महापालिका प्रशासनाच्या कामाचा अजब प्रकार

0

लोकशाही संपादकीय लेख

जळगाव शहरातील रस्त्याच्या कामाला वेग आला असला तरी गेल्या अनेक वर्षापासून खेडी मधील मुख्य रस्ता सर्वे क्रमांक ६२/१/१ मधील राष्ट्रीय महामार्ग ते मनपा शाळा दरम्यान डीपी रोड हा करण्याबाबत मनपातर्फे चालढकल केली जात आहे. हा रस्ता खेडे येथील मुख्य रस्ता असताना त्या रस्त्यावरून खेडीवासीयांना चालणे कठीण झाले आहे. हा रस्ता तयार होत नसल्याने गटारी बांधल्या जात नाही. त्यामुळे घरातील सांडपाणी रस्त्यावर येऊन घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, तेथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर मुख्य रस्त्यावर अतिक्रमणे असल्याने ती अतिक्रमणे काढल्याशिवाय नगर रचना विभागातर्फे रस्त्याची आखणी केली जाऊ शकत नाही. नगररचना विभागाकडून जोपर्यंत रस्त्याची आखणी व मोजमाप करून मिळत नाही, तोपर्यंत बांधकाम विभागाला रस्त्याचे काम करता येत नाही. असा प्रकार गेल्या वर्षभरापासून खेडी मधील रहिवासी सहन करत आहेत. या रस्त्याबाबत मनपाकडे पाठपुरावा केला जात आहे. खेडीच्या रस्त्यांच्या पाठपुराव्याला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या जात आहेत. महानगरपालिकेत अतिक्रमण विभाग, नगर रचना विभाग तसेच बांधकाम विभागाशी सातत्याने अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना लेखी निवेदन देण्यात आले. प्रत्येक लोकशाही दिनात खेडी वासिय जाऊन आपले गाऱ्हाणे मांडतात, तक्रारी करतात. परंतु मनपाच्या आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर विद्या गायकवाड यांची संबंधित विभागाचे अधिकारी दिशाभूल करतात आणि प्रकरण जैसे थे पडून राहते. मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढले गेले तरी तेथे नव्याने अतिक्रमण पुन्हा तयार झाले. पावसाळा संपल्यावर तात्काळ या डीपी रोडच्या कामाला सुरुवात केली जाईल असे बांधकाम विभागाचे अभियंता सोनगिरी यांनी खेडी व्यवसायांना आश्वासन दिले होते. तरी त्यांच्यावर विश्वास न ठेवता खेडीवासीय नागरिक जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांची भेट घेऊन रस्त्याच्या सदर कामाबाबत तक्रार करून सदर रस्ता करण्याबाबत विनंती केली. तेव्हा महानगरपालिके कडे निधी नसल्याने जिल्हा नियोजनाच्या आमदार फंडाच्या निधीतून हा रस्ता करावा अश्या सूचना आमदार राजू मामा भोळे यांनी बांधकाम विभागाचे अभियंता सोनगिरे यांना दिली होती. त्यादृष्टीने प्रकरण मनपा बांधकाम विभागा तयार करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्याने त्याचे काम करण्याबाबत मनपा बांधकाम विभागाने प्रकरणही तयार केले, असे सांगण्यात येते. परंतु मनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वादामुळे रस्त्याचे प्रकरण प्रशासनाकडे एनओसी साठी पडून असल्याचे सांगितले जाते. अद्याप या रस्त्याचे वर्क ऑर्डर निघालेले नाही. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली तर आचारसंहितेमुळे रस्त्याचे काम होऊ शकणार नाही, असे कारण देऊन मनपा महानगरपालिकेतर्फे बोळवण करण्यात येईल. महानगरपालिकेच्या कामकाजाचा ही अजब नमुना म्हणता येईल.

दोन दिवसांपूर्वी सदर डीपी रोडच्या बांधकामासाठी रस्त्याचे साफसफाईकरण करण्यासाठी बांधकाम विभागातर्फे कर्मचारी जेसीबी घेऊन रस्त्यावर पोहोचले तर अतिक्रमण वाल्यांनी या कर्मचाऱ्यांना सपाटीकरण करण्यापासून रोखले. त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवले. या संदर्भात बांधकाम विभागाचे अभिनेता सोनगिरे तसेच सहाय्यक अभियंता अमृतकर यांना खेडी वासियातर्फे संपर्क साधून कळविले तर त्यांच्यातर्फे अतिक्रमण विभाग पोलिसांचे सहकार्य घेऊन ते अतिक्रमण काढण्यास येतील असे सांगून बोळवण केली. पाच दिवस झाले तरी अद्याप अतिक्रमण विभागाचे कर्मचारी अतिक्रमण करण्यासाठी फिरकले सुद्धा नाही. याबाबतीत आमदार राजू मामा यांच्याकडे हा प्रकार सांगितला असता त्यांनी सांगितले ‘मनपा बांधकाम विभागाशी संपर्क साधून सूचना करतो’ असे सांगितले. पुढे काय झाले ते कळत नाही. परंतु खेडीतील डीपी रोडचे काम अद्याप सुरू झालेले नाही. अशा प्रकारे टोलवाटोलवी चालू आहे. महापालिकेच्या या अजब प्रकाराबाबत आता खेडीवासीय आक्रमक झाले आहे. त्यांच्या आक्रमकपणाचा केव्हा उद्रेक होईल हे सांगता येत नाही. आणि तो झालाच तर त्याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिकेची राहील एवढे मात्र निश्चित…!

Leave A Reply

Your email address will not be published.