कापसाला योग्य भाव मिळावा ; साकळी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी

0

लोकशाही न्युज नेटवर्क
मनवेल ता.यावल शेतकऱ्यांनी गेल्या खरीप हंगामात पिकवलेल्या कापसाला योग्य भाव नसल्यामुळे साकळीसह परिसरातील शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झालेली आहे.भावाअभावी कापूस विकला जात नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असून हवालदिल झालेले आहे. रडकोंडीला आलेला आहे.तरी या शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच स्थानिक खासदार व आमदार यांनी लक्ष देऊन कापसाला योग्य भाव मिळवून द्यावा अशी मागणी कापूस उत्पादक शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

साकळीसह परिसराचे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे नगदी पिक म्हणून कपाशीचे पीक आहे. कपाशीचे पीक यंदाच्या वर्षी चांगले होते.हे कपाशीचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्याला जमीन मशागत,बियाणे, लागवड,फवारणी,अंतर्गत मशागत तसेच कापूस वेचणी यासह सर्व कामांना खूप मोठा खर्च झालेला आहे.खूप मोठा खर्च करूनही यंदा बागायती कपाशीचे उत्पादन समाधानकारक तर कोरडवाहू कपाशीचे बऱ्यापैकी आले. मोठ्या कष्टाने व मेहनतीने तसेच दिवस-रात्र एक करून शेतकऱ्यांच्या हाती कपाशीचे पीक आले.हाता- तोंडाशी घास आला.

आपल्या कपाशीला चांगला भाव मिळेल व आपल्या हातात चार पैसे येतील आणि आपले संसाराचे स्वप्न साकार होतील या आशेनेच शेतकरी राजा काहीसा सुखावला होता. दरम्यान दिवाळी झाल्यानंतर कपाशीचे भाव काही प्रमाणात वाढायला सुरुवातही झाली.साधारणतः नोव्हेंबर महिन्यात कपाशीला खाजगी व्यापाऱ्यांकडून प्रतिक्विंटल ९०००/- रुपये च्या आसपास भाव दिले जात होते तथापि झालेला खर्च व मेहनतच्या दृष्टीने प्रतिक्विंटल कमीत कमी १०,०००/- रुपये एवढा भाव मिळेल या आशेवर शेतकरी कपाशी विकत नव्हता होता.मात्र दरम्यानच्या काळात कपाशीच्या भावात चढउतार सुरू होता.

त्यानंतरच्या काळात डिसेंबर ते जानेवारीच्या सुरुवातीला भावात चांगलाच उतार निर्माण झाला व कपाशीचे भाव कमी- अधिक साधारणतः ८०००/- रुपये प्रति क्विंटल आले. भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकणे जवळपास थांबवले आहे.त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे.अनेक शेतकऱ्यांनी कपाशीचे पिक उभे करण्यासाठी घेतलेले कर्ज किंवा हात उसनवारीचा पैसा घेतलेला आहे.तरी कपाशीला योग्य असा भाव मिळत नसल्याने तो पैसा कसा फेडायचा? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

प्रतिक्विंटल दहा हजार भाव मिळावा- कपाशीचे पीक घेण्यासाठी लागणारा वाढता खर्च तसेच वाढती मजुरी हा खर्च पाहता कपाशीला प्रती क्विंटल कमीत कमी दहा हजार रुपयाचा भाव मिळावा अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.या शेतकऱ्यांच्या गंभीर अशा व्यथेकडे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील,खा.रक्षाताई खडसे,आ. सौ.लताताई सोनवणे यांनी लक्ष द्यावे व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसास पुरेसा भाव मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.अशी मागणी साकळीसह परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.