थांबा ! मासिक पाळीत पेनकिलर घेताय? केंद्राचा गंभीर इशारा

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

थोडंही काही दुखलं खुपलं की आपण सर्रासपणे पेनकिलर घेतो, बऱ्याचदा तर ही पेनकिलर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतली जाते. पण याचा आपल्या आरोग्यावर काय विपरीत होईल याकडे कोणीच लक्ष देत नाही. सर्वात जास्त पेनकिलर म्हणून वापरलं जाणारी मेफ्टल स्पा प्रत्येक घरात असतेच. मात्र आता गोळीबाबत केंद्र सरकारने गंभीर इशारा दिला आहे.

मेफेनॅमिक अॅसिड-आधारित पेनकिलर मेफ्टल स्पाचा उपयोग संधिवात, हाडांचे रोग ऑस्टियोआर्थरायटिस, मुलींना होणाऱ्या मासिक पाळीतील वेदना, सूज, ताप आणि दातदुखी यावर उपचार करण्यासाठी केला जातो.

दुष्परिणामांचा सामना

भारतीय फार्माकोपिया कमिशनने मेफ्टल संदर्भात औषध आणि सुरक्षेबाबतचा इशारा दिला आहे. मेफ्टलमध्ये असलेलं मेफेनामिक अॅसिड आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते असे नमूद केले आहे. कालांतरानं या औषधामुळे गंभीर दुष्परिणामांचाही सामना करावा लागू शकतो. फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया (PVPI) डेटाबेसमधून मेफ्टलच्या दुष्परिणामांच्या प्राथमिक विश्लेषणात DRESS सिंड्रोम उघड झाला आहे.

कोणता सिंड्रोम होवू शकतो ? 

या पेनकिलरमुळे ड्रेस सिंड्रोम होवू शकतो. हा सिंड्रोम काही औषधांमुळे होणारी गंभीर अॅलर्जी आहे. त्यामुळे त्वचेवर लाल पुरळ उठतात, ताप येतो आणि लिम्फ नोड्स सुजतात. हे औषध घेतल्यानंतर दोन ते आठ आठवड्यांच्या दरम्यान ही अॅलर्जी होऊ शकते.

अहवाल द्या

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर, रुग्ण आणि ग्राहकांना मेफ्टल स्पा या औषधाच्या वापरानंतर जाणवणाऱ्या दुष्परिणामांच्या शक्यतांचं बारकाईनं निरीक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच औषध घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिसली तर तुम्ही वेबसाईट http://www.ipc.gov.in किंवा Android  मोबाईल अॅप ADR PvPI आणि PvPI हेल्पलाइनद्वारे एक फॉर्म भरू शकता आणि अंतर्गत तक्रार नोंदवू शकता. PvPI च्या राष्ट्रीय आयोग समन्वय केंद्राकडे प्रकरणाचा अहवाल द्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.