महागाईवर मात करणारा गुढीपाडवा उत्सव

0

दोन वर्षाच्या कोरोना महामारीच्या निर्बंधांनंतर यंदा महागाई कळस गाठत असतानाही साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला मराठी नववर्षाच्या शुभारंभ दिनी गुढीपाडव्याला रेकॉर्डब्रेक उत्साह दिसून आला. जळगाव शहरात गुढीपाडव्याला 20 किलो इतक्या सोन्याची खरेदी झाली असल्याचे वृत्त आहे. प्रत्येक क्षेत्रात महागाई वाढल्याने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले, असे आपण म्हणत असलो तरी, तितक्या मोठ्या प्रमाणात मध्यवर्ती पांढरपेशांकडून छोटे व्यापारी व उद्योगपतींकडून दोन चाकी आणि चार चाकी वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. जळगाव शहरात गुढीपाडव्याच्या दिवशी एकूण 1100 दुचाकी तर 250 चार चाकी गाड्यांची विक्री झाल्याचे वृत्त दिलासादायक म्हणावे लागेल. इतकेच नव्हे तर पन्नास जण चरचाकीसाठी वेटिंग मध्ये असल्याचे कळते.

सध्या लग्नसराईचा सिझन असल्याने कपडा मार्केट सुद्धा तेजीत दिसून आला. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकंदरीत महागाईने कळस गाठला असताना मार्केटमधील खरेदीदारांची तेजी कशाचे निदर्शन आहे?

दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधांमुळे मार्केट ठप्प झाले होते. आर्थिक चक्र बिघडले होते. आर्थिक उलाढाल ठप्प झाली म्हणून जिकडेतिकडे ओरड सुरू होती. परंतु कोरोनाचे निर्बंध उठताच मार्केटमधील उलाढाल कमालीची वाढली. एकंदरीत हे आगामी अर्थकारणाच्या दृष्टीने चांगले पाऊल आहे. मार्केटची तेजी पाहतांना लोकांच्या हातातील पैसा सहजरित्या बाहेर पडतो आहे. परंतु त्याचबरोबर सर्वसामान्यांचे महागाईने कंबरडे मोडले गेले. ही बाब तितकीच चिंताजनक म्हणता येईल. पेट्रोल डिझेलचे भाव आकाशाला भिडले आहे. जळगाव मध्ये पेट्रोल 119 रुपये लिटर झाले असल्याने दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांची दमछाक होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीमुळे वाहतुकीचे दर वाढले आहेत. भाजीपाला महाग मिळतोय. केवळ डिझेलच्या भाव वाढीमुळे भाजीपाला महाग झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून इतर सर्वत्र जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढलेले आहेत.

दररोज लागणारे चहा, साखर, गहू, ज्वारी, तांदूळ, तेल, स्वयंपाकाचा गॅस यांच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या किचनचे अर्थचक्र बिघडले आहे. वाढत्या महागाईच्या संदर्भात शासनातर्फे काहीतरी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तथापि त्या दृष्टीने महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासनाच्या वतीने काही उपाय योजना केल्या जात नाहीत, ही बाब चिंतेची म्हणावी लागेल. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध उठल्याबरोबर बाजारपेठेतही वृद्धी झाली आहे. ही चांगली लक्षणे आहेत. तथापि महागाईवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.