“तण व्यवस्थापन”- तणनाशकांची ओळख

0

लोकशाही, विशेष लेख

 

“तण” म्हणजे शेतकऱ्यांच्या शत्रू म्हणून ओळखले जाते.तणांच्या प्रादुर्भावामुळे मुख्य पिकास अपाय होऊन उत्पन्नात लक्षणीय अशी घट होत असते.उत्पन्नात घट होण्याचे कारण की पिकास आवश्यक असलेली अन्नद्रव्ये पिकास पुरवठा होण्याआधीच तण शोषून घेतात.यासोबतच विविध पिकांच्या वाढीस देखील ते स्पर्धक ठरतात. तण नियंत्रण नसलेल्या जमिनीतील कस कमी होऊन कालांतराने पडीक जमीन नापीक होते.यामुळे तण नियंत्रण हा विषय महत्वाच्या मानला जातो.

तण नियंत्रणासाठी प्रतिबंधक उपाय

१) शेतात सेंद्रिय खत जसे शेणखत वापरत असतांना ते १०० टक्के कुजलेले असावे याची खात्री करावी.
२) शेतात पेरणीपूर्वी बांधावरील तण संपूर्णपणे नष्ट करावेत.
३) पेरणीसाठी वापरायचे बियाणे तण विरहित असावे.
४) पीक फेरपालट (क्रॉप रोटेशन) करून घेतले तणांच्या प्रादुर्भाव कमी जाणवतो.
५) मुख्य पिकासोबत आंतरपिके घेतल्यास त्याचाही तण नियंत्रणात हातभार लागतो.
६) शेताच्या योग्य मशागतीने तण नियंत्रण शक्य आहे.

तण नियंत्रणासाठी रासायनिक तणनाशके –

प्रतिबंधात्मक उपाययोजना करून तण काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकते परंतु त्यावर पूर्णपणे आळा घालणं शक्य नसल्याने आज बाजारात जवळपास सर्वच पिकांमधील तण व्यवस्थापनकरिता रासायनिक तणनाशके बाजारात उपलब्ध आहे.वेगवेगळ्या पिकांनुसार विविध तणनाशके वापरली जातात.त्यातील काही तणनाशकांबद्दल सदर लेखात आपण माहिती घेऊयात…
१) एट्राझिन – हे तणनाशक विविध धान्य पिक तसेच ऊस पिकात वापरले जाते.हे तणनाशक पोस्ट इमर्जेंट असून उभ्या पिकांत फवारणी केले जाऊ शकते.
सुयोग्य पिके – मका,ऊस,ज्वारी, बाजरा आदी
२) ग्लायफोसेट (ग्लायसेल) – ग्लायफोसेट तणनाशक मोकळ्या शेतात तसेच बांधावरील तण व्यवस्थापनसाठी शेतकरी वापरतात.कापूस पिकांत देखील काळजीपूर्वक फवारणी करत याच्या मोठ्या प्रमाणात वापर होतो.
३) २-४ डी – हे तणनाशक तृणधान्याच्या पिकांतील वार्षिक तसेच बहुवार्षिक तणांच्या नाश करते.इतर तणनाशकांचा तुलनेत ते स्वस्त असून जनावरांना यापासून इजा होत नाही.परंतु फवारणी करत असताना कापूस पिकांवर हे थोड्या प्रमाणात देखील उडणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे कारण कापूस पिकास यापासून इजा होण्याची दाट शक्यता असते.लव्हाळा सारख्या बहुवार्षिक तणांच्या नियंत्रणाकरिता देखील याच्या वापर होतो.
सुयोग्य पिके – गहू, भात, ऊस, मका, ज्वारी, बाजरी
४) पेंडामेथीलिन – हे तणनाशक “प्री-इमर्जेंट” म्हणजेच पिकांच्या “पेरणीपूर्वी” वापरायचे असून ते तण प्रतिबंधक म्हणून ओळखले जाते.कापूस उभ्या पिकात कोणतेही तणनाशक फवारणी करता येत नसल्याने शेतकरी कापूस लागवडीपूर्वी याची शेतात फवारणी करत असतात ज्याने ३० ते ४५ दिवस तण उगवत नाही.
सुयोग्य पिके – कापूस,कांदा आदी
५) सोडियम एसीफ्लुरोन + क्लोडीनफोप (पटेला) – सदर तण नाशक देखील पोस्ट इमर्जेट असून उभ्या पिकांत वापरता येते.मुख्यतः सोयाबीन पिकांत याच्या वापर होतो.”पटेला” म्हणून हे तणनाशक शेतकरी वर्गात प्रचलित आहे.
सुयोग्य पिके – भुईमूग,सोयाबीन,मुंग आदी
६) मेट्रीबुझिन – सदर तणनाशक विशेषतः गहू पिकासाठी असून इतर पिकांत याच्या वापर होत नाही.रुंद तसेच अरुंद पानांच्या तण व्यवस्थापनसाठी याच्या वापर होतो.
७) प्रोपेक्वीझेलफोप(सोसायटी) – सदर तणनाशक निवडक असून मुख्यतः कांदा पिकात वापरले जाते.याच्या फवारणीने गवतवर्गीय तणनियंत्रण शक्य आहे.हे तणनाशक इंडोफिल कंपनीचे सोसायटी म्हणून शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहे.
८) ऑक्सीफ्लुरोफेन (गोल)- सदर तणनाशक देखील कांदा पिकातील रुंद पानांच्या तण व्यवस्थापनासाठी फवारले जाते.हे तणनाशक अतिशय प्रभावी असून यासोबत झिंक वापरल्यास पिकाला याच्या ताण बसत नाही.

तणनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी –

१) तणनाशक फवारणी करत असताना जमिनीत ओलावा असणे अत्यंत महत्त्वपूर्ण असते त्याशिवाय कोणत्याही तणनाशकाच्या प्रभाव जाणवत नाही.
२) तणनाशक फवारणी करतांना त्याची मात्रा योग्य असावी जास्त झाल्यास पिकास देखील अपाय होऊ शकतो.
३) योग्य त्या पिकांवर तेच संबंधित तणनाशक वापरणे जिक्रीचे आहे.
४) मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत ते प्रभावी ठरत नाही.
५) ग्लायफोसेट सारखे बिन निवडक तणनाशक फवारणी केल्यानंतर २१ दिवसांपर्यंत मशागत करू नये.
६) उभ्या पिकांत फवारणी करतांना योग्य ती काळजी घ्यावी हुडच्या वापर करावा
७) कांदा पिकांत तणनाशक वापरतांना चिलेटेड झिंक वापरावे.

परेश दिलीप पालीवाल
संचालक – श्री नाटेश्र्वर कृषी सेवा केंद्र, लासूर
मो.८३७८०९६३०३

Leave A Reply

Your email address will not be published.