जी. एच. रायसोनीच्या विद्यार्थ्यांची कळसुबाई शिखर मोहिम फत्ते

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या १९० विद्यार्थ्यांनी कळसूबाई हे तब्बल ५ हजार ४०० मीटरचे शिखर सर करीत वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे. दहा तासांच्या मोहिमेत या विद्यार्थ्यांनी कळसुबाई शिखर सर करण्याबरोबरच परतीचा प्रवास पूर्ण करत त्यांच्या शारीरिक क्षमतेचा परिचय करून दिला. या मोहिमेत विद्यार्थ्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, ‘भारत माता की जय’, वंदे मातरमच्या जयघोषात मोहिम फत्ते केली. तसेच शिखरावर चढता चढता ठिकठिकाणी स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी ऑलम्पिक विजेते खेळाडू, सीमेवर लढणारे जवान व शास्त्रज्ञाच्या कार्याला सलाम करत त्यांना मोहीम समर्पित केली. महाराष्ट्रात कळसूबाई शिखराचे गिर्यारोहकांच्या दृष्टीने आगळेवेगळे महत्त्व आहे. गिर्यारोहणाच्या अनेक मोठ्या मोहिमांपूर्वी गिर्यारोहक कळसूबाई सर करण्याचा सराव करतात. अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणारे हे शिखर चढण्यापूर्वी अनेक दिवस सराव करावा लागतो. जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रा. योगिता पाटील, प्रा. रफिक शेख, प्रा. विनोद महाजन, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. श्रिया कोगटा, प्रा. रोहित साळुंखे, प्रा. करिष्मा चौधरी व प्रकाश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कळसुबाईची मोहिम यशस्वीपणे पूर्ण केली. तसेच विद्यार्थ्यांनी ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याने त्यांचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी अभिनंदन केले.

कडाक्याच्या थंडीत मोहिम फत्ते

कळसूबाई शिखर चढण्याचा अनुभव थरारक होता. खास गिर्यारोहकांची वाट म्हणून ओळखली जाणारी बारी या रस्त्याद्वारे मोहिमेला सुरुवात झाली. सकाळी ९.३० ते १० वाजताच्या सुमारास चढाईला सुरुवात झाली. दुपारी २.३० वाजेच्या सुमारास कळसूबाईच्या मोहिमेवर त्यांनी फत्ते मिळविली. रात्री दहा वाजेपर्यंत ते खाली परतले. यावेळी टीम कम्युनिकेशन, नेटवर्किंगची भूमिका, जोखीम घेणे, जागेवरच निर्णय घेणे, रणनीती तयार करणे, क्षमता मॅपिंग, आव्हान हाताळणे, वेळेचे व्यवस्थापन, शिस्तीचे महत्त्व, ऐकण्याच्या कौशल्यांचे महत्त्व, कम्फर्ट झोन तोडणे, शारीरिक मर्यादांवर मानसिक ताकद असणे यासारख्या विविध बाबी विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्या असे प्रा. योगिता पाटील यांनी सांगितले. या मोहिमेदरम्यान मोठ्याप्रमाणात थंडी होती. परतीच्या वेळी दाट अंधार होता. मात्र विद्यार्थ्यांनी कुठेही न डगमगता ही मोहिम यशस्वीपणे पार केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.