गांधी रिसर्च फाऊंडेशनची ग्राम संवाद सायकल यात्रा

0

एक लाख विद्यार्थी, नागरिकांशी संवाद ; 25 रोजी शेवटची संधी

लोकशाही न्यूज नेटवर्क
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने दि. ३० जानेवारी ते ११ फेब्रुवारी कालखंडात दरवर्षीप्रमाणे महात्मा गांधी पुण्यतिथीला गांधी विचार प्रचार-प्रसारासाठी भव्य अशा “ग्राम संवाद सायकल यात्रे”चे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा गांधीतीर्थ जळगाव येथून निघून वावडदा – म्हसावद – उमरडे – एरंडोल – मंगरुळ – पारोळा – देवगाव – तामसवाडी – शिंदी – गुढे – बाळद – मेहुणबारे – करगाव – चाळीसगाव – वाघळी – नगरदेवळा – बहाळ – पाचोरा – वरखेडी – शेंदुर्णी – लोहारा – विटणेर – शिरसोली मार्गाने परत गांधीतीर्थ जळगाव येथे पोहोचणार आहे.

ही यात्रा जळगाव जिल्ह्याच्या जळगाव, एरंडोल, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर तालुक्यातून सुमारे ३५० किमीचा प्रवास करणार आहे. मार्गावरील २० शाळा व ५ महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम, तसेच मुक्कामाच्या गावी जाहीर कार्यक्रम, मार्गावरील लहान खेड्यांमध्ये सायकल फेरी करीत जवळपास एक लाख लोकांपर्यंत महात्मा गांधी व राष्ट्रीय विचारांचा प्रचार-प्रसाराचे संयोजकांचा मानस आहे.

स्थानिक घटकांनाही या यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. यात्रेच्या मार्गावरील गावात सायकल यात्रेचे स्वागत, स्थानिक पातळीवर रात्री गावकऱ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन, सकाळी गावात प्रभात फेरीचे आयोजन आदी माध्यमातून हा सहभाग नोंदविता येणार आहे. तसेच सहभागी स्वयंसेवकांचा नाश्ता, दुपारचे व संध्याकाळचे जेवण आदी विषयातही आपण आपला सहभाग नोंदविता येणार आहे.

आज उद्या सहभाग नोंदविण्याची शेवटची संधी

विविध महाविद्यालयातील एनएसएसचे स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट, विद्यार्थी-विद्यार्थिनी व नागरिक या ग्राम संवाद यात्रेत सहभागी होऊ शकणार आहे. त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून सहभाग नोंदविण्याची उद्या, बुधवार (दि. २५ जानेवारी) अंतिम मुदत आहे. संपूर्ण १३ दिवस सायकल चालवून सहभाग देऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी सुधीर पाटील (९८२३३६२३३०) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.