आ. किशोर आप्पा तुमचे चुकलेच

0

लोकशाही संपादकीय लेख

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील (Kishore Appa Patil) यांनी पाचोऱ्याचे पत्रकार संदीप महाजन यांना दूरध्वनीवरून केलेल्या अश्लील शिवीगाळ आणि धमकीचे कोणीही समर्थन करू शकत नाही. गोंडगाव (Gondgaon) येथील बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या झाली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेच्या निषेधार्थ भडगाव येथे निघालेल्या मूक मोर्चाचे वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पिढीतेच्या कुटुंबीयांना फोन करून सांत्वन केले. मुख्यमंत्र्यांचा हा फोन मूक मोर्चात सामील असलेल्या आमदार किशोर आप्पा यांच्या सुपुत्रांनी पीडितेच्या कुटुंबीयांना दिला. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला. संदीप महाजन यांनी त्यासंबंधीचे केलेले वृत्त विश्लेषण आमदार किशोर आप्पांना आवडले नाही. त्याचा आमदार किशोर आप्पांनी पत्रकार संदीप महाजन (Sandeep Mahajan) यांना दूरध्वनी करून संताप व्यक्त केला. आमदार किशोर आप्पांना संताप येणे समजू शकतो, परंतु तो संताप त्यांनी अत्यंत खालच्या पद्धतीने, अश्लील शिवीगाळ करून व्यक्त केला. त्या शिवीगायचे समर्थन होऊच शकत नाही. कारण त्या शिव्यांचा उल्लेख सुद्धा कोणी करू शकणार नाही. महिलांनी तर ते ऐकणे शक्य नाही. आपण पाचोरा बळगाव तालुक्यातील अडीच लाख मतदारांचे प्रतिनिधित्व करतो, याचा जणू त्यांना विसरच पडला होता. या अडीच लाख मतदारांपैकी निम्म्या महिला मतदार आहेत. तेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून वावरताना आपले व्यक्तिगत जीवन विसरले पाहिजे. आपण ज्यांचे प्रतिनिधित्व करतो त्या जनतेला आदर्श ठरेल असे आपले कृत्य असले पाहिजे. परंतु दूरध्वनीवर अश्लील शिव्यांची लाखोली वाहताना तुम्हाला काहीच भान राहिले नाही. तुमचा त्या पिडीत बालिकेच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचा हेतू जरी शुद्ध असला, तरी त्या अश्लील शिवीगाळातून तुमच्यातील दर्पोक्ती आणि अहम दिसून आला. ही तुमची दर्पोक्ती आणि अहम चुकीची आहे, असे हा संवाद ऐकणाऱ्या प्रत्येकाला वाटते यात शंका नाही. ही दर्पोक्ती आणि अहम याला राजकीय सत्ता कारणीभूत असल्याचे उघड उघड बोलले जातेय. बरे त्यानंतर दुसरे दिवशी पाचोऱ्यात आपण पत्रकारांशी बोलताना, “मी जे बोललो ते खरे आहे… याचा मी इन्कार करत नाही.. हीच भाषा योग्य आहे..” असे म्हणून आपण स्वतःच त्याचे समर्थन केले. त्याऐवजी ‘संतापाच्या भरात बोलायला नको ते बोललो..’ असे जरी म्हटले असते तरी ‘तुमच्या व्यक्तिगत सात्विक संताप’ त्यातून व्यक्त झाला म्हणून तुमच्या त्या संवादावर पडदा पडू शकला असता..

अश्लील शिवीगाळ करताना आपण पत्रकाराला दिलेल्या धमकीचा प्रत्यय लगेच दुसऱ्या दिवशी आला. पाचोरा शहरातील भर चौकात नगरपालिकेसमोर दुपारी पत्रकार महाजन याला ज्या पद्धतीने तीन गुंडांनी मारहाण केली, त्याचे कुणीही समर्थन करणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार आणि पत्रकार संघातर्फे त्याचा निषेध करून मारहाण करणाऱ्या गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. मारहाण करणारे हे आमदार किशोर आप्पा पाटलांचे समर्थक असल्याचे आरोप होत आहेत, जे सहाजिक आहे. या घटनेमुळे विरोधी पक्षांना सुद्धा तुमच्या विरोधात रान उठविण्यासाठी आयते कोलीत मिळाले. ते या घटनेचा निश्चितच फायदा घेतील, आणि ते या संधीचा लाभ घेत असतील तर त्यात चुकीचे काय? एकंदरीत सार्वजनिक जीवनात वावरताना संयम महत्त्वाचा असतो. आपल्या आमदारकीची ही दुसरी टर्म आहे. गेले दहा वर्षे आपण पाचोरा भडगावचे प्रतिनिधित्व करत आहात. तुम्हाला पाचोरा भडगाव तालुक्यातील जनता एका वेगळ्या नजरेतून पाहते. दहा वर्षाच्या राजकीय प्रवासात अनेक खाच खळगे आले असतील. राजकारणात आपण आपल्या भविष्याचा विचार करून निर्णय घेतात, त्याबद्दल कुणाला काहीही म्हणायचे नाही. तथापि आपल्या चरित्रावर शिंतोडे उडवले जातील, अशी कृती आपल्या हातून होऊ नये एवढीच एक लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची अपेक्षा असते. अशा या प्रकारामुळे तुम्ही केलेल्या अनेक सार्वजनिक हिताच्या कामांकडे दुर्लक्ष होते आणि आपल्या बाबतीत चुकीची चर्चा होते. त्यामुळे पत्रकाराच्या संदर्भातील अश्लील संवादावर सर्वत्र चर्चा होत आहे. तेच चुकीचे झाले, असे आम्हाला वाटते. तुर्त एवढेच…!

Leave A Reply

Your email address will not be published.