आयआयटी मुंबई आणि विद्यापीठात सामंजस्य करार

0

जळगाव ;- आय.आय.टी. मुंबई आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या उन्नत महाराष्ट्र अभियान प्रकल्पाचा एक भाग असलेल्या ‘आपले प्रश्न आपले विज्ञान’ हा उपक्रम राबविण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि आय.आय.टी. मुंबई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. १३ डिसेंबर रोजी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, आय.आय.टी. मुंबईचे प्रा. मिलिंद सोहनी, डॉ. गोपाल चव्हाण, चिराग मराठे, शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. मनिषा इंदाणी, प्रा. समीर नारखेडे, डॉ. संतोष खिराडे आदी उपस्थित होते.

उन्नत महाराष्ट्र अभियान प्रकल्प राबविला जात असून त्याचाच एक भाग म्हणून ‘आपले प्रश्न, आपले विज्ञान’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात इंटर्नशिप महत्वाची आहे. या सामंजस्य करारान्वये आपल्या परिसरातील गावांच्या प्रश्नांचे विश्लेषण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे हा हेतू आहे. समाजातील प्रश्नांचा विश्लेषणात्मक पध्दतीने अभ्यास हा विद्यापीठ व महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांकरवी केला गेला तर प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी स्थानिक पातळीवर यंत्रणा निर्माण होवून त्यातून रोजगार निर्माण होवू शकतो. त्यासाठी तीन ते चार केस स्टडीचे विषय निवडून गावातील प्रश्न, शेती, उद्योग, वाहतूक आदी प्रश्नांचे सर्व्हेक्षण करणे त्याचा अहवाल संबंधित यंत्रणांना सादर करणे हे अपेक्षीत आहे.

या सामंजस्य करारान्वये विद्यापीठातील कार्यक्षेत्रातील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांमधील शिक्षकांना प्रारंभी प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी महाविद्यालयांना समन्वयक नेमावे लागतील. त्यानंतर‍ विद्यार्थ्यांमार्फत केस स्टडी केली जाईल. आय.आय.टी. मुंबईच्या तज्ज्ञांमार्फत शिक्षकांना ‘आपले प्रश्न, आपले विज्ञान’ चे मोड्युल्स आणि त्यावरी आधारित अभ्यासक्रमाची संरचना याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.