एक दिवसाचे बाळ घरी अन् आई गेली देवा घरी

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथे विखरण रोडलगत आशाबाई उर्फ स्वाती ऋषिकेश मराठे (वय २१) या विवाहितेची एका खाजगी रुग्णालयात शुक्रवारी दुपारी तिची प्रस्तुती झाली. तिने बाळाला जन्म दिला. त्याचा आनंद ती घेत असताना अवघ्या २४ तासात तिची प्रकृती खालावली व तिला ऑक्सिजन लावून जळगावला पुढील उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यूने तिला आलिंगन दिले.

नवजात अर्भक घरी असून आईची वाट पाहत आहे. जणू आपली आई केव्हा परत येईल याची त्या बालकाला प्रतीक्षा तर नसेल ना ? पण अवघ्या एक दिवसाच्या बालकाला जन्म मृत्यूचा खेळ कसा समजणार ? एकीकडे बाळाच्या जन्माचा कुटुंबाला झालेला आनंद तर त्याचवेळी स्वातीचे झालेल्या आकस्मित निधन अशी द्विधा स्थिती निर्माण झाल्यामुळे मराठे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.

स्वाती मराठे यांचे माहेर व सासर एरंडोल येथील आहे. तिला दिवस गेल्यापासून घरामध्ये आनंदाचे वातावरण होते. आपल्या वंशाला दिवा मिळेल असे स्वप्न तिच्या पतीसह सासू-सासरे  पाहत होते, त्यांचे स्वप्न खरेही ठरले. परंतु नियतीने वेगळाच डाव खेळला. बाळाला पाहून आईचा आनंद गगनात मावत नव्हता.  कुटुंबात देखील आनंदी वातावरण निर्माण झाले मात्र शनिवारी दुपारी तिची प्रकृती अचानक बिघडली आणि बाळाला जन्म दिल्याचा आनंद अवघ्या २० ते २२ तासापर्यंतच तिला लाभला.

Leave A Reply

Your email address will not be published.