युवकांचे मानसशास्त्र… मैत्री

0

लोकशाही, विशेष लेख

 

वेगवेगळ्या इंग्रजी डिक्शनरीच्या संदर्भा नुसार मैत्री म्हणजे दोन व्यक्तींमधील संबंध होय. मानसशास्त्रानुसार दोन किंवा त्यापेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्तींमध्ये परस्पर मानसिक, भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक यांसारख्या विषयांना धरून निरंतर चालणारी व्यक्तींमधील अंतरक्रिया म्हणजे ‘मैत्री’ होय. मैत्रीचा (Friendship) भाव हा रक्ताच्या नात्यांइतका किंवा त्यापेक्षा काही वेळेला श्रेष्ठ असा ठरत असतो. एका कवीने मैत्रीची माहती सांगताना वर्णन केले आहे की, “मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख अडवायला उंबराऱ्या सारखा… का उगा हिंडतो देव शोधायला मित्र आहे समोर देवासारखा…” असं म्हटल आहे. मैत्री बाबत अनेक बोधकथा आहेत. मित्राच्या संदर्भात नेहमी भगवान श्रीकृष्ण आणि सुदामाचे उदाहरण सातत्याने सांगितले जाते. समाज मनात त्याबाबत गप्पा रंगतात.

युवकांची ‘मैत्री’ हा खरा तर आजच्या लिखाणाचा विषय आहे. चांगले मित्र मैत्रीण असणे ही बाब कित्येक वेळा धन, संपत्ती पेक्षा श्रेष्ठ ठरलेली आहे. युवकांचा तो चांगल्या व्यक्तिमत्त्वाचा मित्र-मैत्रिणी हा पैलू आहे. ज्यावेळी आपल्या व्यक्तीमत्त्वांमध्ये एकापेक्षा अधिक गुण हे दुसऱ्या व्यक्तींसोबत मिळता जुळता. त्यावेळी मित्र समूह, गट हे तयार होतात. कुठल्याही दोन व्यक्तींमधील परस्पर संवादातून गप्पा गोष्टींमधून मैत्री ही फुलाच्या सुगंधासारखी बहरत जाते. युवा अवस्थेतील मित्र आणि मैत्रिणी यांच्या माध्यमातून आत्मप्रकटीकरण करतात. भविष्याची स्वप्न एकमेकांच्या संवादातून सहवासातून रंगवितात. चांगले मित्र हे आपल्या मित्राला त्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी सतत प्रोत्साहन देतात.

मित्राला त्याच्या जीवनातील उद्दिष्ट निश्चिती बाबत त्याला ते साध्य होईल म्हणून मदत करतात. त्याच्यासाठी वेळ प्रसंगी भांडतात. मित्र मैत्रिणींना काटा टोचल्यावर वेदना या त्याच्या खऱ्या मित्रांना होतात. इतकं सुंदर हे मैत्रीचं नातं आणि आठवणी असतात. या आठवणी या चिरकाल, अंतरीक, आनंददायी आणि हास्य कारंजाचे फवारे निर्माण करणारे असतात. सहज म्हणून हा लेख वाचत असताना आपल्या मित्र-मैत्रिणींच्या आपल्या सभोवताली असणाऱ्या व्यक्तींना आठवणी सांगा. मग बघा आपल्याला आज किती आनंद मिळतो. तो अनुभवा मित्र मैत्रिणींच्या आठवणी सांगणं, ऐकणं हे आरोग्यासाठीच उत्तम टॉनिक आहे असं मानसशास्त्रज्ञ (Psychologist) सांगतात.

मैत्री विषयावर लिहीत असतानाला शब्दांना मर्यादा राहत नाही. परंतु या ठिकाणी लेखाच्या माध्यमातून विषय हाताळताना निश्चितपणे मर्यादा येतात. भारतीय चित्रपट सृष्टीत अनेक चित्रपट हे मैत्रीच्या विषयावर निर्माण झाले आहेत. अनेक गाणी गीतकारांनी लिहिली आहेत. गायली आहेत. त्यात शोले (Sholay) चित्रपटांमधील छम छम करत नाचणारी बसंती, अमिताभ (Amitabh Bachchan) आणि धर्मेंद्र (Dharmendra) यांचे सोबत असलेले गाणे “ये दोस्ती हम नही तोडेंगे तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे….” हे गाणं प्रत्येकाच्या स्मरणात राहिलेलं आहे. सौदागर चित्रपटामधील “ए राजू चल विरू.. असं म्हणत बंद गाडीला धक्का देत “इमली का बुटा बेरी का बेर, इमली खट्टी मीठे बेर, इस जंगल मे हम दो शेर …” असं गाणं गात जीवनाचा मुक्त आनंद घेणारे दोन मित्र. अशा मित्र-मैत्रिणींच्या कितीतरी जोड्या आपल्या सभोवताली आढळतात. लेखक आपल्या सर्व वाचकांचा मित्र म्हणून हे दोन चित्रपट आपण सर्वजण आवर्जून एकदा बघाच, असं सुचवत आहे.

युवा अवस्थेतील मित्र आणि मैत्रिणींची भूमिका ही प्रत्येक व्यक्तीसाठी एखाद्या शिल्पकारासारखी असते. काही वेळेला चुकीच्या मैत्रीमुळे युवा अवस्था ही पुढील युवकांचे जीवन हे पार उध्वस्त करणारे असते. त्यात स्वतः बरोबर आपल्या सोबत असणाऱ्या मित्राला वाईट व्यसनांच्या सवयी लावणे, समाज मान्य कायद्याचे उल्लंघन करायला शिकवणे, त्यासाठी मित्राला प्रोत्साहन देणे, आमिष देणे अशी वृत्ती असणाऱ्या जवळील व्यक्ती हा मित्र नसून त्याच्या शत्रूपेक्षा कितीतरी पटीने विध्वंसक आहे. त्यासाठी मित्राची निवड त्याचे वर्तन, संवाद, यावर पालक, शिक्षक, समाजातील जवळ असणाऱ्या व्यक्तींचे निरंतर निरीक्षण मार्गदर्शन, संवाद असणे फायदेशीर ठरतात.

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना अधिक मैत्रिणी असल्याचे सामाजिक संशोधनांमध्ये दिसते. स्त्रिया या भावनांची अदान प्रदान पुरुषांपेक्षा अधिक वेगात करतात. अंतर्मुख असणाऱ्या व्यक्तीमत्त्वात बोटावर मोजण्याइतके मित्र असतात. तर बहिर्मुख असणाऱ्या व्यक्तिमत्वाकडे मित्राचा मैत्रिणींचा खजिनाच असतो. त्यात मग नेते, समाजसेवक, कलाकार, अधिकारी, वकील, अभिनेते, अभिनेत्री यांचा समावेश या व्यक्ती मध्येअसतो.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr Babasaheb Ambedkar) खरा एकनिष्ठ प्रामाणिक मित्र हे पुस्तके ग्रंथालय होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तकांवर प्रेयसी प्रमाणे प्रेम करायचे. त्याचप्रमाणे झाडे, वृक्ष, वेली हे व्यक्तीचे सर्वात निस्वार्थ मित्र आहे. त्यांना फक्त देणंच माहित आहे, घेणं माहीतच नाही. झाडांवर व्यक्तीने कुऱ्हाडीने कितीही वार जरी केले तरी झाड हे काही फळे, सावली, सुगंध, हवा देणे त्या व्यक्तीला थांबवत नाही. म्हणून मित्र असावा तो झाडासारखा. अलीकडील काळात समाज व्यवस्थेमध्ये व्यक्तींच्या मैत्रीपेक्षा आपला वेळ घालवण्यासाठी, आनंद प्राप्तीसाठी पाळीव प्राण्यांशी व्यक्तींचे मोठ्या प्रमाणात मैत्रीचे, जिव्हाळ्याचे नाते निर्माण होत असल्याचे दिसत आहे. त्याचे चांगले परिणामही दिसतात. म्हणून पर्यावरणप्रेमी, पुस्तकप्रेमी बना. त्यांच्या सोबत जास्तीत जास्त मैत्री करा…

प्रो. डॉ. आशिष एस. जाधव/बडगुजर.
पंकज कला वरिष्ठ महाविद्यालय, चोपडा.
संपर्क : 9373681376

Leave A Reply

Your email address will not be published.