जिल्ह्यातील कामांच्या विलंबास जबाबदार कोण?

0

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरींनी नुकतेच जळगाव शहरात येऊन काही विकास कामांचे लोकार्पण केले आणि काही विकास कामांची घोषणा केली. त्यांनी बऱ्हाणपूर अंकलेश्वर या 233 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची घोषणा केली. सुमारे आठ हजार कोटी रुपये या महामार्गावर खर्च होणार आहेत. येत्या सहा महिन्यात त्याचा भूमिपूजन सोहळा नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. नितीन गडकरी यांनी ज्या ज्या रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण केले त्यातील एकाही रस्त्याचे काम वेळेच्या आत पूर्ण झालेले नाही. चार वर्षांपूर्वी जळगाव शहरातील खोटे नगर ते कालिंका माता मंदिरा पर्यंतच्या सुमारे आठ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचा शुभारंभ झाला होता.

दोन वर्षात हे चौपदरीकरण पूर्ण व्हायला हवे होते. परंतु ते पूर्ण होण्यासाठी चार वर्षे लागली. दोन वर्षाच्या विलंबाचे कारण काय ? दोन वर्षे उशिरा चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर या विलंबासाठी ठेकेदाराला मुभा देणारे कोण ? आता चार वर्षानंतर या चौपदरीकरणाचे लोकार्पण पूर्ण झाले असले तरी अद्याप चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास आलेले नाही. या महामार्गावर पथदिवे अद्याप बसवलेले गेलेले नाहीत. पथदिव्यांच्या कामाच्या निविदेच्या प्रक्रियेत अडचण पडली आहे. त्यामुळे जरी या महामार्गाचे लोकार्पण मंत्रिमहोदयांनी केले असले, तरी रात्री अंधारात पथदिवे नसल्याने अद्याप अपघात होत आहेत. अपघात होऊ नये म्हणून महामार्गाचे चौपदरीकरण केले असले तरी अपघात मात्र थांबलेले नाहीत.

शहरातून जाणाऱ्या या महामार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड करायला हवे होते. परंतु सर्व्हिस रोड झालेले नाहीत. त्यामुळे दुचाकीस्वार अथवा पायी चालणाऱ्यांना या महामार्गावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. हे सर्व्हिस रोड न होण्यास स्थानिक महापालिका जबाबदार असल्याचे खुद गडकरींनी म्हटले आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला जे अतिक्रमण आहे ते काढल्याशिवाय सर्व्हिस रोड करणे शक्य नाही. त्या बरोबरच नितीन गडकरी यांनी महापालिका तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटलांना आणखी एक पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची सूचना केली. ती म्हणजे महामार्गाच्या दोन्ही बाजूस असलेल्या झाडांची कत्तल न करता त्यांचे रिफ्रंटेशन करावे. त्यासाठी जी मदत लागेल ती रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वतीने देण्यास तयार असल्याचे सांगितले. परंतु गेल्या चार वर्षात महामार्गाचे चौपदरीकरण होत असताना आजूबाजूची अतिक्रमणे काढली गेली नाहीत. त्याला जबाबदार कोण? कोणतेही काम होणाऱ्या विलंबासंबंधित लोकप्रतिनिधी, अधिकारी जबाबदारी घेण्यास तयार नाहीत. त्यांना त्या विलंबाबाबत काही देणे घेणे नाही.

जळगाव शहरात अपघात ग्रस्त महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या विलंबाबाबत केवळ चर्चाच होत राहिली आहे. नहीच्या अधिकाऱ्यांकडे अनेक जण बोट दाखवतात. परंतु त्यांचे काहीही वाकडे होत नाही. आकाशवाणी चौकातील रोटरी सर्कलच्या अडथळा ठरणाऱ्या तापी खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयाचे अतिक्रमण भिजत घोंगडे पडले आहे. सरकारी खात्याचे अतिक्रमण काढणे खाजगी अतिक्रमण काढण्यापेक्षा सोपे असल्याचे सांगण्यात येते. तथापि हे तापी खोरे महामंडळाचे अतिक्रमण अद्याप काढले गेले नाही. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनीही तक्रारी केल्या. तथापि हे अतिक्रमण जैसे थे आहे. त्यामुळे हे रोटरी सर्कल अपघातग्रस्त सर्कल बनले आहे. पण त्याची कोणी दखल घेत नाही.

जळगाव औरंगाबाद या 150 किलोमीटरच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा शुभारंभ 2016 मध्ये झाला. तीन वर्षात हा महामार्ग पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते. तथापि आज सहा वर्षे झाली तरी अद्याप महामार्ग पूर्ण झालेला नाही. पंधरा टक्के काम अद्याप व्हायचे आहे. दोन-तीन वर्षापूर्वी तरी जळगाव वरून औरंगाबादला वाहनाने जाण्यास अनेक टाळाटाळ करत होते, इतका रस्ता खराब होता. आता सुद्धा जे पंधरा टक्के काम अपूर्ण आहे त्यामुळे वाहनधारकांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते आहे. दोन तास जळगावहुन औरंगाबाद जायला लागण्याऐवजी साडेतीन तास लागत आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या किमती आकाशाला भिडल्या असताना या वाढत्या खर्चाच्या भुर्दंडाला जबाबदार कोण? एकंदरीत जळगाव औरंगाबाद महामार्गाच्या विलंबाची जबाबदारी कोणावर? जळगावातील तरसोद फाटा ते फागणे हे 80 किलोमीटर महामार्ग चौपदरीकरण असेच रखडले आहे. मंत्री महोदय म्हणाले कंत्राटदारांमुळे विलंब होतो, पण आता गती मिळाली आहे. हे सर्व होत असताना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी करतात काय? जणू हे काम आमचे नाही अशा थाटात वावरतात. यावर एकच उपाय म्हणजे पालकमंत्री आक्रमक होण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.