पुतण्याच्या पाठीशी काका खंबीरपणे उभे..!

0

लोकशाही संपादकीय लेख 

पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी भाजपला रामराम ठोकून हाती शिवबंधन बांधले. शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे जळगाव लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. करण पवार हे माजी पालकमंत्री राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे सतीश अण्णा पाटील यांची पुतणे होत. गेले दहा वर्ष करण पवार हे भाजपमध्ये असल्याने डॉक्टर सतीश पाटील आणि करण पवार यांच्यात राजकीय मार्ग वेगळे होते. परंतु करण पवारांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करून जळगाव लोकसभेची उमेदवारी मिळवली. करण पवारांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे डॉक्टर सतीश पाटील यांनी स्वागत केले. इतकेच नव्हे तर महाविकास आघाडीतर्फे करण पवारांच्या पाठीशी शिवसेने बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षाची पूर्ण ताकद पाठीशी उभारून पूर्ण ताकदीनिशी लढा दिला जाईल असे प्रतिपादन सुद्धा डॉक्टर सतीश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले.

डॉक्टर सतीश पाटील एवढ्यावरच थांबले नाही, कै. भास्करराव पाटील कुटुंबात आतापर्यंत आमदारकी, मंत्री, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष आदी पदे उपभोगली. पण लोकसभेची खासदारकी अद्याप वाट्याला आलेली नव्हती. आता करण पवारांच्या माध्यमातून खासदारकी मिळत असेल तर पाटील कुटुंबातील एक ज्येष्ठ सदस्य म्हणून मला आनंदच होईल, अशी भावना डॉक्टर सतीश पाटील यांनी व्यक्त केली. त्यामुळे एक कुटुंबात राजकारणाच्या ज्या वेगवेगळ्या वाटा होत्या, त्या करण पवारांच्या शिवसेना प्रवेशाने एक झाल्या आहेत. तसेच आपल्या पुतण्याला जर खासदारकीची उमेदवारी मिळत असेल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार असेल, तर एक काका म्हणून मला आनंदच होतो आहे, असेही सतीश पाटलांनी आपल्या भावना मोकळेपणे व्यक्त करून सांगितले. सोबतच पूर्ण ताकद करण पवारांच्या पाठीशी लावली जाईल, असेही आवर्जून सांगितले.

कै. भास्करराव पाटलांचा हा नातू पाटील कुटुंबियांचा वारसा पुढे नेत आहे. करण पवार यांच्या उमेदवारीमुळे भाजप गटाच्या हालचालींना वेग आला आहे. माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांनी भाजपचे संकटमोचन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची तातडीने जामनेरला त्यांच्या निवासस्थानी जाऊन गुप्त चर्चा केली. त्यामुळे माजी खासदार ए.टी. नाना पाटील हे अचानक सक्रिय झाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ए.टी. नाना पाटील आणि गिरीश महाजन यांच्या भेटी संदर्भात जिल्ह्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

२०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जळगाव लोकसभा मतदार संघातून डॉक्टर सतीश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. तथापि २०१४ च्या मोदी लाटेत डॉक्टर सतीश पाटील पराभूत झाले. तेव्हाचा वचपा काढण्याची संधी आता पुतण्या करण पवार यांच्या उमेदवारीने चालून आलेली आहे. परिणामी करण पवारांच्या पाठीशी पूर्ण शक्ती लावण्याची त्यांची इच्छा दिसून येत आहे. दरम्यान ए. टी. पाटील आणि गिरीश महाजन यांच्या भेटीने स्मिता वाघ यांची उमेदवारी बदलली जाईल, असे वारे वाहू लागले. त्याला सुद्धा गिरीश महाजन यांनी पूर्णविराम दिला असून उलट जळगाव आणि रावेर लोकसभा दोन्ही जागा पाच लाखाच्या मताधिक्याने आम्ही जिंकू, असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. तसेच भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कुणाच्या येण्याने अथवा कुणाच्या जाण्याने भाजपवर काहीही परिणाम होणार नाही, असे गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.

तथापि देशभरात भाजपमध्ये इतर पक्षांचे इन्कमिंग सुरू असताना खासदार उन्मेष पाटलांनी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केला. यामागील कारणाचा श्रेष्ठी शोध घेत असल्याचे कळते. २०१४ साली भाजपतर्फे भंडारा, गोंदियात खासदार म्हणून निवडून आल्यानंतर खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे नाना पटोले हे एकमेव होते. आता खासदार उन्मेष पाटील हे भाजपची खासदारकी सोडणारे दुसरे खासदार होय. त्याचबरोबर खासदार उन्मेष पाटलांनी या मागची भूमिका मुलाखतीतून व्यक्त केली. ती भाजपसाठी इमेज डॅमेज करणारी आहे. पाहूया.. घोडा मैदान जवळच आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाचा सामना कसा रंगतोय.. एवढे मात्र निश्चित की, भाजपला सोपी वाटणारी जळगाव लोकसभा निवडणूक मात्र चुरस निर्माण करणारी झाली आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.