निवडणुकीतून माघारी बद्दल एकनाथ खडसेंवर टीकास्त्र..!

0

लोकशाही संपादकीय लेख  

 

रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तर्फे माजी मंत्री एकनाथ खडसे हे उमेदवार असतील, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले होते. स्वतः एकनाथ खडसेंनी सुद्धा २०२४ ची रावेर लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे लढविणार असे घोषित केले होते. तथापि प्रकृतीच्या कारणावरून डॉक्टरांनी निवडणूक लढविण्यास मनाई केल्याने रावेर लोकसभा निवडणुकीत आपण उमेदवार राहणार नाही, असे एकनाथ खडसेंनी जाहीर केले आणि दुसऱ्याच दिवशी भाजपची जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभेसाठी यादी जाहीर झाली. त्यात जळगाव साठी स्मिता वाघ व रावेरसाठी खासदार रक्षा खडसे यांची नावे जाहीर झाली. हा योगायोग असला तरी ‘नाथाभाऊंना भाजपच्या दिल्लीश्वरांनी तंबी दिल्यामुळे ते निवडणुकीत माघार घेत आहेत’. अशा प्रकारच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले. त्यातच रक्षा खडसेविरुद्ध एडवोकेट रोहिणी खडसेंना उमेदवारी द्यावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली.

तथापि रोहिणी खडसेंची इच्छा विधानसभा निवडणूक लढवण्याची असल्याने एडवोकेट रोहिणी खडसे सुद्धा भावजाईविरुद्ध निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले. ऐनवेळी खडसे कुटुंब निवडणुकीतून माघार घेतल्याने माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी एकनाथ खडसेंच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करून लवकरच नवीन सक्षम उमेदवार रावेर लोकसभा मतदार संघातून दिला जाईल, असे जाहीर केले. दरम्यान जळगाव जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी नाथाभाऊंवर टीकास्त्र सोडले आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस कडून मिळालेल्या आमदारकीचा राजीनामा देऊन आमदार म्हणून निवडून येऊन दाखवावे. नाथाभाऊ अडचणीत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना मदत केली. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत असताना ते निवडणूक रिंगणातून पळ काढत आहेत,”. असा आरोप संजय पवारांनी केला.

बारामती मध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद भाऊजाई मध्ये सामना होतो, तर रावेरमध्ये ननंद भावजई मध्ये सामना का होऊ नये? त्यातून खडसे परिवाराने माघार का घ्यावी? असा आरोपही संजय पवारांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नाथाभाऊंनी ‘गद्दार’ असा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना संजय पवारांनी नाथाभाऊंवर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर काल एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारावर माझ्या संदर्भात तसे कन्या एडवोकेट रोहिणी खडसेंवर गैरसमजातून आरोप केले असा खुलासा केला. तसेच “राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) जिल्हाध्यक्ष यांच्या टीकेला उत्तर देऊन त्याची दखल घेण्याइतपत तो मोठा नेता नाही. वारंवार दलबदल करणाऱ्याच्या मताला मी किंमत देत नाही. आमच्या पॅनल मधून निवडून आला असताना जिल्हा बँकेत गद्दारी करून अध्यक्ष पद घेतलेला संजय पवार हा गल्लीतला नेता आहे. मागच्या दाराने पदे मिळवणाऱ्या संजय पवारांनी एकातरी पब्लिक निवडणुकीतून निवडून दाखवावे.” असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला. “हे लोक मला विचारणारे कोण? पक्षाच्या नेत्यांना उत्तर द्यायला मी बांधील आहे.” असेही नाथाभाऊंनी स्पष्ट केले.

एकंदरीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतून स्वतः नाथाभाऊ तसेच कन्या एडवोकेट रोहिणी खर्च यांच्या माघारी बद्दल नाथाभाऊंना टार्गेट केले जात आहे. तिकडे मुक्ताईनगरचे शिंदे शिवसेना समर्थक अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी खासदार रक्षा खडसेंना भाजपने उमेदवारी दिल्याबद्दल महायुती विरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. ‘अनेक पक्ष एक कुटुंब’ असा स्वार्थ खडसे कुटुंबियांचा असल्याचे सांगून रक्षा खडसेंच्या विरोधात सासरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे कशा पद्धतीने प्रचार करतील ते पाहून आपण तशाच प्रकारचा प्रचार करू’, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी महायुती सरकारला दिला आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या विरोधात स्वकीयंबरोबर विरोधक सुद्धा टिकेची झोड उठवत आहेत हे विशेष.

एकनाथ खडसे कुटुंबीयांवरील १३७ कोटी रुपये गौण खनिज प्रकरणी मालमत्ता जप्तींमध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सवलत दिल्याचे बोलले जात आहे. त्याच्या बदल्यात तुम्ही रावेर लोकसभा निवडणुकीत गप्प बसा, असा इशारा दिला. त्यामुळे ते निवडणूक निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा समाजात सर्वत्र असल्याचा आरोप खुद्द डॉ. सतीश पाटलांनी केला. त्यामुळे या निवडणुकीत रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात नाथाभाऊ कितपत हिहीरीने भाग घेऊ शकतात, हे प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात दिसून येईल. अन्यथा आरोग्याच्या कारणावरून निवडणूक प्रचारातही ते अलिप्त राहू शकतात…!

Leave A Reply

Your email address will not be published.