जेवणासाठी आलेल्या किशोर सोनवणेचा खून

पोलिसांकडून चार संशयितांना अटक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरातील कालिका माता मंदिर परिसरात हॉटेल भानू येथे बुधवारी किशोर सोनवणे या तरुणाच्या खून प्रकरणात शनिपेठ पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली आहे तर इतर आरोपींच्या मागावर पथके रवाना करण्यात आली आहे. अशोक श्रावण सोनवणे (वय 60 रा. प्रबोधन नगर हॉटेल साई पॅलेसच्या मागे जळगाव) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी दहाच्या सुमारास किशोर याचा मित्र अमोल सोनार उर्फ गम्प्या याचा फोन आला. हॉटेल भानू कालिका माता मंदिराजवळ किशोरला काही जणांनी मारहाण केली आहे आणि त्यात तो बेशुद्ध झालेला आहे. त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे घेऊन जात आहे, असे त्याने फोनवर सांगितले.

बुधवारी रात्री आठ वाजता अमोल सोनार यांच्या घराजवळ किशोर सोनवणे आणि त्याचे पाच ते सहा मित्र हे गप्पा मारत उभे होते. त्यावेळेला त्यांनी हॉटेल भानू येथे जेवायला जाण्याबाबत प्लान बनवला. रात्री नऊ वाजता ते हॉटेल भानू येथे जेवणासाठी गेले. थोड्या वेळात किशोर सोनवणे याला कोणाचातरी फोन आला. फोन घेऊन तो बाहेर गेला. बाहेर एका चायनीजच्या गाडीवरील रुपेश काकडे नामक तरुणाचा त्याच्याशी वाद झाला. अमोल सोनार आणि त्यांच्या मित्रांनी तो वाद सोडवून त्याला पुन्हा हॉटेल भानू येथे घेऊन आले. तेथे जेवण करत असताना दहा ते अकरा जण तिथे आले. किशोर सोनवणे याच्यावर धारदार शस्त्राने आणि लोखंडी दांड्याने मारहाण केली आणि तिथून पळून गेले. अमोल सोनार व त्यांच्या मित्रांनी पाहिले तर किशोर सोनवणे बेशुद्ध झाला होता. त्याला उचलून तातडीने त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले. तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले होते. त्यानंतर किशोरचे वडील अशोक सोनवणे यांनी शनिपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.

आरोपींना झाली अटक

संशयित आरोपी रुपेश मनोहर सोनार, निलेश उर्फ लोमेश युवराज सपकाळे, आकाश युवराज सपकाळे, मयूर विनोद कोळी, ईश्वर सुभाष काकडे, रुपेश सुभाष काकडे (सर्व राहणार मोहन टॉकीज परिसर, आसोदा रोड, जळगाव), दुर्लभ कोळी (सुनसगाव, ता.जळगाव) आणि अमोल छगन सोनवणे (श्रीराम कॉलनी, जळगाव) यांच्यासह अनोळखी तीन इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिपेठ पोलिसांनी आणि एलसीबी पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. यामध्ये चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रशांत सुभाष काकडे (वय 30) रुपेश सुभाष काकडे (वय 27) ईश्वर सुभाष काकडे (वय 23) आणि मयूर विनोद कोळी (वय 21) यांना अटक करण्यात आलेली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.