J&K; चकमकी दरम्यान दहशतवाद्यांनी केला स्फोट; ५ जवान शहीद…

0

 

श्रीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील कांडी जंगल परिसरात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे पाच जवान शहीद झाले. यात आधी दोन जवान शहीद झाले त्यात एका अधिकाऱ्यासह चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर आणखी तीन जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उत्तर कमांडच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला, ज्यामध्ये लष्कराचे जवान शहीद झाले.

परिसरात लष्कराची कारवाई सुरू आहे. यावेळी काहीकाळासाठी इंटरनेट सेवाही प्रतिबंधित करण्यात आली आहे. लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, सैन्य दल राजौरी सेक्टरमधील कंडी जंगल परिसरात शोध मोहीम राबवत असताना ही घटना घडली. जम्मू प्रदेशातील भाटा धुरियनच्या तोटा गली भागात मंगळवारी लष्कराच्या ट्रकवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटाचा शोध घेण्यासाठी हे पथक गुप्तचर माहितीच्या आधारे कार्यरत आहे. कांडी जंगलातील दाट झाडी असलेल्या आणि खडकाळ भागात असलेल्या गुहेत दहशतवादी असल्याच्या माहितीच्या आधारे गुरुवारी संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली.

लष्कराच्या उत्तर कमांडने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “राजौरी सेक्टरमधील कंडी जंगलात दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या विशिष्ट माहितीच्या आधारे, 3 मे रोजी संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली. शुक्रवारी सकाळी 7.30 च्या सुमारास शोध पथकाने गुहेत लपलेल्या दहशतवाद्यांच्या गटाला घेरले. त्याला प्रत्युत्तर म्हणून दहशतवाद्यांनी स्फोट केला.”

जवळपासच्या भागातील अतिरिक्त पथके चकमकीच्या ठिकाणी पाठवण्यात आली असून जखमी लष्कराच्या जवानांना उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.