जम्मू-काश्मीरला टरबूज विक्री ; पिळोदा येथील शेतकरी झाला ‘ लखपती ‘!

0

गोकुळ कोळी , लोकशाही न्यूज नेटवर्क

मनवेल ता.यावल-शेतीत विविध असे प्रयोग करून शेती व्यवसाय कसा व किती फायद्याचा आहे याचा प्रत्यय साकळी येथून जवळच असलेल्या पिळोदा येथील शेतकरी अजय गुर्जर- पाटील यांनी आणून दिलेला आहे. आपल्या तीन एकर शेतीत टरबूज पिक घेऊन अवघ्या तीन महिन्यात तब्बल पाच लाखांचे उत्पन्न मिळवून ते लखपती शेतकरी बनले आहे. शेतीतील या अभिनव प्रयोगामुळे खरोखर शेतीला सोन्याचे दिवस आलेले असल्याचे अजय पाटील यांनी केलेल्या अभिनव शेतीतून प्रकर्षाने दिसून येत आहे.सदर शेतकऱ्याने आपल्या शेतातील टरबुज जम्मू-काश्मीरला विकले आहे.

याबाबत सविस्तर असे की, आजचा शेती व्यवसाय विविध अशा संकटातून जात आहे. त्यामुळे शेती व्यवसाय अतिशय आव्हानात्मक बनला आहे.शेती करतांना निसर्गासह इतरही भरपूर संकटे येत असतात.तथापि या सर्व आव्हानांचा व संकटाचा सामना करित शेती किती व कशी फायद्याची आहे ? हे साकळी येथून जवळच असलेल्या पिळोदा ता.यावल येथील प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी अजय हुकूमचंद पाटील यांनी पारंपारिक शेती सोबतच इतरही पिके घेऊन शेतकरी यशस्वी होऊ शकतो हे दाखवून दिलेले आहे.

शेतकरी श्री.पाटील यांनी आपल्या मालकीच्या तीन एकर शेतात दि.१३ डिसें.२०२२ जिग्ना गोल्ड या जातीच्या टरबूज पिकाची लागवड केली.त्यानंतर सदर पिकाला वेळच्यावेळी अंतर्गत मशागत,पाण्याचे नियोजन,कीटकनाशक फवारणी व खतांच्या मात्रेचे नियोजन केले व टरबूजचा मळा फुलविला.टरबूज पिकाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतकरी अजय पाटील यांना शेतकरी हित जोपासणारे डॉ.मुकेश पाटील तसेच पशुरा कंपनी प्रतिनिधी वसंत पाटील ,DCS कंपनीचे प्रतिनिधी धनंजय राजपूत या सर्वांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.तसेच व्यापारी आबा राजपूत यांचेही बहुमोल सहकार्य लाभले.अवघ्या नव्वद दिवसानंतर श्री.पाटील यांच्या शेतातील टरबूज च्या मळ्यात भरघोस व जोमदारपणे टरबुजाचे फळे तयार झाली.त्यानंतर व्यापारांच्या मदतीने टरबूजांना प्रति किलो नऊ रु.दराने जास्तीत-जास्त भाव मिळाला व त्यांच्या शेतातील जवळपास ६५ टन टरबूजचा माल कंटेनर जम्मू-काश्मीरला रवाना झाला.सदर टरबुजाचे पीक घेण्यासाठी तीन एकर शेतासाठी श्री पाटील यांना जवळपास ८० हजार रुपये खर्च आला.त्यात एकूण उत्पन्न ५ लाख ८५ हजार रु.मिळाले असून खर्च वजा जाता शेतकऱ्याला तब्बल पाच लाख रु.नफा मिळून शेतकरी लखपती बनला आहे. टरबूज पिकाचा अजून दुसरा तोडा बाकी असल्याने अजून लाखभर तरी उत्पन्न मिळण्याची आशा श्री पाटील यांना आहे.स्वतः कष्टाने व मेहनतीने शेतातील टरबूज पिकविले व मला त्यात फायदा झाला.याचा मला खूप आनंद आहे.शेती व्यवसाय हा कधीही तोट्याचा नसतोच.तरी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासोबत इतरही पिके घेणे गरजेचे आहे.त्यामुळे आपले जिवनमान बदलून जाते.असे शेतकरी अजय पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.