गुलाबराव VS गुलाबराव

0

लोकशाही संपादकीय लेख 

 

आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले विद्यमान पाणीपुरवठा मंत्री व पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी पालकमंत्री आणि जिल्हा बँकेचे माजी चेअरमन गुलाबराव देवकर यांच्यात आतापासूनच जुगलबंदी सुरू झाली आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. दोघेही एकमेकांविरुद्ध बोलण्याची एकही संधी दवडत नाही. जळगाव तालुक्यातील भाजली येथे बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकरांवर टीका केली. त्यानंतर हा वाद उफाळून आला.

 

2013 मध्ये बहिणाबाई चौधरी स्मारकाच्या कामाला सुरुवात केली. तथापि गेल्या दहा वर्षात पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी काहीही केले नाही. आता झालेल्या डीपीडीसी बैठकीत बहिणाबाईंच्या स्मारकासाठी बारा कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा केली, ती केवळ आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून ही घोषणा करण्यात आली आहे, असा आरोप गुलाबराव देवकर यांनी केला आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या चार पंचवार्षिक कालावधीचा लेखाजोखा मांडून चार पंचवार्षिकच्या कालावधीत मतदारसंघात एक तरी ठोस काम केल्याचे दाखवून द्यावे, असे आवाहनही देवकर यांनी केले आहे. अवघ्या पाच वर्षाच्या कालावधीत धरणगाव रेल्वे उड्डाणपूल, गढोरे येथील गिरणेवरील पूल, आसोदा येथील बहिणाबाई स्मारक, जळगाव येथील भव्य असे संभाजी नाट्यगृह, धरणगावातील तलावाचे सुशोभीकरण याव्यतिरिक्त मतदार संघातील रस्त्यांची कामे केली आहेत. स्वतः गुलाबराव पाटील दोन पंचवार्षिक आमदार आणि दोन पंचवार्षिक मंत्री असताना धरणगाव पाळधी नशिराबादच्या पिण्याचे पाणी प्रश्न सोडवू शकले नाहीत. त्यांच्या जलजीवन मिशन मधील भ्रष्टाचार काढला तर पळता भुई थोडी होईल, असा सणसणीत आरोप गुलाबराव देवकरांनी मंत्री महोदयांवर केला. गुलाबराव पाटलांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने ते बेताल वक्तव्य करत आहेत, असा आरोपही माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केला.

 

एकंदरीतच आजी व माजी मंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगतोय. दोन्ही गुलाबराव पाटलांच्या प्रॉपर्टी संदर्भात चर्चा रंगू लागल्या आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कडे एवढी प्रॉपर्टी आली कुठून? दोघेही समोरासमोर बसून एकमेकांच्या प्रॉपर्टीचा हिशोब सादर करण्याचे आव्हान माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले आहे. एकंदरीत मतदारसंघातील विकासाच्या संदर्भात चर्चा होणे आवश्यक असताना विकास कामाला बगल देऊन वैयक्तिक उकाड्या पाकाड्या काढल्या जात आहे. त्यावरील चर्चेमध्ये मतदारसंघातील जनतेला काहीही स्वारस्य नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांना घेऊनच प्रचार होईल आणि विकासाच्या प्रश्नालाच मतदार प्राधान्य देतील. त्यामुळे आगामी निवडणूक पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार आहे.

 

जळगाव ग्रामीण मतदार संघातील ज्या गावांमध्ये गुलाबराव पाटलांना मतदान झाले नाही, त्या गावांसाठी जाणीवपूर्वक विकास निधी गुलाबराव पाटलांनी दिला नाही हा एक गंभीर आरोप देवकरांनी केला आहे. तसे असेल तर आगामी निवडणुकीत त्यांचे प्रतिबिंब उमटलेले दिसून येईल. बाकी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांचे अवैध धंद्यामध्ये हात गुंतलेले आहेत. अवैध वाळू, सट्टा, जुगार, अवैध दारू या अवैध धंद्यांचा गुलाबराव देवकरांनी स्पष्ट उल्लेख केला. हा आरोप सुद्धा गंभीर आहे. आतापासूनच अशा प्रकारच्या आरोप प्रत्यारोपामुळे ग्रामीण विधानसभा निवडणुकीला वर्ष बाकी आहे, त्या आधीच आतापासूनच चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ज्या काही विधानसभा निवडणुकीच्या लक्षवेधी लढती राहतील त्यात जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अग्रेसर राहणार आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.