लोकशाही न्यूज नेटवर्क
भिवंडी शहरातील पूर्ववैमनस्यातून एका मुलाची हत्या करून मृतदेह काल्हेर येथील खाडीकिनारी निर्जनस्थळी गाडून पुरावा नष्ट केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोघं आरोपींना नारपोली पोलिसानी ताब्यात घेतले आहे. योगेश राऊ शर्मा असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.
सविस्तर माहितीनुसार, काल्हेर येथील आशापूर कॉम्प्लेक्स या भागात राहणार योगेश शर्मा याला २५ नोव्हेंबरला सायंकाळी काही मित्रांनी काल्हेर इथलं रेतीबंदर येथे मद्यपानासाठी येत असल्याचे सांगत तेथे चाखणा घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर योगेश घरातून गेला तो परत आलाच नाही, म्हणून कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तो सापडला नाही म्हणून नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी योगेश अल्पवयीन असल्याने अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
योगेशचा काही युवकांसोबत सहा महिन्यांपूर्वी वाद झाला होता. त्या पूर्ववैमनस्यातून त्याचे अपहरण झाले असल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे व्यक्त केला होता. पोलिसांनी ब्रह्मानंद नगर कामतघर परिसरातून आयुष्य वीरेंद्र झा (वय १९) व मनोज नारायण टोपे (वय १९) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता. त्यांनी योगेशची धारदार हत्याराने वार करून डोक्यात दगड मारून हत्या केल्याची कबुली दिली. त्याचा मृतदेह काळे रेतीबंदर येथील निर्जन गवताच्या ठिकाणी पुरून ठेवल्याचे सांगितले.
नारपोली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी आयुश विरेंद्र झा व मनोज नारायण टोपे यांना अटक केली आहे. या हत्येच्या गुन्ह्यात अजून चार जण असल्याचा संशय पाेलीसांना आहे.