साकळी ग्रामपंचायतीवर प्रशासकराज

0

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क

साकळी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यकारणीची मुदत नुकतीच संपलेली असून सदर साकळी ग्रामपंचायतीवर आता प्रशासकराज सुरू झालेले आहे. त्यासंबंधीचे पत्र जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतीला प्राप्त झालेले आहे. ग्रामपंचायतीची हंगामी पंचवार्षिक निवडणूक झाल्यानंतर नवीन पदाधिकारी कार्यकारणी अस्तित्वात येईपर्यंत प्रशासकराज असणार आहे. जर मे महिन्यात निवडणूक झाल्यास साकळी ग्रामपंचायतीवर जवळपास तब्बल तीन महिन्यांच्या जवळपास प्रशासकराज असणार असून सदर ग्रामपंचायतीवर मोठ्या कालावधीकरिता प्रशासक राज्य येण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.

साकळी ता. यावल येथील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य या पदाधिकारी कार्यकारणीची मुदत दि. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी संपुष्टात आलेली असून सदर ग्रामपंचायतीवर दि.५ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रशासकराजची नेमणूक करण्यात आलेले आहे. जा.क्रं./ ग्रा.पं./वि.अ./ आरआर/१३/२०२३ ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद, जळगाव दि.२४/१/२०२३ या संदर्भीय पत्रानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडून सदर ग्रामपंचायतीला प्रशासकराज लागू झाल्यासंदर्भात आदेशित पत्र प्राप्त झालेले आहे. त्यानुसार साकळी ग्रामपंचायतीवर प्रशासक अधिकारी म्हणून यावल पं.स. विस्ताराधिकारी (ग्रा.पं.) के.सी.सपकाळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर प्राप्त पत्रानुसार, प्रशासकराज मध्ये प्रशासक अधिकाऱ्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३५ (३) नुसार जे अधिकार कर्तव्य सरपंचास प्राप्त होते ते अधिकार व कर्तव्य प्रशासक अधिकाऱ्यांना असणार आहेत. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कराची वसुली १००% करण्याकरीता उपाययोजना करावी लागणार असून पंचायत राज शिफारशी नुसार कराची वसुली ७०% पेक्षा कमी असता कामा नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. शासनाच्या सर्व योजनाची अंमलबजावणी शासन निर्णय व नियमानुसार करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नामधुन सार्व. आरोग्य, पाणीपुरवठा, दिवाबती, तसेच कर्मचारी वेतनवर खर्च करावा लागणार आहे.

तसेच ग्रामपंचायतीचे करवसुली रक्कमेतुन पाणीपुरवठा इलेक्ट्रिक बिल भरणा, ५% दिव्यांग खर्च, १०% महिला बाल कल्याण खर्च, २०% मागासवर्गीय खर्च, मागील अनुशेष सह प्राधान्याने करावी लागेल. ज्या दिवशी सार्वत्रिक निवडणुक होऊन नियमानुसार नविन ग्रामपंचायत कार्यकारणी अस्तित्वात येईल त्या दिवसापासुन प्रशासकपद व त्यांचे अधिकार तात्काळ संपुष्टात येईल. सदर ग्रामपंचायतीवर प्रशासकराज येण्याची पहिलीच वेळ असून ही ऐतिहासिक बाब ठरणार आहे.

प्रशासक अधिकाऱ्यांकडून गावाच्या अपेक्षा

साकळी गाव मोठ्या लोकसंख्येचे गाव असून गावात एकूण सहा प्रभाग आहे. मुख्य गावात जवळपास ५० ते ६० वाडे- वस्त्या असून गावाच्या आजूबाजूला नवीन प्लॉट वस्त्या आहे. त्यामुळे गावाचा व्याप लक्षात घेता गावात वेळोवेळी अनेक मूलभूत समस्या निर्माण होत असतात. त्याचप्रमाणे येत्या काळात उन्हाळ्याच्या कालावधीत पाणीटंचाईची सुद्धा समस्या निर्माण होत असते. या समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन नेहमी सतर्क गरजेचे असते. त्याचप्रमाणे गावात पंधराव्या वित्त आयोगातून विविध विकास कामे सुरू आहे. ही सर्व कामे सुरळीत सुरू राहावी तसेच नागरी समस्याही वेळोवेळी सुटाव्या यासाठी प्रशासक अधिकाऱ्यांकडून नागरिकांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहे. त्याप्रमाणे साकळी ग्रामपंचायतचे प्र. ग्रामविकास अधिकारी हेमंत जोशी हे सुद्धा प्रशासक अधिकाऱ्यांच्या मदतीला असणार आहे. हेमंत जोशी हे साकळी गावाचे स्थानिक रहिवासी असल्याने गावाच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रशासक अधिकाऱ्यांना जोशी यांची खूप मोठी मदत होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.