महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा रुग्णांना मिळाला लाभ

0

पालकमंत्र्यांनी केला “शावैम” च्या अधिष्ठातांसह टीमचा गौरव

जळगाव ;- महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत या वर्षी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयचा प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्यासह रुग्णालयाच्या टीमने हा पुरस्कार स्वीकारला.

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांना सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. वर्षभरात एकूण ९५० रुग्णांना या योजनेअंतर्गत विनामूल्य शस्त्रक्रिया आणि उपचार शासकीय रुग्णालयात करण्यात आलेले आहेत.

शासकीय रूग्णालयात एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवण्यात येतात. जास्तीत जास्त रुग्णांनी या योजनांचा लाभ घ्यावा यासाठी शासकीय रूग्णालय प्रशासन नेहमीच प्रयत्नशील आहे. या योजनेंतर्गत रूग्णांना विनामूल्य आणि दर्जेदार उपचार मिळतात. मागील आर्थिक वर्षात केलेल्या कामकाजाचे राज्य स्तरावर मूल्यांकन करून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या रुग्णालयांचा गौरव दरवर्षी करण्यात येतो.

रुग्णालयात अपघातग्रस्त शस्त्रक्रिया, अस्थिरोग शस्त्रक्रिया, जळीत कक्ष उपचार आणि शस्त्रक्रिया, बाल अतिदक्षता विभागातील उपचार, जनरल सर्जरी, कान नाक घसा विभागाच्या शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभागातील विशेषज्ञ उपचार या सर्व विभागांनी उत्कृष्ट कामकाज करून या योजनेचा लाभ रुग्णांना दिला आहे.

या योजनेच्या यशस्वितेसाठी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे व संजय चौधरी, मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेचे नोडल अधिकारी डॉ. डॅनियल साजी, रुग्णालयातील सर्व विभागप्रमुख, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी अभिषेक पाटील संदीप माळी, तेजस वाघ, बापू पाटील, विशाल भारसके यांच्या एकत्रित प्रयत्नाने रुग्णांना विनामूल्य उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

अस्थिरोग शस्त्रक्रिया, नवजात बालकांवर उपचार, मेंदू विकारावरील शस्त्रक्रिया जळीत रुग्णांवरील उपचार या विभागामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे एकत्रित आयुष्यमान प्रधानमंत्री भारत योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनामध्ये रुग्ण समाविष्ट करून त्यांना नि:शुल्क लाभ देण्यात आला. यापुढेही जास्तीत जास्त रुग्णांना लाभ देण्यासाठी रुग्णालय प्रयत्नशील असतील.

– डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव.

Leave A Reply

Your email address will not be published.