Saturday, January 28, 2023

उद्योग व्यवसायाचे मर्मस्थान : जाहिरात संस्था

- Advertisement -

 

जाहिरात म्हणजे काय ? विक्रेत्याला ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी उपलब्ध असलेल्या माध्यमातून प्रसृत केलेला संदेश. जाहिरात कितीतरी प्रकारात करता येते. कधी ती छापील माध्यमात असते तर कधी इलेक्ट्रॉनिक माध्यमात असते. तर आता सोशल मिडिया हे जबरदस्त माध्यम जाहिरातीसाठी सापडले आहे. ते इतके प्रभावी आहे कि सोशल मिडीयाचा जनमानसावरचा पगडा दाखवणाऱ्या जाहिरातीतून, आपल्या सगळ्यांच्या गळ्यातला ताईत असलेले गुगल महाराज सर्वसामान्यांच्या डोळ्यात सहज आसू आणतात. कुठलीही माहिती फक्त बोटाच्या टीपेवर. त्यामुळे अद्ययावत माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, ट्वीटर, यु ट्यूब हे सोशल मिडियाचे पर्याय आहेतच.

माणूस म्हणजे अनेक प्रकारच्या भाव भावनांचे आगर आहे. या भावनाना हात घालण्याचं काम जाहिरात कला करते. योग्य वेळी योग्य भावना प्रज्वलित करणं तेही विविध माध्यमातून. याला नक्कीच प्रचंड सृजनशीलता लागते. या एकाच कलेत बाकीच्या सगळ्या कला एकवटल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळेचं बंधन. दोन अडीच तास, एक तास चालणाऱ्या फिल्म मध्ये संदेश द्यायला, अभिनय करायला, मजकुराला खूप वाव असतो. पण काही सेकंद किंवा मिनिट दोन मिनिटांच्या जाहिरात फिल्म मध्ये सगळ्याच गोष्टीतलं सृजन एकवटायला लागतं, अगदी संदेशासहित !

- Advertisement -

१४ ऑक्टोबर १९०५ ला “बी. दत्ताराम” या नावाने दत्ताराम बावडेकर यांनी मुंबईला त्यांची स्वत:ची जाहिरात संस्था सुरु केली. ही पहिली जाहिरात संस्था. तो दिवस ‘राष्ट्रीय जाहिरात दिन’ म्हणून ओळखला जातो. जाहिरात संस्थेच स्थान आपल्या अर्थकारणात, व्यवसाय क्षेत्रात अत्यंत महत्वाच आहे. पण काही छोटे व्यावसायिक किंवा उद्योजक कोणत्याही जाहिरात संस्थेची मदत न घेता स्वत;ची जाहिरात स्वत:च करायची ठरवतात. जाहिरात संस्था ही कोणत्याही कंपनी, उद्योग व्यवसाय यासाठी एक दिशादर्शक, मार्गदर्शक, भविष्यातील व्यवसायाच्या अनेक योजनांचे पर्याय सांगणारी एक संस्था असते. ज्यामुळे कंपनीला पुढचे पाउल काय आणि कसे टाकायचे याचा अंदाज येतो.

जाहिरात करताना प्रामुख्याने तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागते. एक म्हणजे आपला ग्राहकवर्ग कोणता आहे, आपल्याला जाहिरात कशासाठी करायची आहे, आणि ग्राहकांपर्यंत आपण कोणत्या मार्गाने पोहोचू शकतो. जाहिरात संस्थेत कोणत्याही जाहिरातीचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा ती तयार करण्यासाठी तीन लोकांची किंवा वर्गाची गरज असते. अकौंट मॅनेजर, कॉपी रायटर आणि आर्ट डायरेक्टर.

पण जेव्हा एखादी जाहिरात संस्था आपल्या क्लायंटच्या जाहिरातीसाठी काम करत असते तेव्हा कोणत्या माध्यमासाठी जाहिरात अधिक उपयुक्त ठरेल आणि क्लायंटच्या बजेटमध्ये कशी बसेल हे ती पाहते. आपल्या क्लायंटची प्रतिमा (ब्रॅन्ड) जनमानसात कशी निर्माण होईल हे जाहिरात संस्था पाहत असते. उद्योग व्यवसायाला त्याच्या त्याच्या गरजेनुसार जाहिरात निर्मितीपासून ते उत्पादन वितरणापर्यंत कुठलेही काम, सेवा उपलब्ध करून देऊ शकेल अशी जाहिरात संस्था शोधण महत्वाचं असत. क्लायंटच्या पैशाचा विनियोग करताना त्याचं हित संभाळण आणि क्लायंटला योग्य, अनुरूप जाहिराती तयार करून देऊन त्या योग्य वेळी आणि योग्य माध्यमातून प्रसिद्ध करण महत्वाच असते.

जाहिरातीच माध्यम ठरवताना त्या त्या माध्यमाचे फायदे कोणते आहेत आणि त्याच्या मर्यादा काय आहेत हे जाहिरात संस्थेला पाहावे लागते. बाजारपेठेतल्या वाढत्या स्पर्धेला तोंड द्यायला जाहिरात संस्थेचे अस्तित्व अनिवार्य ठरते. व्यवसायातील उत्पादन आणि सेवा यांची चढत्या भाजणीने प्रगती करण्यासाठी जाहिरात संस्था हा महत्वाचा दुवा आहे. कंपनीच्या किंवा व्यवसायाच्या धोरणात्मक नियोजनासाठी जाहिरात संस्था महत्वाचे काम करते. उत्पादनाच्या जाहिरातीची नवीन मोहीम राबवण्याचे काम जाहिरात संस्था करते. एखाद्या शिंप्याने शरीराच्या तंतोतंत मापाचा अंगरखा शिवावा तसा जाहिरात कंपनी आपल्या क्लायंटच्या उत्पादनाची अशी जाहिरात करते कि त्यायोगे त्या उद्योगाला उत्पादन विक्रीतून बराच फायदा होतो. कंपनीच्या ब्रॅन्डचे योग्य रीतीने मार्केटिंग करणे ही जाहिरात संस्थेची खासियत असते.

वाढत्या, स्पर्धात्मक जगात टिकाव धरण्यासाठी कंपनीच्या ध्येय धोरणात जाहिरात एजन्सी महत्वाची भूमिका बजावते. आपला उद्योगधंदा वाढवण्याच्या दृष्टीने, व्यवसाय यशस्वी करण्यासाठी विपणन (मार्केटिंग) आणि जाहिरात (advertising )ही दोन महत्वाची अंगे आहेत हे उद्योजकाला नक्की माहित असते. त्यामुळे ‘जाहिरात’ हे तत्व लक्षात ठेवूनच जाहिरात संस्था ही त्या उद्योग व्यवसायाच्या यशाच्या मार्गावर वाटचाल करण्याच्या दृष्टीने, ब्रॅन्ड विकसित करण्याच्या दृष्टीने पावले टाकत असते. जाहिरात मोहीम राबवण्याच्या दृष्टीने जाहिरात संस्थेचे विचार मंथन, काम चालू असते.

कंपनीची वेब साईट बनवणे, धंद्याचा विकास करणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे याबाबतीत जाहिरात संस्था योग्य रीतीने मार्गदर्शन करते. जेणेकरून तुमची वेबसाईट भावी ग्राहकांचे लक्ष वेधून घेईल. सोशल मिडियामध्ये जेव्हा जाहिरात संस्था तुमच्यासाठी काम करते तेव्हा तुमच्या व्यवसायाचे कंटेंट क्रिएशन (माहिती) निर्माण करण्याचे मोलाचे काम एजन्सी करत असते. ब्लॉग पोस्ट, सोशल मेडिया कंटेंट, ई बुक्स, केस स्टडीज या द्वारे व्यवसायाचा ऑनलाईन ब्रॅन्ड विकसित करण्यासाठी एजन्सीचा हातभार लागतो. आता व्हॉट्स अॅपवर किंवा इंस्टाग्रामवरच बघा, एखादा अपघात, कुणीतरी एखाद्या क्षेत्रात केलेली विशेष कामगिरी, नामवंत कलाकारचे, नेत्याचे निधन, ही बातमी रेडीओ, टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातल्या बातमी आधी सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांना समजते.

कधी कधी उद्योजकाला किंवा कंपनीला इन हाउस सोशल मेडिया हाताळणे सोपे वाटत असले तरी ते प्रत्यक्षात वेळखाऊ काम आहे. शिवाय त्यासाठी थोडे हटके प्रयत्नही करावे लागतात. हेच काम जर जाहिरात संस्थेकडे सोपवले तर कंपनी ‘सोशल मेडिया’ ही बाजू सांभाळण्यासाठी एजन्सीवर अवलंबून राहू शकते. फारतर योग्य त्या सूचना कंपनी अधिकारी किंवा मालक या बाबतीत करू शकतात. यासाठी उत्पादनावरचे केंद्रित केलेले लक्ष ढळू द्यायची गरज नसते. तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी आहे, ती योग्य आहे किंवा नाही यावर उपलब्ध साधनांच्या सहाय्याने (resources), सॉफ्टवेअर, विश्लेषक (analytics) च्या मदतीने जाहिरात एजन्सी रिपोर्ट देऊ शकते. त्यामुळे मार्केटिंगची स्ट्रॅटेजी ठरवणे, त्यात योग्य ते फेरफार करणे हे सहज शक्य होते. व्यवसाय संदर्भातील अनेक प्रकारची माहिती (data) एजन्सीकडून मिळू शकतो. त्यामुळे बिझिनेस मॉडेल ठरवताना त्याचे विश्लेषण करून त्यानुसार बिझिनेस प्लॅन बनवता येतो.

त्यामुळे कोणत्या प्रकारची जाहिरात करायची आहे, त्या प्रकारच्या जाहिरात संस्थेची कंपनीने किंवा व्यावसायिकाने निवड करावी लागते. कारण जाहिरात संस्थेच्या सर्जनशीलतेवर व्यवसायाचा भावी जाहिरातीचा प्लॅन अवलंबून असतो. त्यामुळेच एक दिशादर्शक म्हणून कंपनी, उद्योग, व्यवसाय यांच्यासाठी, त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी जाहिरात संस्थेला मोलाचे स्थान आहे.

सविता नाबर

(लेखिका जाहिरात क्षेत्रातील तज्ञ असून एका जाहिरात संस्थेच्या संचालिका आहेत.)

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे