कमळासारखं चिखलात राहून न माखणे म्हणजे अलिप्तपणा

0

करुणाष्टक 25

उदासिन हे वृत्ती जीवीं धरावी I अती आदरें सर्व सेवा करावी II सदा प्रीति लागो तुझे गूण गातां I रघुनायका मागणें हेंचि आतां II

अगदी शाळकरी छोटीशी पिंकी सहज बोलून जाते, “काय बोअर झाला प्रोग्राम” तर कॉलेज कुमार राजु म्हणतो, “आज अभ्यासाचा मुड नाही” कमलाताई पुठ्याने वारा घेत घेत म्हणतात, “आज सकाळ पासून लाईट नाही अगदी अनइझी झालय” तर सुभाषराव मनाशी म्हणतात, “आज कामात लक्ष नाही आहे फ्रेश नाही वाटत” का बरं छोट्या छोट्या गोष्टी जराशा मनाविरुद्ध झाल्या की आपली ही प्रतिक्रिया ?

पण समर्थांना जी ‘उदासीन’ वृत्ती सांगायची आहे ती वेगळीच आहे. घरात नाना परीची सौख्ये आहेत. सर्व व्यवस्थित आहे. पण मन अंतर्मुख झालं की वाटत एवढेच मिळवणं हेच या जीवनाच साफल्य ? शिक्षण, नोकरी, मूलबाळ, घरदार… बस्स … पण हे परिपूर्ण नाही. काही परोपकार, सामाजिक ॠण, देवधर्म, देशासाठी त्याग नको का ? असा विचार विवेकाने आला तर व्यक्ती अलिप्त राहण्याचा प्रयत्न करते मग ती कार्य उदंड करते. पण तीला मानपान, हारतुरे, स्वागत, फोटो नको वाटतात. व्यवहारातल्या भूमिका तशाच पार पडतात.

नवरदेवाची आई ‘विहीणबाई’ मान घेणारच. पण तिलाही स्वतःचे पाय धुऊन घेणे योग्य वाटणार नाही. रीती प्रमाणे एखादी कृती घडेलही. पण मनापासून हे झालं पाहिजे असा अट्टाहास तिचाही राहणार नाही. असं हळूहळू साधलं की संसार करत असतानाही ‘अलिप्तपणा’ साधतो . कमळ जसं पाण्यात असतं, चिखलात राहत पण कधी चिखलाने माखत नाही. आकाश जसे निर्लेप असते तसं सुखाने हुरळून न जाता, दुःखानं एकदम खचुन न जाता, वृत्तीचा समतोल न ढळू देता, भगवंताच्या चरणी मन ठेवून शांततेने जीवन कंठणे ही ‘उदासीन वृत्ती’ हळू हळू अंगी बाणवावी लागते, आत्मसात करावी लागते. तर हातून काही भक्ती, उपासना, स्वाध्याय, साधना घडू शकते. म्हणून क्षणभर विचार करावा की हा भवसागर पैलपार जाण्यासाठी काही करायला नको का?…अर्थातच हवे. मग त्यासाठी समर्थ पुढे उपायही सांगतात, “अती आदरे सर्व सेवा करावी.”

सध्याच्या आपल्या ‘लाइफस्टाइल’ मध्ये ‘मॅनर्स’ आहेत पण मनापासून ‘आदर’ नाही. आई- वडील, मित्र परिवार, शिक्षक, गुरु यांची सेवाभावाने पुजा होत नाही. टिळक -आगरकर- सावरकर असे आदर्श नेते नाहीत. म्हणून आमचा आरोप असतो पण तसा आदर्श होण्याचा कुणी जाणीवपूर्वक प्रयत्न करत नाही. मग पुढच्या पिढीला आपण काय देणार? म्हणून घरात आजी- आजोबा हवेत म्हणजे एक मुक चळवळ पण अभ्युदय घडविणारी घडेल. नातवांना नकळत संस्कार मिळतील व तेही पुढे चांगले नागरिक होतील. आई-वडिलांची, गुरुची, देवाची, देशाची सेवा करतील आदराने ! प्रेमाने ! निष्ठेने.!

पुढे समर्थ एक मागणं मागत आहेत. पुढची पायरी आहे सेवाभाव उच्च पातळीवर जातो तेव्हा तो देवाचे प्रेमाने भजन -कीर्तन- प्रवचन करतो. कुठल्याही कामनेने नाही तर अतिशय भावांन, प्रेमाने ! संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात तशी स्थिती हवी.” सदा माझ्या डोळा I जडो तुझी मूर्ती I रखुमाईचा पती सोयरीया I गोड तुझे रूप गोड तुझे नाम II” पुढे तेही म्हणतात,” देई मज प्रेम सर्वकाळ I विठो माऊलीचे हाचि वर देई I संचारोनी राही ह्रदया माजी II” विठ्ठलाचा -रामाचा निवासच या हृदयात व्हावा. ही अनुभूती झाली की मग तो प्रपंचातील काय मागेल देवाकडे ? गाडी- घोडा -बंगला ….अशक्य पुढे महाराज म्हणतात,”तुका म्हणे आता न मागे आणिक I तुझे पायी सुख सर्व आहे II”

सर्व सुख एकदा भगवंताच्या चरणाशी आहे हे उमजलं कि मग त्याच्यावर प्रिती जडते, नामस्मरण होते, ध्यान होते, ध्यास लागतो, तीर्थयात्रा करावीशी वाटते, सत्संग लाभावासा वाटतो. सद्ग्रंथाचं ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा यांचे वाचन करावेसे वाटते, श्रवण करावेसे वाटते. थोडासा परउपकार, न्यायाने वागणं आपोआप हातून घडतं. अहंकारही गळून पडतो. प्राणीमात्रांविषयी प्रेम वाटू लागतं. सुख घडी घडी वाढू लागते. रामनाम घेताना अश्रू डोळ्यात येतात. कंठ सद्गदित होतो. “तुझे रुपडे लोचनी म्या पाहावे” विश्वविस्तार हा दृश्य पसारा डोळ्यांनी बरा दिसतो पण समाधान होत नाही. समर्थ म्हणतात, केवळ तुझे स्वयंप्रकाश चिद्स्पवरुप ज्ञान दृष्टीस दिसावे म्हणून मी अहोरात्र नामसाधना करीत आहे. हे रघुनायका, माझा जीव वाचेल की नाही याची मला मुळीच चिंता नसावी. तुझी सर्व सेवा मी अत्यंत आदराने करावी आणि तुझे गुण गाण्यात मला सदा प्रिती लागावी हेच आता माझे मागणे आहे. हे रघुनायका तुझे रूपडे मी लोचनांनी पहावे. तुझे गुण गाण्यातच मन तल्लीन राहावे. भक्तीपंथाने जाण्याची आवड निर्माण व्हावी.

भक्तीपंथाने आपणही चालू लागलो तर श्रीहरीची प्राप्ती सहजच होते. आजवर या मार्गाने जे जे महात्मे चालत राहिलेले महापुरुष झाले त्यांच्याकडे शांती होती, तृप्ती होती. समाजाला सुखरूप करण्याचे सामर्थ्य होते. म्हणून आपल्याही आयुष्यात या भक्ती मार्गावरून प्रेमाने पावले टाकण्यास विशेष महत्त्व आहे.

IIजय जय रघुवीर समर्थ II

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड ,पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.