हरतालिकेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये..

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

हिंदू धर्मात सण आणि व्रतांना विशेष महत्व आहे. या अनेक व्रतांपैकी हरितालिका व्रतालाही अत्यंत महत्त्व आहे.  भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतियेला हरितालिकेची पूजा केली जाते. हरतालिका व्रताचे महत्व, या व्रतामागची आख्यायिका, हरतालिका व्रत कोण करू शकतं, या दिवशी काय करावे आणि करू नये, व्रताच्या पूजेसाठी लागणारे साहित्य, पूजा कशी करावी, पूजा करतांना कोणती प्रार्थना करावी याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया..

हरतालिका व्रत कोण करू शकतं ? 

हरितालिका व्रत हे विवाहित,अविवाहित स्त्रिया करतात. हरितालिका व्रत केल्यास विवाहित महिलांच्या सर्व इच्छा पुर्ण होतात आणि त्यांच्या पतींना दीर्घायुष्य लाभते. संसारातील सारी विघ्ने दूर होतात. तर अविवाहित मुलींना योग्य जीवनसाथी मिळतो अशी मान्यता आहे.

हरतालिका व्रताचे महत्त्व ?

हरितालिकेचे व्रत हे सगळयात आधी देवी पार्वतीने महादेवांसाठी केले होते म्हणून हे व्रत अत्यंत खास व्रत मानले जाते. जी स्त्री हे व्रत करत असते तिच्यावर शंकर पार्वतीची विशेष कृपा दृष्टी असते, असे देखील ह्या व्रताबद्दल सांगितले जाते. हे व्रत करत असताना स्वत: देवी पार्वतीने अन्न आणि पाण्याचा त्याग केला होता म्हणून सर्व स्त्रिया देखील हे व्रत निर्जळी करतात. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांच्या मनोकामना हरितालिकेच्या क्रुपाशिर्वादाने पुर्ण होतात अशी मान्यता आहे.

हरतालिका व्रत म्हणजे काय ?

हतर म्हणजे हरण करणे व अलिका म्हणजे सखी. पार्वतीस शिवशंभू पती म्हणून हवे होते. पार्वतीच्या सखीने तिची इच्छा जाणली व तिला दूर अरण्यात घेऊन गेली. तिथे पार्वतीने कठोर तप केले, शंकराची मनोभावे आराधना केली व तिला भोलेनाथ प्रसन्न झाले मग तिने भोलेनाथांकडे जन्मोजन्मी तेच पती म्हणून लाभावेत असे वरदान मागितले व भोलेनाथांनी तिला जन्मोजन्मी पत्नी म्हणून स्वीकारले. सखीच्या मदतीने पार्वतीचे मनोरथ पुर्ण झाले म्हणून या व्रतास हरतालका व्रत म्हणतात.

हरतालिका पुजेसाठी साहित्य 

हरतालिकेच्या पूजेसाठी वाळू, बेल पत्र, शमी पत्र, आंब्याची पानं, पांढरी फुलं, वस्त्र, तसंच सोळा झाडांची प्रत्येकी १६ पानं पुजेसाठी फुलं, तसंच सौभाग्याचं साहित्य म्हणजेच बांगड्या, काजळ, कुंकू,  चंदन, तूप, तेल, कापूर, साखर, दुध, मध, दही म्हणजेच पंचामृत, चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तरफाया, विड्याची पाने, सुपार्‍या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी,आरसा इत्यादी वस्तू हरतालिका पूजेसाठी लागतात.

हरतालिका पुजनातील सोळा पत्री 

हरतालिकेच्या पूजेत बेल, आघाडा, मधुमालती, दूर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोतरा, जाई, मरवा, बकुळ, अशोकाची पाने या सोळा पत्री  वाहतात.

 हरतालिका पुजेची मांडणी 

– हरितालिकेच्या दिवशी स्त्रियांनी स्नान करून नवीन वस्त्र परिधान करावे.

– ज्या ठिकाणी पूजा करणार आहे ती जागा नीट स्वच्छ करून तिथे चौरंग ठेवावा. चौरंगाभोवती रांगोळी काढावी.

– चौरंगाच्या चारी कोनांना केळीचे खांब बांधावे. चौरंगावर स्वच्छ कापड अंथरावा, त्यावर वाळूपासून बनवलेले शिवलिंग व सखीसह पार्वतीची मुर्ती ठेवावी.

– डावीकडे थोड्या अक्षतांवर गणेशाचे प्रतिक म्हणून सुपारी ठेवावी.

– चौरंगावर देवीसमोर दोन पानांचा एक विडा असे पाच विडे ठेवावे. प्रत्येक विड्यात बदाम, अक्रोड, हळकुंड, सुकं खोबरं, नाणं ठेवावं.

हरतालिका पूजा कशी करावी ?

–  सर्वप्रथम स्वतःला हळदकुंकू लावावे.

– निरांजनास हळदीकुंकू, अक्षता,फुल वाहून त्याचे पूजन करावे.

– गणेशाचे प्रतिक म्हणून ठेवलेली सुपारी ताम्हणात ठेवावी. तिला पाण्याने स्नान घालावे  मग पंचाम्रुताने व पुन्हा पाण्याने अभिषेक करावा. हळद,कुंकू व फुलांच्या पाकळ्यांनी स्नान घालावे. परत पाण्याने स्नान घालून ती सुपारी अक्षतांवर होती तशी ठेवावी.

– सर्वप्रथम गणेशाचे प्रतिक म्हणून ठेवलेल्या या सुपारीचे पूजन करावे. त्यासाठी सुपारीला अष्टगंध लावावे.अक्षता वहाव्यात, जानवे घालावे, वस्त्र, फुल, दुर्वा, आघाडा वहावे. गणपतीसमोर दोन पानाचा विडा ठेवावा. त्यावर बदाम, अक्रोड, सुकं खोबरं, नाणं, हळकुंड ठेवावं. विड्यास हळदकुंकू, फुल वहावे. गणपतीस गुळखोबऱ्याचा नैवद्य अर्पण करावा. निरांजनाने श्रीगणेशास ओवाळावे व नमस्कार करावा.

– गौरी व तिच्या सखीच्या डोईवर गजरे माळावेत, कापसाची वस्त्रे, फुले वहावीत, आघाडा वहावा. दिव्याने देवींना ओवाळावे. नमस्कार करावा. देवीसमोर सौभाग्यवाण ठेवावे, त्यावर हळदकुंकू वहावे.

– शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंगास पाण्याचा अभिषेक करावा तद्नंतर पंचाम्रुताचा अभिषेक करावा. पिंडीवर गुलाल व बुक्का वहावयाचा. कापसाचं वस्त्र, अक्षता व बेलपत्र वहावे. श्वेतपुष्प वहावे. सोळा प्रकारच्या पत्री पिंडीवर वहाव्या व पिंडीला दिपाने ओवाळावे. धुप लावावा.

– पुढे मांडलेल्या पाचही विड्यांवर हळदकुंकू, अक्षता वहाव्यात, फुलं वहावीत.

–  हरितालिकेस फळं, पंचामृत व खडीसाखर यांचा नैवेद्य दाखवावा.

– हरितालिकेची कथा वाचावी. कथा वाचून झाल्यावर हरितालिकेची आरती म्हणावी व हरितालिकेस मनोभावे प्रार्थना करावी.

– यानंतर दिवसभर उपवास केला जातो. फलाहार करतात.  दुसऱ्या दिवशी स्नानादी कर्मे उरकून हरितालिकेची हळदकुंकू, फुले, अक्षता वाहून उत्तरपूजा करतात व त्यानंतर मुर्तीचे विसर्जन करतात.

हरतालिकेला कोणती प्रार्थना करावी ?

हरितालिकेकडे विवाहित स्त्रिया पतीला दिर्घायुष्य मिळावे, अखंड सौभाग्य लाभावे व हाच पती जन्मोजन्मी मिळावा अशी प्रार्थना करतात तर कुमारिका मनाजोगता वर प्राप्त होवो अशी हरितालिकेकडे प्रार्थना करतात. हरितालिका व्रत नवरा हयात नसलेल्या स्त्रियाही करतात.

हरतालिका व्रतामध्ये हे कामे अवश्य करावे

– हरतालिका व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी. मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते.

– हरतालिका व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी व्रताची कथा ऐकली पाहिजे. हरतालिका तीजचे व्रत उपवासाची कथा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते. या दिवशी महिलांनी एकत्र बसून देवीच्या भजनाचा जप करावा. असे केल्याने संपूर्ण वातावरण भक्तीमय बनते आणि त्याच वेळी एखाद्याला देवाचे आशीर्वाद मिळतात.

– श्रद्धेनुसार, या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी घरच्या पूजेच्या ठिकाणी दिवसभर दिवा लावावा. हा दिवा किमान २४ तास जळत ठेवला पाहिजे.

हरतालिका व्रताच्या दिवशी चुकूनही हे काम करू नका

– या दिवशी महिलांनी चुकूनही काळे कपडे घालू नयेत. पूजेमध्ये काळे कपडे घालणे चांगले मानले जात नाही.

– निर्जळी उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी चुकूनही पाणी पिऊ नये. तथापि, गर्भवती महिला आणि आजारी महिलांसाठी हा नियम मानला जात नाही.

– उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी झोपू नये. स्त्रियांनी झोपण्याऐवजी या दिवशी भजन आणि कीर्तनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

– महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात, म्हणून या दिवशी नवऱ्याशी कोणत्याही गोष्टीसाठी कधीही खोटे बोलू  नये.

 

Leave A Reply

Your email address will not be published.