सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेत आठव्या फेरीनंतर खेळाडूंमध्ये वाढली चुरस…

मुलांमध्ये तब्बल पाच जण संयुक्तपणे तर मुलींमध्ये उत्तर प्रदेशची फीडे मास्टर शुभी गुप्ता आघाडीवर...

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

अनुभूती निवासी शाळेत सुरू असलेली सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेच्या आज दि.1 जानेवारी रोजी सहाव्या दिवशी आठवी फेरी खेळवण्यात आली. स्पर्धा आता आपल्या मावळतीकडे वळत आहे, त्यामुळे स्पर्धेतील चुरस ही वाढताना दिसत आहे.

आतापर्यंत मुलांमध्ये ५ खेळाडू संयुक्तपणे तर मुलींमध्ये १ खेळाडू आघाडीवर आहे. मुलांमधील सामन्यांमध्ये पहिल्या पटावरील तुल्यबळ लढतीत तेलंगणाच्या विघ्नेश ने इम्रानला बरोबरीत रोखले. सिसिलियन बचावच्या लॉवन्थाल कलशनिकाव पद्धतीत विघ्नेशच्या जी ५ घरावर खेळल्या गेलेल्या चालीनंतर डाव विघ्नेशच्या हातातून निसटला आणि इम्रान ने डाव सहजपणे अनिर्णीत ठेवला. पण आजच्या फेरीतला सर्वात आकर्षक डाव ठरला तो दुसऱ्या पटावरील आसामचा मयंक आणि दिल्लीचा दक्ष गोयल यांचा सामना. कारोकान ॲडवान्स पद्धतीत साडे तीन तास चाललेल्या या सामन्यात अनेक रंगतदार स्थिती पहावयास मिळाल्या. वेगवेगळ्या दिशेला राजाला संरक्षित केल्यानंतर मयंकने वेळ न दवडता वजिराच्या बाजूने हल्ल्याला सुरवात केली. आक्रमणाला थोपवत आपले ‘ब’ पट्टीतील प्यादे दक्ष ने ताकदवान बनवले. वजिराचे बलिदान देत आपल्या प्यादे, हत्ती, व घोड्याची ताकद सुसंघटित करून पांढऱ्या वजिरास संपूर्णपणे निष्प्रभ केले. प्रत्येक वजिराच्या शहास प्रतिउत्तर तयार असल्याने अंतिम स्थितीत हत्तीच्या मदतीने दक्षने स्पर्धेतील सर्वात सनसनाटी निकालाची नोंद केली, आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोन्ही खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय मानांकनामध्ये ६०० पेक्षा जास्त अंतर आहे.

त्यासोबत तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या पटावर पारस, माधवेंद्रा व जिहानने अनुक्रमे सम्यक धरेवा, निमय गर्ग व प्रथमेश शेर्ला चा पराभव केला. मुलांच्या गटात आठव्या फेरि अखेर ५ खेळाडू साडे सहा गुणांसह संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर असून ५ खेळाडू सहा गुणांसह द्वितीय स्थानावर आहेत.

दरम्यान मुलींच्या गटात पहिल्या पटावर संनिद्धीच्या चुकलेल्या उंटाच्या चालिमुळे पांढऱ्या घरांवरचा तिचा ताबा सुटला, याचा पुरेपूर फायदा उचलत शुभीने आक्रमक चाली रचत डाव आपल्या नावावर केला व स्पर्धेत निर्विवाद आघाडी घेतली. दुसऱ्या पटावर निवेदिता च्या उंटाच्या फ ६ घरावरील चालीमुळे काळा हत्ती कमकुवत झाला आणि त्याचा फायदा उचलत मृत्तिका ने सामना सहजपणे खिशात घातला.

आठव्या फेरीअखेर ७ गुणांसह उत्तर प्रदेशची महिला फीडे मास्टर शुभी गुप्ता आघाडीवर असून मृत्तिका आणि संनिद्धी साडे गुणांसह द्वितीय स्थानावर आहेत. पण अजून ४ खेळाडू ६ गुणांसह तृतीय स्थानांवर असल्याकारणाने महिला गटातील विजेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याचे कोडे सुटण्यासाठी कदाचित अजून तीन फेऱ्यांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

 

अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबाशीष दास यांचे स्पर्धकांना मार्गदर्शन…

तत्पूर्वी सकाळी खेळाच्या सुरुवातीला अनुभूती निवासी स्कूलचे प्राचार्य देबाशीष दास यांनी आपल्या आठवणींचा दाखला देत मुलांशी मुक्तसंवाद साधला. ते म्हणाले, सत्यजित रे यांचा “शतरंज के खिलाडी” या चित्रपटाने प्रेरित होऊन आम्ही चेस कडे वळलो. आता तुमचा उत्साह बघून ते दिवस पुन्हा समोर उभे राहिले. आपल्या बुद्धीने व चातुर्याने बळाचा वापर करा, आणि जग जिंका. असं बोलून त्यांनी सर्व सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी यांच्यासह महाराष्ट्र चेस असोसिएशनचे उपाध्यक्ष फारुख शेख, जळगाव जिल्हा चेस असोसिएशनचे सचिव नंदलाल गादीया, जळगाव जिल्हा चेस असोसिएशनचे खजिनदार अरविंद देशपांडे, चीफ अरबीटर देवाशीष बरुआ आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.