गुरुविण ज्ञान नाही, गुरु सहवासे अज्ञान नाही..!

0

गुरूपौर्णिमा विशेष 

आज १३ जुलै बुधवार म्हणजे गुरूपौर्णिमा. गुरू अणि शिष्य यांच्यामधील पवित्र नात्याचा हा सण. एका प्रकारचा उत्सवाचा हा दिवस आहे. हा दिवस महान ऋषी मुनी महर्षी व्यास यांच्या आठवणीत साजरा केला जातो. म्हणुनच याला ‘व्यास पौर्णिमा’ असे देखील म्हटले जाते. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे एक प्राचीन काळापासून चालत असलेली परंपरा आहे.

महाभारतातल्या कथेमध्येही याचे विविध उल्लेख  आढळतात. तसेच बौद्ध इतिहासामध्ये पहिल्या धर्मोपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन सूत्राने संबोधिले जाते आणि पाच भिक्षूंना पंचवर्गीय भिक्षु म्हणून ओळखले जाते.  आषाढ पौर्णिमेच्या ज्या दिवशी बुद्धांनी पाच भिक्षुंना पहिला धर्मोपदेश दिला. तीच पौर्णिमा आज गुरुपौर्णिमेच्या नावाने प्रचलित आहे. आषाढ पौर्णिमा ही भारताप्रमाणे कंबोडिया, थायलंड, श्रीलंका, लाओस, म्यानमार सारख्या देशामंध्येही साजरी केली जाते.

महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिलेले महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक असा ग्रंथ. महाभारतात धर्मशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे.

महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते. महान ऋषि पराशर यांच्या सहवासात मत्सगंधा नावाच्या कुमारिकेला पुत्रप्राप्ती झाली. त्यांनाच आपण वेदव्यास या नावाने ओळखतो. मत्सगंधा नावाची कुमारिका पुढे हस्तिनापुर राज्याचे राजा शंतनु यांची पत्नी झाली. त्यांनाच आपण देवी सत्यवती या नावाने ओळखतो. देवी सत्यवतीला कौमार्यावस्थेत झालेला पुत्र म्हणजे व्यास. पुढे सत्यवती हस्तिनापूरची राणी झाली. हा पुत्र व्दैपायन नावाच्या बेटावर राहत असे त्यामुळे त्यांचे नाव कृष्ण व्दैपायन असे पडले. ऋषि पराशर यांचे पुत्र असल्यामुळे त्यांना पाराशर या नावाने सुद्धा ओळखले जाते.

महर्षी व्यास हे सर्व गुरूंचे गुरू होते. त्यांनी अठरा पुराण, श्रीमदभगवद्गीता, महाभारत यांसारख्या अमूल्य अश्या ग्रंथ संपदांचे लेखन केले; जे आजही अजरामर आहे. श्रीमदभगवद्गीता ही त्यांची साहित्यकृती जगप्रसिद्ध तर आहेच, मात्र या भगवद्गीतेत जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात असा विश्वास व्यक्त केला जातो. याच श्रीमदभगवद्गीतेच्या आधारे श्रीकृष्णाने अर्जुनाला रणभूमीवर गुरु म्हणून मार्गदर्शन केले आणि आपल्याच खल प्रवृत्तीने वाईट झालेल्या आप्तस्वकीयांविरुद्ध लढण्याचे बळ दिले.

व्यासपूजन करण्याच्या जोडीने व्यक्तीला जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या अश्या विविध गुरुजनांचे पूजन यादिवशी केले जाते. शाळा, महाविद्यालयातले शिक्षक, आध्यात्मिक गुरू, कला यात मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.

गुरू अणि शिष्य या दोघांचे नाते खुप पवित्र असते. जर आपणास जीवनात खुप यशस्वी व्हायचे असेल तर आपण एक चांगल्या गुरूचे मार्गदर्शन घेणे फार गरजेचे आहे, असे म्हटले जाते. यात शंका घेण्याचे काहीही कारण नाही. गुरू, शिक्षक हा तो व्यक्ती असतो जो स्वतः आहे तिथेच राहतो, पण आपल्या प्रत्येक शिष्याला यशाच्या उंच डोंगरावर घेऊन जात असतो. आपल्या शिष्याला जीवनात खुप यशस्वी झालेले पाहुन गुरूची मान अभिमानाने उंचावली जात असते.

गुरूला आज आपण देवाचा दर्जा दिला जातो. गुरूविना महान अणि मोठा झाला, असा एकही व्यक्ती आज आपणास ह्या जगात दिसुन येत नाही. कारण तोच आपल्याला योग्य तो मार्ग दाखवून, मार्गदर्शन करून आपल्या जीवनाला एक योग्य दिशा देत असतो. गुरूचे मार्गदर्शन हे प्रत्येकाच्या जीवनात महत्वाचे असते. गुरूशिवाय ज्ञान नाही. गुरूच आपल्याला ज्ञान प्रदान करून अज्ञानाचा सज्ञान बनवित असतो.

आपले गुरूच आपणास नेहमी खरे बोलावे अणि सत्याचा मार्ग अवलंबित करावा ही अनमोल शिकवण देत असतात. समाजामधील एक आदर्श नागरीक तसेच व्यक्ती बनवून आपल्या व्यक्तीमत्वाला आकार देत असतात. गुरूच तो व्यक्ती आहे जो आपल्या अंधकारमय जीवनाला ज्ञानाच्या प्रकाशात घेऊन जात असतो. गुरूच आहे जो दगडा प्रमाणे असलेल्या शिष्यास योग्य आकार देऊन त्याची मुर्ती साकारत असतो. म्हणुन आपल्या जीवनाला एक योग्य आकार, दिशा प्राप्त करून देणाऱ्या गुरूविषयी कृतज्ञता, आदर व्यक्त करण्यासाठी, त्यांचे मनापासुन आभार मानण्यासाठी, त्यांच्या समर्पणाचे कौतुक करण्यासाठी दरवर्षी गुरू पौर्णिमा साजरी केली जाते.

हिंदु धर्मीय लोक यादिवशी महर्षी व्यास यांची पुजा करतात तर बौदध धर्मात याचदिवशी गौतम बुदध यांच्या प्रतिमेची पुजा केली जात असते. गुरूपौर्णिमा हा तो दिवस आहे ज्या दिवशी प्रत्येक शिष्य आपल्या गुरूची भेट घेतो, त्यांचा आर्शिवाद प्राप्त करतो. आषाढ महिन्यामधला हा पौर्णिमेचा दिवस हिंदु धर्मीय वर्षातील खुप शुभ दिवस मानला जातो. गुरूपौर्णिमेला गुरूची उपासना केल्याने आपणास गुरूच्या दिक्षेचे पुर्ण फळ मिळत असते. याच दिवशी गुरूच्या नावाने काही जण दानपुण्य देखील करत असतात.

या विश्वात जन्म घेतल्यावर आपली पहिले गुरू आपली आई वडील असतात. आईच तिच्या गर्भात वाढत असताना आपल्यावर चांगले संस्कार करत असते. वडील आपले उदरभरण करतात. आपले आईवडीलच आपणास चांगले काय वाईट काय, याचे ज्ञान देत असतात. आपल्यावर उत्तम संस्कार करत असतात. मग हळुहळु आपण जसे मोठे होतो आपण शाळेत जाऊ लागतो, शिक्षण घेऊ लागतो तेव्हा तिथे शिक्षकाच्या रूपात आपल्याला आपला दुसरा गुरू मिळतो. जो आपल्याला साक्षर अणि सामर्थ्यवान ज्ञानसंपन्न बनवित एक कतृत्ववान अणि कर्तबगार व्यक्ती म्हणून घडवत असतो.

आपला तिसरा गुरू असतो आपलया जीवनातील अनुभव, जे आपल्याला जसजसे आपण मोठे होते तसतसे रोज काही ना काही शिकवत असतात. असं म्हटलं जातं की,  ‘अनुभवासारखा दुसरा गुरु नाही’. अनुभवाच्या आधारावर मोठी झालेली व्यक्ती ही अत्यंत वेगळी आणि विशेष अशी असते. याची आपल्याला समाजात वेळोवेळी प्रचिती येत असते.

गुरू शिष्याची आज अनेक महान आदर्श उदाहरणे आज आपण सांगु शकतो. यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरू राजमाता जिजाऊ, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, श्रेष्ठ गुरु समर्थ रामदास, यांचा उल्लेख वंदनीय असा आहे. प्राचीन गुरु परंपरेचा विचार करता शुर एकलव्याचे गुरू द्रोणाचार्य यांच्याबद्दल असलेले एकानिष्ठात्व विशेष असेच आहे. याच एकलव्याने द्रोणाचार्याची प्रतिमा डोळयासमोर ठेवुनच धनुर्विदया प्राप्त केली होती, आणि आपल्या गुरूला दक्षिणा म्हणुन आपला अंगठा काढुन दिला होता.

गुरु शिष्याच्या या वैश्विक आणि शाश्वत अशा नात्याला वंदन करून आपल्याला आयुष्याच्या वाटेवर यशस्वीतेसाठी घडवणाऱ्या गुरुबद्दल आत्मीयता  व ऋण व्यक्त करण्यासाठी ही गुरुपौर्णिमा विविध देशांमध्ये साजरी केली जाते. चला तर याही वर्षी आपण आपल्या आयुष्यातल्या विशेष अशा गुरुकुल्य व्यक्तींना स्मरून त्यांना मनोभावे वंदन करूया व आपली कृतज्ञता व्यक्त करून गुरुपौर्णिमा साजरी करूया.

शब्दांकन

राहुल पवार

उपसंपादक

लोकशाही, जळगाव.

Leave A Reply

Your email address will not be published.