इस्लाम धर्मातील सर्वोत्कृष्ट पवित्र रमजान महिन्यास सुरुवात

0

शब्बीर खान, यावल लोकशाही न्यूज नेटवर्क

इस्लाम  धर्मातील सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या पवित्र रमजान महिन्यास दि.३ एप्रिल रविवारपासून सुरुवात झाली. या महिन्यातील रोजे (उपवास) म्हणजे इस्लाम धर्मातील पाच मुलतत्त्वांपैकी एक असून हा महिना अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असा महिना आहे. या महिन्याचे विशेष असे धार्मिकदृष्ट्या खास वैशिष्ट्य म्हणजे या महिन्यात पवित्र कुराण अवतरले आहे, असे कुराणात म्हटले आहे. तसेच पवित्र रमजान महिना एप्रिल महिन्यात येण्याचे हे तिसरे वर्ष आहे.

या महिन्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा महिना सबुरी आणि गोरगरिबांना मदत व सहकार्य करण्याचा महिना आहे. रोजा (उपवास) करताना तहान व भूक सहन करून संयम ठेवणे हे पुण्याचे काम असून याचा मोबदला स्वर्ग प्राप्त होत असल्याचे हदिसात म्हटले आहे शिवाय या महिन्यात रोजा (रोजा अप्तार) सोडण्यापूर्वीची दुवा हमखास कबूल होत असते.

या महिन्यातील रोजे (उपवास) अनिवार्य (फर्ज ) असल्याने मुस्लिम बांधव संपूर्ण महिन्याचे रोजे करतात. पवित्र रमजान महिन्यात भुकेले व तहानलेले राहणे बरोबरच शरीराच्या प्रत्येक अवयवांचा रोजा करणे करणे गरजेचे आहे. त्यात हात, पाय, नाक, कान, डोळे, तोंड इत्यादी अवयवांचा समावेश आहे. या अवयवांचा रोजा करणे म्हणजे शरीराच्या प्रत्येक अवयवांना वाईट मार्गापासून व सर्व प्रकारच्या प्रवृत्तीपासून तसेच चुकीच्या मार्गापासून दूर ठेवणे होय.

रमजान महिन्याचे तीन पर्व

पवित्र रमजान महिना हा तीन पर्वामध्ये विभागला गेलेला असून प्रत्येक पर्व हे दहा दिवसांचे असते त्यात पहिले पर्व रहेमत (कृपादृष्टी) दुसरे पर्व मगफेरत म्हणजे स्वतःच्या हातून कळत नकळत ज्या चुका झाल्या असतील त्या चुकांपासून क्षमा मागून सुटका करून घेणे होय. तिसरे पर्व दोजख-से- नज़ात म्हणजे नरकापासून सुटका हे होय या महिन्यात अहोरात्र ईश्वरच्या रहेमत (कृपादृष्टीचा) वर्षाव होत असतो. व त्या रहेमतचा इस्लामधर्मीय भाविक लाभ घेत असतात.

एप्रिलमध्ये रमजान येण्याचे तिसरे वर्ष

पवित्र रमजान महिना उन्हाळ्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात येण्याचे हे तिसरे वर्ष आहे. या अगोदर सन २०२० मध्ये २५ एप्रिल पासून पवित्र रमजान महिन्याच्या सुरुवात झालेली होती त्यानंतर २०२१ म्हणजेच मागील वर्षी १४ एप्रिल पासून या महिन्यात सुरुवात झालेली होती तर यावर्षी ३ एप्रिल पासून सुरुवात होत आहे.

रमजान महिन्याची मुस्लिम बांधवांना असते ओढ

पवित्र रमजान महिन्यापूर्वी येणाऱ्या शबे- ए – बारात ही धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची असणारी रात्र संपताच मुस्लिम बांधव पवित्र रमजान महिन्याच्या तयारीस सुरुवात करतात आणि आता हा महिना सुरू होत असल्याने स्वागतासाठी मुस्लीम बांधव सज्ज झालेले असून मुस्लिम समाजबांधवांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.