प्रत्येक क्षेत्र “नॅनो टेक्नॉलॉजी”च्या कवेत : डॉ. श्रीराम सोनावणे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट (G. H. Raisoni Institute) ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्यावतीने नॅनो फ्लुइडस अ‍ॅन्ड इट्स एप्लिकेशनस इन इंजिनीअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या क्षेत्रातील तज्ज्ञ व विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतील प्रा. डॉ. श्रीराम सोनवणे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत रायसोनी महाविद्यालयाचे उपसंचालक व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा म्हणाले, नॅनो टेक्नॉलॉजी या अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाने पुढील 25 वर्षांत मानवी जीवनात अनेक बदल घडून येणार आहेत. गेल्या दीडशे वर्षांवर प्रथम भौतिकशास्त्र, मग रसायनशास्त्र, मग इलेक्ट्रॉनिक्स, मग संगणक आणि आता नॅनो टेक्नॉलॉजी या प्रत्येक शास्त्राचा समाजावर 30-40 वर्षे प्रभाव होता. अगदी एकेक अणू-रेणू जोडून अतिसूक्ष्म यंत्र बनवणं हे नॅनो तंत्रज्ञानाचं अंतिम उद्दिष्ट आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले. यानंतर आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात प्रा. डॉ. श्रीराम सोनवणे यांनी नमूद केले कि, मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल करणारा घटक म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी. जगातल्या प्रत्येक घटकाला नॅनो टेक्नॉलॉजीचा स्पर्श असेल. नॅनो याचा अर्थ मीटरचा एक अब्जांश भाग एखाद्या पदार्थाच्या अणुपरमाणूंच्या मांडणीचा विचार करून आपल्याला हव्या त्या गुणधर्माचे पदार्थ बनवण्याची क्षमता नॅनोटेक्नॉलॉजीचं तंत्रज्ञान देऊ शकते.

रेफ्रिजरेटरच्या अन्न टिकविण्याच्या प्रक्रियेत नॅनो टेक्नॉलॉजीचं योगदान महत्त्वाचं ठरणार आहे. संरक्षण खातं, ऊर्जा बचत, सोलार सेल यामध्येही हे तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे. नॅनो मेडिसिन, नॅनो रोबोट्स यांच्या सहाय्याने वैद्यकीय शास्त्रात आमूलाग्र बदल होत आहे आणि त्याचं दृष्य स्वरूप लवकरच पाहायला मिळेल. सिलिकॉन कार्बाइड नॅनोस्केल इलॅस्टोमरच्या वापरामुळे वाहनांच्या टायरची गुणवत्ता वाढवण्यास मदत होणार आहे. तसंच, सिलिकेटचं मिश्रण असलेल्या नॅनो मटेरियलचा वापर केलेल्या रंगांमुळे गाडीवर ओरखडे उठणं, रंग उडणं, पाणी आणि अॅसिडची प्रक्रिया होणं अशा समस्याही कायमच्या दूर होणार आहेत. नॅनोच्या मदतीने त्यापेक्षा कित्येक पटीने लहान ड्राइव्ह लवकरच तयार होणार आहे. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. प्रिया टेकवानी यांनी केले तर प्रा.जितेंद्र वडदकर, प्रा. स्वाती बाविस्कर, प्रा. शरयू बोंडे, प्रा. दिपक साखला आदींनी या कार्यक्रमाला सहकार्य केले. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.