एकनाथ खडसेंचा पोलिस ठाण्यात ठिय्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्हा दूध संघातील (Jalgaon Dudh Sangh) अपहार प्रकरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथराव खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांनी जळगाव जिल्हा दूध संघात कोट्यावधींची चोरी झाल्याचा आरोप केला होता.  या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी एकनाथराव खडसे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह कालपासून जळगाव शहर पोलीस स्टेशन (Jalgaon City Police Station) बाहेर आंदोलन करत आहेत.

दरम्यान जिल्हा दौर्‍यावर आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आंदोलनाला भेट दिली. याप्रसंगी जयंत पाटील यांनी पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे आणि एकनाथराव खडसे यांच्या सोबत चर्चा केली. यानंतर त्‍यांनी माध्‍यमांशी संवाद साधला.

पोलीस प्रशासनावर सत्ताधार्‍यांचा दबाव

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, या प्रकरणी न्यायालयात जाण्यासह सर्व मार्गांचा अवलंब करण्यात येणार आहे. दूध संघात अपहार नव्हे; तर चोरी झाली आहे. यामुळे तात्काळ गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. मात्र पोलीस प्रशासनावर सत्ताधार्‍यांचा दबाव असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

वातावरण चांगलेच तापले

जिल्हा दूध उत्पादक संघात १४ टन लोण्यासह दूध भुकटीची बेकायदेशीररीत्या विल्हेवाट सव्वा कोटीची अफरातफर केली. याप्रकरणी कार्यकारी संचालकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल न झाल्याने माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंनी गुरुवारी (ता.१३) शहर पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. दुपारी ४ वाजेपासून पोलिस ठाण्यात दाखल खडसे रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होते. दरम्यान, याच प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्याची मागणी करण्यासाठी भाजपचे आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळेही दाखल झाल्यामुळे पोलिस ठाण्यातील वातावरण चांगलेच तापले.

नेमकं प्रकरण काय ?

११ ऑक्टोबरला दूध संघाचे अधिकारी संदीप झाडे, स्वप्नील कार्ले, नितीन पाटील, एन.व्ही.पाटील, प्रशांत बावस्कर, अशांनी दूध भुकटी (पावडर)ची तपासणी केली असता ९ मेट्रीक टन मालाची तफावत आढळून आली. लोणी व भुकटी प्रकरणात तब्बल १ कोटी ते १ कोटी ३५ लाखांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याआधारे जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ मर्यादित यांच्या विक्री विभागातील अधिकारी अनंत अंबिकर, महेंद्र नारायण केदार, कामगार ठेका अंतर्गत सहाय्यक सुनील चव्हाण अशांनी संगनमत करून १४ टन बटर(लोणी)च्या खोट्या नोंदी घेतल्या तसेच ९ टन दूध पावडरची परस्पर विल्हेवाट लावून १ ते १ कोटी ३५ लाखांचा अपहार केल्याचा जबाब सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी यांनी घेतला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.