ब्रेकिंग ! जळगावात पुन्हा भाजपला खिंडार ?

काही नगरसेवक उबाठाच्या गळाला

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असून जळगावात चांगलेच राजकारण तापले आहे. उन्मेष पाटलांनी भाजपला रामराम करून ठाकरे गटात प्रवेश केल्याने भाजपला मोठे खिंडार पडले आहे. त्यातच आता जळगावात पुन्हा भाजपाला खिंडार पडणार असून काही नगरसेवक उबाठाच्या गळाला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

जळगावात राजकीय भूकंप?

भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्याने उन्मेष पाटलांनी ठाकरे गटात प्रवेश करून त्यांचे सहकारी करण  पवार यांना लोकसभेचं तिकीट मिळवून दिलं. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसलेला असून ठाकरे गट जळगावमध्ये भाजपला आणखी मोठं खिंडार पाडण्याच्या तयारीत आहे. भाजपच्या 30 नगरसेवकांवर ठाकरे गटाने जाळं फेकलं आहे. जळगावात बंद दाराआड या बैठका होत आहेत. अशाच एका बंद दाराआड झालेल्या बैठकीचा फोटो व्हायरल झाल्याने जळगावात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

इज्जत घालू नका

जळगावातील महापालिकेत लोकप्रतिनिधी असलेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर भाजपचे 30 पैकी जास्तीत जास्त नगरसेवक फोडण्याची मोठी जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे. ठाकरे गट नगरसेवक फोडण्याच्या तयारीत असल्याची बातमी फुटली. त्यानंतर मंत्री गिरीश महाजनांनी तातडीने भाजपच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना पक्षातच राहण्याच्या सूचना दिल्याचं सांगितलं जात आहे. या बंद दाराआड झालेल्या बैठकीत महाजन यांनी नगरसेवकांना पक्ष सोडू न देण्याची तंबी देण्यात आली असून महाजन यांनी नगरसेवकांची झाडाझडती घेतल्याचंही सांगण्यात आलं आहे. प्रत्येक नगरसेवकांना मतांचं टार्गेट दिल्याचं बोललं जातंय. तुमच्या मतदारसंघातून मताधिक्य मिळालं तरच तुम्हाला महापालिकेचं तिकीट देऊ, नाही तर नाही. त्यामुळे तुम्हाला मताधिक्य द्यावच लागणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच ज्या वार्डातून मताधिक्य मिळणार नाही, त्या वॉर्डातील उमेदवार बदलणार अन् त्या नगरसेवकाला कामही मिळणार नाही. महापौर पदाच्या निवडणुकीवेळी जशी दुसऱ्या पक्षात जावून इज्जत घालवली, तशी पुन्हा माझी इज्जत घालू नका, असे महाजन यांच्याकडून नगरसेवकांना दम दिला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.