रजनीकांत पाटील, जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर रेल्वे पूर्ण क्षमतेने धावत आहे. जळगाव रेल्वे स्थानकावरून दररोज मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्या ये-जा करतात. यामुळे येथे प्रवाशांची मोठी गर्दी असते. मात्र, अनेक प्रवासी हे एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी बेफिकीरपणे रूळ ओलांडताना दिसतात.
अशा प्रकारामुळे अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो, तर काही जीव गमावून कायमचे अपंगत्व आल्याच्या घटना घडल्या आहेत. रेल्वे स्थानकावरील ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून रेल्वे अधिकाऱ्यांकडून वारंवार प्रवाशांना रुळावरून जाऊ नये, जिन्याचा वापर करावा असे आवाहन केले जात असतानाही याकडे प्रवाशांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे गाडी येत असताना प्रवाशांकडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी असे प्रकार सर्रास पाहायला मिळत आहेत.
मात्र, अशा प्रवाशांवर ड्यूटीवर असलेल्या रेल्वे पोलिसांकडून आणि अधिकाऱ्यांकडून कारवाई होणे अपेक्षित असताना तसे होताना दिसून येत नाही. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवासाच्या आधी अर्धा तास अगोदर रेल्वे स्टेशनवर यावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येते.
नियमानुसार रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या व्यक्तीला दंड आकारण्यात येतो. त्याचबरोबर त्यास न्यायालयासमोर हजर केल्यानंतर गुन्ह्याच्या स्वरूपानुसार सहा महिने कैद व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते. कोरोना काळात दोन वर्षे रेल्वे बंद होत्या. या कालावधीत कारवाई झाली नाही.
मंगळवार दि. ७ जून रोजी सायंकाळच्या सुमारास जळगाव रेल्वेस्थानकावर रेल्वे रूळ ओलांडतांना अलोट गर्दी दिसून आली. मात्र याकडे रेल्वे पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.