गोराडखेडा येथे सर्पदंशाने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

तालुक्यातील गोराडखेडा येथील शेतकऱ्याचा शेतात गुरांना चारा टाकत असतांना विषारी सर्पाने चावा घेतल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास घडली असुन घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील यादवराव बळीराम पाटील (वय – ५०) हे दि. २३ सप्टेंबर रोजी दुपारी शेतात गुरांना चारा टाकण्यासाठी गेले होते. गुरांना चारा टाकत असतांना विषारी सर्पाने उजव्या पायाला चावा घेतला. दरम्यान यादवराव पाटील यांना काहीतरी चावल्याचे समजले. ते घरी आले असता त्यांना चक्कर येणे सुरू झाले. व त्यांची प्रकृती बिघडली. यादवराव पाटील यांना रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, असता वैद्यकीय अधिकारी यांनी यादवराव पाटील यांना मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक हरिष अहिरे हे करीत आहे. मयत यादवराव पाटील यांचे पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे.

पाचोरा तालुक्यात एकाच दिवशी तिघांना सर्पदंश झाला असुन गोराडखेडा येथील ५० वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असुन, जारगाव येथील रविंद्र भगवान निकम (वय – २९) यांना सर्पाने चावा घेतल्याने रविंद्र निकम यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यांचेवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तालुक्यातील सारोळा खु” येथील लोकेश जितेंद्र पाटील (वय – १३) हा शाळकरी मुलगा घराच्या जिन्यावर मोबाईल खेळत असतांना त्याच्या डाव्या हाताला सर्पाने चावा घेतला. लोकेश यास तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन, त्याची प्रकृती स्थिर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.