बेंबीच्या पुर्नरचनेची जोखीम पत्करुन नवजात शिशुला मिळाले जीवदान

0

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दुर्मिळ पेटंट युरॅकसची शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

जन्मत:च शिशुच्या बेंबीतून पोटातील आतडे आणि मुत्राशयाची पिशवी बाहेर आल्याने शिशुच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. अशा परिस्थीतीत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील तज्ञ बालशल्यचिकीत्सकांनी अनुभवाच्या जोरावर नवजात शिशुवर अत्यंत दुर्मिळ असलेली पेटंट युरॅकसची शस्त्रक्रिया यशस्वी केली.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय सशक्त माता सुदृढ बालक हे ब्रीद घेऊन काम करीत आहे. त्यामुळे रूग्णालयात प्रसुतीसाठी दाखल होणार्या माता आणि शिशुची काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली जाते. गत आठवड्यात भुसावळ येथील एका महिलेने गोंडस शिशुला जन्म दिला. हा आनंदाचा क्षण मात्र काही तासांपुरताच राहिला. कारण जन्मलेल्या नवजात शिशुच्या नाभिकेतून पोटातील आतडे आणि मुत्राशयाची पिशवी बाहेर आली होती. ही परिस्थीती लक्षात घेता बालशल्यचिकीत्सक डॉ. मिलींद जोशी यांनी शिशुची तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात तब्बल दीड तास नवजात बालशल्यचिकीत्सक डॉ. मिलींद जोशी आणि निवासी डॉ. श्रीयश सोनवणे यांनी शिशुवर पेटंट युरॅकस ही दुर्मिळ शस्त्रक्र्रिया यशस्वी केली. या शस्त्रक्रियेदरम्यान नवजात शिशुच्या नाभिकेतून बाहेर आलेले आतडे आणि मुत्राशयाची पिशवी सुयोग्यरित्या आत टाकण्यात आली.

त्यानंतर नवजात शिशुच्या नाभिकेची पुर्नरचना करण्यात आल्याने शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. नवजात शिशुवर केलेली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने मातापित्यांच्या जीवनात पुन्हा आनंदाचा क्षण परतला.

जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी ठरली – डॉ. श्रीयश सोनवणे
नवजात शिशुच्या नाभिकेतून बाहेर आलेली आतडे ह्याचे प्रमाण लाखामध्ये दहा असे आहे. अशी बालके अत्यंत दुर्मिळ आढळतात. अशा नवजात शिशुंवर शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे असते. मात्र ही जोखीम पत्करून भुसावळच्या नवजात शिशुवर ही पेटंट युरॅकसची शस्त्रक्रिया यशस्वी ठरली.
– डॉ. श्रीयस सोनवणे, निवासी डॉक्टर.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.