आत्मसन्मान, आत्मविश्वास व आत्मनिर्भरता

0

लोकशाही, विशेष लेख

 

स्वतःची स्वतःविषयी असणारी सन्मानाची भावना (Feelings) म्हणजे आत्मसन्मान. प्रत्येकाजवळ असणारे निसर्गदत्त गुण व अवगुण हे जन्मतःच प्रत्येकाजवळ असतात. अवगुणांची बाजू सोडली तर सद्गुणांची पारख आपली आपल्यालाच हवी. आपल्यातील गुण ओळखणे ते जोपासण्यासोबतच वृद्धिंगत करणे यासाठी आत्मसन्मानाची गरज असते. कारण त्यामुळेच आपण “स्व”चा शोध घेण्यास सुरुवात करतो आणि याचगुणाच्या जोरावर आपण काही करू शकतो.

ही भावना आपल्यात तयार होते ती केवळ आणि केवळ आत्मसन्मानाने. म्हणून ‘स्वतः स्वतः चा शोध घेणे’ हे पहिले पाऊल ठरेल. हा शोध घेताना आपण जे काही करतो आहे त्यावर विश्वास असणे गरजेचे ठरते. येथेच आत्मविश्वासाचा शोध लागतो आणि आत्मविश्वासाचा अविष्कार आपल्याला इतरांपेक्षा काही वेगळं करण्याची प्रेरणा देतो. इतरांवर अवलंबून राहिल्यास स्वतःचे विश्लेषण यॊग्य रीतीने होत नाही, कारण इतरांना आपण काय आहे हे कळते. मात्र फार कमी लोक त्याबद्दल आपल्याला अवगत करवतात. इतर फक्त नकारात्मकतेचाच जप करतात. जेणेकरून आपला आत्मसम्मान हा राखला जाणार नाही त्यामुळे आपल्यातही नकारात्मक भावना तयार होते. हाच त्यांचा उद्देश असतो. म्हणून आपला आत्मसम्मान सर्वप्रथम आपणच करायला शिकले पाहिजे.

कुठल्याही स्थितीत आपला आत्मविश्वास ढळणार नाही यांची काळजी घेतली पाहिजे. काही लोक आपल्यातील दुर्गुणांवर बोट ठेवतील, पण त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघणे योग्य ठरेल. आपल्यातील दुर्गुणांवर आपणच काम करून त्याचे रूपांतर सद्गुणात कसे करता येईल, या दिशेने आपल्या कामाचीही दिशा असावी. पण जर आत्मसन्मान आणि त्यासोबतच आत्मविश्वास नसेल तर आपण इतरांसोबतच वाहवत जाण्याची शक्यता जास्त असून ते सर्वात जास्त धोकेदायक असते. म्हणून प्रत्येक वेळी आपला आत्मसन्मान व त्याचबरोबर आत्मविश्वास देखील कायम राहील याची काळजी आपणच घ्यावी.

आपणच आपले सर्वाधिक चांगले निरीक्षक व जज आहोत हे लक्षात ठेवावे आणि जर यात आपण चुकलो तर मग नाइलाजाने इतरांवर अवलंबून राहावे लागेल, म्हणून म्हटले आहे “तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलाशी”. आत्मसन्मानाने जगा व मोठे व्हा हे सूत्र लक्षात घ्यावे आणि या सूत्राने काम केल्यास आपण आत्मनिर्भर होऊ शकतो. आपली इतरांवरची अवलंबून राहण्याची आवश्यकता संपलेली असते. ही आत्मनिर्भरताच खरं महत्वाची आहे. हे खऱ्या व्यक्तीच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतात कारण ते आतून म्हणजे “स्व” ने विकसित केलेले असतात. आतून होणारी प्रगती शाश्वत असते त्यामुळे ती दीर्घकाळ टिकते म्हणून बाह्य स्रोतांपेक्षा आतला स्रोतच अधिक महत्वाचा असतो. कारण तो चिरकालाचा साथीदार असतो.

प्रा. नितीन मटकरी
जळगाव
मो.नं . ९३२६७७८३२९

Leave A Reply

Your email address will not be published.