IPL 2022 चा थरार रंगणार 26 मार्चपासून..

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा 15वा हंगाम येत्या 26 मार्चपासून रंगणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय. अगोदर स्पर्धेचा उद्घाटन सामना 27 मार्च रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र बीसीसीआयने ब्रॉडकास्टरच्या मागणीनुसार 26 मार्च ही तारीख निश्चित केली.

आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी खुलासा केला, की यंदा स्पर्धा 26 मार्चपासून सुरू तर अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. यावेळी सामन्यादरम्यान प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे. साखळी फेरीदरम्यान याबाबतचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार घेतला जाईल. स्टेडियममध्ये 25 किंवा 50 टक्के प्रेक्षक उपस्थित असतील, असा अंदाज आहे.

गव्हर्निंग काऊन्सिलने आयपीएलची लीग फेरी महाराष्ट्रात होणार असल्याची पुष्टी केली आहे. त्यानुसार मुंबईत 55 आणि पुण्यात 15 सामने होणार आहेत. सर्व सामने केवळ 4 स्टेडियममध्ये खेळवले जातील. त्यामध्ये वानखेडे स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर 20 सामने, ब्रेबॉर्न स्टेडियमवर 15 सामने आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 15 सामने होतील. प्लेऑफचे सामने अहमदाबादमध्ये होऊ शकतात, मात्र यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

तर बीसीसीआयने सरावासाठी चार मैदाने निवडली आहेत. त्यानुसार मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील बीकेसी मैदान, दक्षिण मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डीवाय पाटील मैदान आणि कांदिवली किंवा ठाण्यातील एमसीए मैदानांचा विचार आहे. यासाठी सर्व संघांना ठराविक कालावधी देण्यात येईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.