या गोष्टी अपरिहार्य आहेत. आजही आहेत व पुढेही राहतील. समर्थ म्हणतात, “विश्रांती देहीं अणुमात्र नाही” मुंबईतली व्यक्ती सहज बोलता बोलता म्हणाली, “आम्ही सकाळी घराबाहेर पडतो ते रात्री धड टेकवायलाच घरात येतो”. यात अतिशयोक्ती असे काही नाही. देहाला विश्रांती नसते, मनाला उसंत नसते ,बुद्धीला इतर काही चांगल्या गोष्टी करण्यास वाव नसतो. बराच वेळ उदरनिर्वाहाची उठाठेव करण्यात जातो. “पोटासाठी दाही दिशा आंम्हा फिरविशी जगदिशा” अशीच स्थिती असते. तारुण्य यातच संपतं व वृद्धापकाळी शरीर थकतं.

लहानपणापासुन शाळा, कॉलेज, नोकरी, प्रपंचातील इतर जबाबदाऱ्या पार पाडत असताना ‘विश्रांती’ संभवतच नाही. बर सुंदर फर्निचर, फोमची गादी, वर उषा पंखा अशा गोष्टी असुनही पोटात थोडे जरी दुखत असले तरी खरी विश्रांती लाभत नाही. उदंड पैसा, उच्च शिक्षण, मानसन्मान असला म्हणजे विश्रांती असतेच असे नाही. मानवी जीवनात सुख ,समाधान, शांती, आनंद, तृप्ती, प्रसन्नता या गोष्टी जर वृद्धिंगत होत गेल्या तर काही विश्रांती खऱ्या अर्थाने प्राप्त होते. मन जर अस्वस्थ, तणावग्रस्त असेल तरीही विश्रांती मिळत नाही. स्वभाव उलाढाली करणारा, उपद्व्यापी चंचल असेल तर स्वतः बरोबर इतरांची विश्रांती व्यत्यय पावते. समर्थांची विश्रांतीची कल्पना एकमेव व अचूक अशी आहे.”एकांती बैसावे, स्वस्वरूपी विश्रांतीस जावे, येणे कारणे दृढावे परमार्थ हा.” परमार्थ जर वृद्धीस न्यायचा असेल तर टिळा, माळा, भगवे वस्त्र, अरण्यात राहणं काही उपयोगाचं नाही. तर एकांतात काही काळ साधना वर्षानुवर्ष करायला हवी. आपला फोटो कोणी काढतो का? असा यत्किंचितही लवलेशही मनात नसावा.”मी देवाचा देव माझा हीच माझी सत्य वाचा” हा बोध संपुर्ण जीवनाला व्यापुन राहिला तरच विश्रांती संभवते पण हे सहज शक्य नसते.

कुळाचा अभिमान, अहंकार जबरदस्त असतो. आम्ही देशस्थ, आम्ही कोकणस्थ, आम्ही बावन्नकुळी, अमुक-अमुक आमचे वंशज, दहा पिढ्यांचा इतिहास तोंडपाठ असतो. त्याही पुढे जाऊन प्रांताचाही अभिमान असतो. ‘आम्ही देशावरचे’, ‘तुम्ही कोकणाकडचे’ अस्मिता जरूर असावी. पण कुळाचा अभिमान हा एक बलिष्ठ तंत्र होऊन बसत तो रक्तात येतो, वर्तनात उतरतो. म्हणून आंम्ही कोकणस्थ, सून कोकणस्थ हवी अशी सावधगिरी बाळगली जाते. पुढे त्रास नको, आपल्या कुटुंबात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, एकसंधता अवश्यमेव हवी. पण हे लक्षात घ्यायला हवं की या कुटुंबाची सेवा करता करता मी थकलो. बायकोचे हट्ट, काही माझे स्वतःचे हट्ट, सामाजिक बांधिलकी, प्रतिष्ठेचा हट्ट. मी प्रभु प्रेमासाठी काय केलं? काही चांगला हट्ट केला? देवा मी एक तास तुझे नाम प्रेमाने घेईल. पण सोपं वाटलं तरी तसं होत नाही. हा हट्ट आपण करत नाही. प्रभु तरी आपल्या साठी काय करेल? साधुसंतांची गोष्ट वेगळी असते. ते ‘श्रीहरी’च्या मनापासून भक्तीत रमलेले असतात, रंगुन गेलेले असतात. म्हणून तर ते म्हणु शकतात, “यातिकुळ माझे गेले हरपोनि, श्रीरंगावाचुनि आनु नोहे.” आपण मात्र कुळाच्या प्रतिष्ठेत, त्याच्या मान-सन्मानात, त्या प्रवाहात वाहून जातो व आपल्या स्वहिताला अंतरतो.

“जयाचा ऐहिक धड नाही I तयाचे परत्र पुसशी काई?” हे तर खरंच. पण भगवद्भक्ती जर हातुन घडली नाही तर सारे निष्फळ होते. “आपुलिया स्वहिता असे जो जागता I धन्य माता पिता त्याच्या जगी II.”

भगवद् भक्ती हातून घडली तर माता पिता धन्य होतात. भगवद्भक्तांमुळे पृथ्वी सनाथ होते असं म्हणतात. पुत्र जर भगवद्भक्त निघाला तर एकविस कुळांचा उद्धार होतो व कन्या जर भगवद्भक्त निघाली तर शहाण्णव कुळांचा उद्धार करते. “कुळी कन्या पुत्र हांती जे सात्विक I तयाचा हरिख वाटे देवा II”

ज्या कुळातील मुलं-मुली असे भक्त निपजतात. लहानपणापासून भक्तीची ज्यांना आवड असते. अशी कन्या पुत्र पाहून देवालाही संतोष होतो, आनंद वाटतो. पोटी उत्तम संतान व्हावे ही प्रत्येकाची इच्छा असते. पण त्यात भगवद्भक्त असेल तर त्याचा हर्ष प्रत्यक्ष पांडुरंगाला- विठ्ठलाला होतो. त्यामुळे आपले मुलं-मुली जशी डॉक्टर व्हावीत, इंजिनिअर व्हावीत, चार्टड अकौंटंट व्हावीत अशी इच्छा असते. त्याचबरोबर त्याने उत्तम भगवद्भक्त व्हावे यासाठी लहानपणापासूनच संस्कार करण्याचा प्रयत्न व्हावा. उत्तमातील उत्तम सुख विद्या- वैभवाने प्राप्त करावीत. पण ‘सुखरूप’ व्हायचे असेल व ‘सर्वसुखी’ व्हायचे असेल तर ‘भगवद् भजना’ शिवाय मार्ग अन्य नाही. समर्थांसारख्या ज्ञानी पुरुषांना हे ठाऊक असते. रामाच्या वियोगाने जन्म घ्यावा लागला. शरीरामुळे पराधीनता आली. त्यामुळे अज्ञान सरत नाही. हे परतंत्र जिणे किती कंठावे? तुझ्याशिवाय मला जीवन कंठवत नाही.

 

II जय जय रघुवीर समर्थII

लेखिका -भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here