अवैध शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांवर तत्काळ कारवाईचे आदेश…

0

 

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

जिल्हा प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन बुलढाणा (PTA) ने जिल्यातील मलकापूर, बुलढाणा, मेहकर, खामगाव तसेच इतर ठिकाणी अनुदानित, विना-अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळा / महाविद्यालयातील अवैध शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकांविरुद्ध पुराव्यानिशी बुलढाणा जिल्हाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली होती. ह्या तक्रारीची प्रशासनाने तत्काळ दखल घेतली असून शिक्षणाधिकाऱ्यांनी दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याचे पत्र संबंधित शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक / प्राचार्यांना पाठविले असुनसुद्धा अवैध शिकवणी धारक शिक्षकांवर काहीच परिणाम झाला नव्हता. हे तथाकथित शिक्षक स्वतःच्या घरी ५ तास शिकवणी वर्गात शिकवून पुन्हा शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिकवत असतील काय? जर हे शिक्षक इतके प्रभावी अध्यापन करीत असतील तर त्यांच्याच शाळेतील व वर्गातील विद्यार्थ्यांना बाहेर कोचिंग क्लास लावण्याची गरजच काय? असा प्रश्न अनेक पालक विचारीत आहेत.

काही शाळा महाविद्यालयांत तर दस्तुरखुद्द प्राचार्यच त्यांच्याच शाळेतील शिक्षकांना खाजगी शिकवणी घेण्यास प्रवृत्त करीत आहेत व त्यातून २०% कमिशन मागत आहेत. ह्या त्रासाला कंटाळून मलकापूर येथील एका नामांकित इंग्रजी शाळेतील एका पुरुष व महिला शिक्षकांनी राजीनामे दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

“धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसापूर्वी तथाकथित “पोस्टरबाज” प्राचार्यांच्या शाळेतील शारीरिक शिक्षकाने विद्यार्थ्याला आपल्याच शाळेतील शिक्षकांकडे शिकवणी लावण्यासाठी बेदम मारहाण केली. विद्यार्थ्यांने हा घडलेला प्रकार घरी पालकांना सांगितला असता पालक “त्या” शिक्षकाच्या घरी गेले व त्याला चांगलाच “मराठमोळा” दम दिला तेव्हा त्या शिक्षकाने हे कबूल केले की मला प्राचार्यांच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांना शिक्षा करावी लागते. ही अत्यंत घृणास्पद व निंदनीय बाब असून निष्पाप मुलांच्या भविष्यावर प्रश्न चिन्ह निर्माण करणारी आहे. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्राला गालबोट लावणाऱ्या अशा नराधम हेकेखोर प्राचार्यांना चांगली अद्दल घडविण्यासाठी अनेक पालक व विद्यार्थी आता समोर येत आहेत.”

आता जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशामुळे शिक्षण विभाग भ्रष्ट शिक्षकांवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.