वातावरणात बदल पण उकाड्यापासून सुटका नाही

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या दोन दिवसांपासून दुपारनंतर ढगाळ वातावरण राहत आहे. दरम्यान शुक्रवार १३ मेपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे. अशातच गुरुवार १२ मे या कालावधीपर्यंत उष्णतेच्या लाटेचीही शक्यता आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, वातावरणात अचानक बदल झाल्याने दुपारनंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले होते. शहरात अगदी एक दोन ठिकाणी पावसाचे हलके थेंबही पडले. उन्हाचे असह्य चटके जाणवले व दुपारनंतर पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले. ढगाळ वातावरणामुळे प्रखर उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी वातावरणातील उष्णता कायम आहे.

आता शुक्रवार १३ तारखेपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात शुक्रवार १३ मे पर्यंत ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी पावसाचे थेंब पडण्याची शक्यता आहे. शनिवार १४ मे पासून उन्हाचा पारा कमी होऊ शकतो, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख व्यक्त करतात.

या वातावरणाच्या अनुषंगाने हळद, कांदा, भुईमूग व ज्वारी काढणी सुरू असलेल्या भागात पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. वातावरण बदलामुळे सर्वच त्रासले असून अनेकांच्या तब्बेतीच्या कुरबुरी सुरू आहेत. उन्हापासून बचावासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.