टक्केवारीचे ‘उड्डाण’ कुणाला देणार ‘भरारी’?

सर्वच पक्षांकडून विजयाचा दावा : 4 जूनला होणार चित्र स्पष्ट

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सोमवारी चौथ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. यात गेल्या वर्षीपेक्षा जळगाव लोकसभा मतदार संघातील टक्केवारीत वाढ दिसून आली. यंदा जळगावमधील मतदानाची टक्केवारी 58 टक्के इतके आहे. गेल्या वर्षी 56 टक्के मतदान झाले होते. एकंदरीत यावर्षी दोन टक्क्यांनी मतदान वाढले आहे. रावेर मतदारसंघात देखील यावर्षी मतदानाची टक्केवारी तब्बल 64 टक्क्यांवर गेली आहे. दोघाही मतदारसंघात टक्केवारीचे हे ‘उड्डाण’ कुणाला ‘भरारी’ देणार हे आगामी काळात ठरणार असले तरी सर्वच राजकीय पक्षांनी आपला विजयी निश्चित असल्याचा दावा केला आहे. नवमतदारांमुळे टक्केवारी वाढली असली तरी त्यात कुणाला लाभ होणार हे महत्त्वाचे आहे.

मतदानाचा वाढलेला टक्का सत्ताधाऱ्यांना की, विरोधकांना फायदेशीर ठरणार, याबाबत चर्चा सुरू झाली असून पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते सोशल मीडीयासह आपसात चर्चा करु लागले आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे उन्मेश पाटील तब्बल साडेचार लाखांच्या फरकाने विजयी झाले होते. मात्र, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. यंदा अशी काही लाट दिसून येत नसली, तरी नरेंद्र मोदी यांच्याच नावावर भाजपने मतदान मागितले. त्यामुळे हा ‘करिष्मा’ कायम ठरल्यास भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो. शिवसेना (उबाठा)ने भाजपचाच व्यक्ती फोडून त्यांना उमेदवारी दिली, तसेच विद्यमान खासदारही विरोधी पक्षात गेले. याशिवाय जळगाव लोकसभा मतदारसंघातील तीन शिवसेनेचे आमदार फुटल्याने उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभुतीही होती. त्यामुळे मतदानाचा वाढलेला टक्का ठाकरे गटालाही फायदेशीर ठरू शकतो अशी चर्चा आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप मित्रपक्ष महायुतीच्या स्मिता वाघ व शिवसेना (उबाठा), मित्रपक्ष महाविकास आघाडीचे करण पवार यांच्यात खरा सामना आहे. मतदारसंघानिहाय मतदान पाहिल्यास करण पवार यांच्या एरंडोल-पारोळा मतदारसंघात तब्बल 61.66 टक्के इतके मतदान झाले. भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या अमळनेर मतदारसंघात 55.94 टक्के मतदान झाले.ही आकडेवारी तशी निकाल ठरविणारी नसली तरी त्यामुळे मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांतील मतदानाचा विचार करावा लागणार आहे. मतदारांचा उत्साह आणि वाढलेला टक्का सत्ताधाऱ्यांना घातक असतो, असे पारंपरिक गणितावरून म्हटले जाते. मात्र, अनेक वेळा हे पारंपरिक गणितही कोलमडून पडल्याचे दिसून येते. वाढलेला मतदानाचा टक्का मतदानाच्या निकालाबाबत संभ्रम ठरविणारा निश्चित आहे. मतमोजणीस तब्बल 20 दिवस शिल्लक आहेत. तोपर्यंत आपल्याकडे कोणाला फायदा, कोणाला तोटा, ही चर्चा होणार आहे. 4 जूनला जनतेचा फैसला कळणार आहे. तोपर्यंत ‘कमळ’ की ‘मशाल’ यांच्या विजयाबाबत अंदाज सुरूच राहणार आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याने महाविकास आघाडीकडून तगड्या उमेदवाराचा शोध होता, तो शोध राष्ट्रवादीने श्रीराम पाटील यांच्या रुपाने संपुष्टात आणून भाजपासमोर आव्हान उभे केले होते. या मतदारसंघात मराठा समाजाचे मतदान जास्त असल्याने श्रीराम पाटील यांना त्याचा लाभ होवू शकतो, तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपाचा प्रचार केल्याने त्याच्या फायदा रक्षा खडसे यांना होवू शकतो. रक्षा खडसे यांनी आपल्या कालखंडात केलेली विकास कामे जनतेसमोर असल्याने त्याचाही फायदा होण्याची शक्यता आहे. रावेर लोकसभा मततदारसंघाची निर्मिती झाल्यापासून येथे भाजपाची एकहाती सत्ता कायम राहिली आहे. यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढल्याने सत्ताधाऱ्यांचे काही प्रमाणावर टेन्शन वाढले आहे अशी चर्चा आहे तर दुसरीकडे वाढलेला टक्का हा नवमतदारांचा असून ते भाजपाच्या बाजूने असल्याचा दावा भाजप नेते करीत आहेत. भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी या मतदारसंघात मोठे कष्ट घेतले असून त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही दोन सभा या मतदारसंघात घेतल्याने त्याचा फायदा होईल  असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. आदिवासी पट्ट्यातही यावर्षी चांगले मतदान झाले आहे. त्याचा फायदा कुणाला होईल हे येत्या 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.