जळगाव रावेर लोकसभेसाठी महाविकासतर्फे नावांची चर्चा..!

0

लोकशाही संपादकीय लेख 

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपतर्फे दुसरी यादी परवा जाहीर करण्यात आली. त्यात जळगाव लोकसभेसाठी माजी आमदार स्मिता वाघ यांची तर रावेर लोकसभेसाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी कापली गेली आणि स्मिता वाघ यांना तिकीट जाहीर झाले. हे अपेक्षितच होते.; कारण खासदार उन्मेष पाटील यांचा स्थानिक राजकारणाने बळी गेला असे म्हणतात.. परंतु रावेरच्या खासदार रक्षा खडसेंचा सुद्धा पत्ता कट होणार, असे गेल्या अनेक दिवसांपासून बोलले जात होते. तथापि भाजपच्या वरिष्ठ पातळी कडून स्थानिक नेत्यांचे म्हणणे डावलून रक्षा खडसेंना उमेदवारी दिली असे म्हणतात.

जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघाच्या संघात भाजपतर्फे महिलांना संधी देण्यात आली आहे. आता विरोधकांतर्फे अर्थात महाविकास आघाडीतर्फे जळगावची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तर रावेरची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे. काँग्रेसतर्फे सक्षम उमेदवार नसल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ही जागा द्यावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंनी ही निवडणूक लढवावी असे गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती. तथापि एकनाथ खडसे यांनी प्रकृती अस्थिरतेचे कारण पुढे करून निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केल्याने राष्ट्रवादीतर्फे इतर सक्षम उमेदवारांचा शोध सुरू केला आहे.

जळगाव लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे निवडणूक लढविण्यास अनेक जण इच्छुक असले तरी ती नावे आता मागे पडल्याने सांगण्यात येत आहे. आता जळगाव लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे अमळनेरच्या एडवोकेट ललिता पाटील यांचे नाव आघाडीवर चर्चेत आहे. अमळनेरच्या एडवोकेट ललिता पाटील या मूळ काँग्रेसी असून त्यांनी काँग्रेसतर्फे अमळनेर विधानसभा मतदार संघात अनेक वेळा निवडणूक लढवली. तथापि त्या एकाही निवडणुकीत निवडून आल्या नाहीत. त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला होता. परंतु भाजपतर्फे त्यांना कुठेच स्थान मिळाले नाही. हे पाहून त्यांनी नुकतेच मुंबईला मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि पाचोर्‍याच्या वैशाली सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना जळगाव लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाते आहे, अशी चर्चा आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे यांच्या माघारी नंतर त्यांच्या कन्या सौ. रोहिणी खडसे खेवलकर यांना राष्ट्रवादी पक्षातर्फे उमेदवारी देण्याचे घाट घातले जात असल्याचे कळते.

सौ. रोहिणी खडसे लोकसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे कळते. आज शुक्रवारी मुंबईत पक्षाची बैठक होणार असून त्या बैठकीत रावेरचा उमेदवार निश्चित होणार असल्याचे कळते. समजा रोहिणी खडसेंना राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी दिली तर नणंद आणि भाऊजाई यांच्यात हा सामना होईल. भाजपने जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात महिलांना उमेदवारी दिली आहे. त्यांचे विरोधात महाविकास आघाडीतर्फे सुद्धा दोन्ही जागांवर महिलांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. असे झाले तर महिलाविरुद्ध महिला अशी निवडणूक रंगू शकते..!

महाविकास आघाडीतर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे माजी खासदार ए टी नाना पाटील यांचे नाव चर्चेत होते. परंतु ए टी नानांचे नाव आता मागे पडले असून एडवोकेट ललिता पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे कळते. एडवोकेट ललिता पाटील यांना काँग्रेस पक्षापासून राजकारणाचा मोठा अनुभव आहे. त्या उच्च विद्या विभूषित आहेत. आर्थिकदृष्टही त्या सक्षम आहेत तसेच त्या मराठा असल्याने जळगाव लोकसभेसाठी शिवसेनेतर्फे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते आहे. तर रावेर लोकसभेसाठी रोहिणी खडसे या स्वतः निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाहीत. तथापि पक्षाचे कार्यकारणीचा कार्यकर्त्यांचा आग्रह खडसे घराण्यातील व्यक्तींसाठी असल्याने पक्षातर्फे काय निर्णय घेतला जातो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपतर्फे रक्षा खडसेंच्या उमेदवारी जाहीर झाल्याने माजी खासदार कै. हरिभाऊ जावळे यांचा गट नाराज असल्याचे कळते. कै. हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे यांना भाजपची उमेदवारी मिळेल ही अपेक्षा होती. तो अपेक्षाभंग झाल्याने एक गट नाराज असल्याचे कळते. त्यातच मुक्ताईनगरचे विद्यमान शिंदे शिवसेना गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे सुद्धा नाराज असल्याचे कळते. त्यामुळे एकंदरीत जळगाव व रावेर लोकसभा निवडणुकीत महिला उमेदवारांमध्ये निवडणूक रंगणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत…!

Leave A Reply

Your email address will not be published.