‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपट पाहता येणार OTT प्लॅटफॉर्मवर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सायली संजीव (Sayali Sanjeev) हिने पात्र साकारलेल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाने 68 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात (National Award Ceremony) सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा बहुमान मिळवला होता. प्रेक्षकांसोबतच समिक्षकांनीही या चित्रपटांचं कौतुक केलं. या चित्रपटात पैठणीचं एक सामान्य स्वप्न पाहणाऱ्या असामान्य गृहिणीची कथा दाखवण्यात आली आहे. ही पैठणीची खास गोष्ट आता प्रेक्षकांना ‘ओटीटी प्लॅटफॉर्मवर’ पाहता येणार आहे. प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट स्ट्रीम होत आहे. विशेष म्हणजे यासाठी प्रेक्षकांना संपूर्ण सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नसेल.

व्हिडीओ ऑन डिमांड
प्रेक्षकांना काही ठराविक पैसे भरून सायली संजीवचा ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट पाहता येणार आहे. प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर व्हि.ओ.डी. म्हणजेच व्हिडीओ ऑन डिमांड हे फिचर आहे. असा प्रकार मराठी ओटीटीमध्ये पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांचे आवडते चित्रपट, वेब सीरिज, नाटकं पाहण्यासाठी संपूर्ण सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नसेल.

सायली संजीवची प्रतिक्रिया
“या चित्रपटाविषयी मला अनेक चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. माझ्या इंद्रायणी या व्यक्तिरेखेत त्यांनी स्वत:ला शोधल्याचं सांगितलं. माझ्यासाठी हा क्षण खूप मौल्यवान आहे. आता हा चित्रपट माझ्या वाढदिवसाच्या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होतोय. त्यामुळे माझ्यासाठी ही सर्वांत सुंदर भेट आहे”, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री सायली संजीवने दिली.

गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंह, पियुश सिंग, सौरभ गुप्ता यांनी केली आहे. तर अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती-विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचं लेखन, संवाद आणि दिग्दर्शन शंतनू रोडे यांचं आहे. अभिनेत्री सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक- गोडबोले, अदिती द्रविड यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.