अतिक्रमणवरील हातोडा असाच कायम ठेवा

0

लोकशाही संपादकीय लेख

जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीनंतर कोर्टामार्फत पुन्हा आयुक्त पदी रुजू झाल्या. जळगाव महापालिकेच्या आयुक्त पदाची नव्याने सूत्रे हाती घेताच त्यांनी अजिंठा चौफुली चौक आणि परिसरातील अतिक्रमणाचा पोलीस बंदोबस्तात सफाया केला. यामुळे संपूर्ण अजिंठा चौक ते एसटी वर्कशॉप पर्यंत रस्ता पूर्णपणे मोकळा श्वास घेत आहे. त्याबद्दल आयुक्त विद्या गायकवाड यांनी अतिक्रमण हटाव संदर्भात सुरू केलेल्या कडक कारवाई बद्दल त्यांचे अभिनंदन. परंतु आयुक्तांनी फक्त अजिंठा चौक आणि परिसरातील अतिक्रमण काढून थांबता कामा नये. शहरातील इच्छा देवी चौक परिसर, आकाशवाणी चौक परिसर आणि अजिंठा चौक ते कालिंका माता चौकापर्यंतचे अतिक्रमण उठवले पाहिजे. तरच खोटे नगर ते कालिंका माता मंदिर चौकापर्यंत तयार करण्यात आलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणावर वाहनधारकांना आपली वाहने चालवणे सुलभ होईल. अन्यथा अतिक्रमणामुळे अपघाताची मालिका सुरूच राहील आणि या अपघातात किड्या मुंग्यांसारखी माणसे चिरडली जातील यात मात्र शंका घेण्याचे कारण नाही. तसेच खोटे नगर ते कालिंका माता मंदिर चौकापर्यंत काढलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी महापालिका अतिक्रमण विभागातर्फे नियमितपणे याचे पेट्रोलिंग असावे. म्हणजे अतिक्रमण पुन्हा होणार नाही.

खोटे नगर ते कालिंका मंदिर चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण झाले. ‘महामार्गाचा भाग पालिकेच्या अंतर्गत येत असून त्याचे अधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाला आहेत. त्यामुळे महापालिकेकडून आमच्यावर कारवाई होऊ शकत नाही, त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हवे’ असा नवा कायदेशीर मुद्दा अजिंठा चौक ते कालिंका माता मंदिर चौकापर्यंत महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणधारकांनी पुढे केला. तेव्हा महापालिकेच्या अतिक्रमणावरील कारवाईत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी असल्याचे सांगून ते अधिकारी पुढे झाले. मात्र ‘जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश दाखवा’ असा नवीन मुद्दा पुढे करून अतिक्रमणावर कारवाई रोखली आणि त्याही पुढे जाऊन ‘जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले आहे, की मी तसा आदेश दिलेला नाही,’ असे सांगताच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आणि महापालिका अतिक्रमण हटाव विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी अवाक झाले. कायदे करण्यापेक्षा कायदे मोडणारे चालक असतात, हे कालच्या मुद्द्यांवरून दिसून आले. परंतु जिल्हाधिकारी साहेबांनी खरंच ‘मी तसा आदेश दिलेला नाही’ असे या अतिक्रमण धारकांना म्हटले असेल का? हा खरा संशोधनाचा प्रश्न आहे. एकंदरीत महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यात समन्वयानंतरच अशा प्रकारची धडक कारवाई महापालिकेतर्फे केली पाहिजे याची नोंद यापुढे महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी घेतली पाहिजे, असे आम्हाला वाटते…!

जळगाव शहरातील खड्ड्यांच्या रस्त्यांमुळे आधीच जळगावकर नागरिक त्रस्त झाले असताना अतिक्रमणामुळे रस्ते व्यापणाऱ्या अतिक्रमणधारकांमुळे मोठी डोकेदुखी झालेली आहे. आयुक्त विद्या गायकवाड यांनी शहरातील अतिक्रमण हटावची कारवाई थांबवू नये. याचे योग्य नियोजन करून संपूर्ण जळगाव शहर अतिक्रमण मुक्त केले, तर जळगावकर नागरिक त्यांना धन्यवाद देतील. अतिक्रमणधारकांचे पोट त्यांच्या व्यवसायावर अवलंबून असते. मोठ-मोठी पक्की दुकाने घेऊन त्यांना व्यवसाय करणे शक्य नसते. म्हणून माणुसकीचा विचार सुद्धा झाला पाहिजे. त्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात हॉकर्स झोन तयार करून त्या झोनमध्ये त्यांनी आपला व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, म्हणजे शहरवासीयांची सुद्धा गैरसोय होणार नाही आणि अतिक्रमणधारकांचाही व्यवसाय चालू राहील. जळगाव शहरातील नेहरू चौक परिसरात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत लोटगाड्यांवरील व्यावसायिक आपले विविध प्रकारचे खाद्यपदार्थ व ठेलागाडी लावीत असत. त्यामुळे नेहरू चौक परिसरात सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत रस्त्यावर एकच गर्दी असायची. परंतु त्याच्यासाठी महापालिकेला लागून असलेल्या गल्लीची जागा देण्यात आली.

तत्कालीन जिल्हाधिकारी आणि तत्कालीन आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी ही जागा देण्याचे जाहीर केले. परंतु या गल्लीत आमचा व्यवसाय चालणार नाही, हे कारण पुढे करून त्या गल्लीत जाण्यास नकार दिला होता. परंतु प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचे सांगितल्यावर आणि या गल्लीला ‘खाऊ गल्ली’ असे नाव देण्याचे जाहीर केल्यानंतर अतिक्रमण धारक व्यावसायिक मोठ्या मुश्किलीने तयार झाले. त्यानंतर आज ती गल्ली खाऊ गल्ली म्हणून सुप्रसिद्ध आहे. नागरिक तेथे मोठी गर्दी करतात. नंबर लावून त्यांना थांबावे लागते. त्यामुळे अतिक्रमण धारकांसाठी हॉकर्स झोन तयार करून शहरात होणारी अनावश्यक गर्दी टाळली पाहिजे. तेव्हाच ‘आयुक्त विद्या गायकवाड तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ असे जळगावकर म्हणतील आणि तुम्हाला सहकार्य करतील यात शंका नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.