HDFC आणि HDFC BANK चे होणार विलीनीकरण !

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसी आणि सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँक यांचे विलीनीकरण होणार आहे. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या बोर्डांनी सोमवारी झालेल्या स्वतंत्र बैठकीमध्ये याला मंजुरी दिली.

सदर माहिती उघड होताच दोन्ही शेअरने जोरदार उसळी मारली आहे. HDFC चा शेअर कालच्या 2452.30 वरून थेट 2933.80 पर्यंत पोहोचला तर HDFC BANK शेअर कालच्या 1506 वरून 1722 वर पोहोचला. बोर्डाच्या बैठकीनंतर दोन्ही कंपन्यांनी स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली. पत्रकार परिषदेत विलीनीकरणाच्या अधिकृत घोषणेसोबतच इतर तपशीलही देता येतील. दुसरीकडे, ही बातमी समोर येताच दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजीत आला. सकाळी 10 वाजता बीएसईवर HDFC शेअर 13.60 टक्क्यांनी वाढला. त्याचप्रमाणे एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्येही सुमारे 10 टक्क्यांनी वाढ झाली.

दरम्यान दोन्ही कंपन्यांनी सांगितले की, या विलीनीकरणाला विविध नियामकांकडून मंजुरी मिळणे बाकी आहे. या विलीनीकरणासाठी, दोन्ही कंपन्यांना RBI, SEBI, CCI, नॅशनल हाऊसिंग बँक, IRDAI, PFRDA, NCLT, BSE, NSE इत्यादींकडून मान्यता घ्यावी लागेल. याशिवाय, दोन्ही कंपन्यांना त्यांच्या संबंधित भागधारक आणि कर्जदारांकडूनही मान्यता घ्यावी लागेल. सर्व आवश्यक मंजूरी मिळाल्यानंतर HDFC च्या सर्व उपकंपन्या आणि सहयोगी HDFC बँकेचा भाग बनतील.

कंपन्यांनी सांगितले की, ‘रेकॉर्ड डेटनुसार HDFC LIMITED भागधारकांना 2 रुपये फेस वॅल्यू असलेल्या 25 शेअर्सच्या बदल्यात 1 रुपया फेस वॅल्यू असलेले HDFC BANKचे 42 शेअर्स मिळतील. विलीनीकरणानंतर, HDFC बँक 100% सार्वजनिक भागधारक कंपनी बनेल. विलीनीकरणानंतर HDFC लिमिटेडची HDFC बँकेत 41 टक्के भागीदारी असेल.

विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेचे ग्राहक मोर्टगेजला कोअर प्रोडक्ट म्हणून वापरू शकतील. दोन्ही कंपन्यांच्या संचालकांना विश्वास आहे की हा करार ग्राहक, कर्मचारी आणि भागधारकांसह सर्व भागधारकांसाठी फायदेशीर ठरेल. या विलीनीकरणामुळे सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेला बळ मिळेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.