गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपाने “अबकी बार ४०० पार” असा नारा दिला आहे. उमेदवारांची पहिली १९५ जणांची यादी जाहीर झाली असून दुसरी यादी रविवारी जाहीर होणार होईल. महाराष्ट्रात ४८ लोकसभेच्या जागांपैकी भाजप ३२ जागा लढविण्यावर ठाम आहे. ११ जागा शिंदे शिवसेनेला आणि ५ जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याबाबत विचार विनिमय सुरू आहे. अद्याप महाराष्ट्रातील भाजपची यादी जाहीर झाली नसली तरी, भाजप तर्फे जागांबाबत उमेदवार कोण असतील यावर श्रेष्ठींमध्ये विचार विनिमय सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप कसलाही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नाही, म्हणून हमखास निवडून येणारा उमेदवारच देण्याचा भाजपचा प्रयत्न राहील. जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या लोकसभा मतदार संघात हमखास निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या शोधात भाजप प्रयत्नशील आहे. जळगाव रावेर या दोन्ही मतदार संघात २०१९ साली भाजपचे दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले असले, तरी या दोन्ही ठिकाणच्या उमेदवारांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत. दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांबाबत संभ्रम आहे. दोन्ही ठिकाणचे उमेदवार बदलणार असा, सूर आहे.

 

नुकतेच ५ मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जळगाव येथे युवकांच्या मेळाव्यात लोकसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले असले, तरी जळगाव रावेर उमेदवारी बाबत कसलेही सुतवाच त्यांनी केले नाही. निरीक्षक म्हणून आमदार दरेकर आणि हंसराज अहिर यांनी दौरा करून मतदार संघातील मतदारांचा कौल कसा आहे, याचा आढावा घेतला. दोन्ही मतदार संघात निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या नावांचीही चर्चा झाली. परंतु ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी “पक्षाने आदेश दिला तर मी लोकसभा निवडणूक लढवेल. . !” असे वक्तव्य काल केल्याने जळगाव जिल्ह्यात सर्वच पक्षात खळबळ उडाली आहे. गिरीश महाजन हे भाजपचे संकट मोचक म्हणून ओळखले जातात. आतापर्यंत लोकसभा निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा नसल्याचे वारंवार ते बोलले होते. परंतु काल चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी “गिरीश भाऊ खासदार होतील की आमदार. . !” असे व्यासपीठावरून भाषणात वक्तव्य केले आणि एकच हशा पिकला. परंतु “माझे आणि गिरीश भाऊंचे मैत्रीचे संबंध असल्याने मी विनोदाने हे बोललो. . ” अशी सारवासारव गुलाबरावांनी केली. पत्रकारांनी गिरीश महाजन यांना घेरले. तेव्हा ते म्हटले, “मला पक्षाने विचारले नाही. तथापि पक्ष जो आदेश देईल, तो मला मान्य राहील. . !” असे सकारात्मक वक्तव्य गिरीश भाऊंनी केले. त्यातच रावेर लोकसभेची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची मानले जाते. म्हणून ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असलेल्या उमेदवारांवर भाजपतर्फे उमेदवार दिला जाईल यात शंका नाही.

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यातर्फे एकनाथ खडसे यांचे नाव महाविकास आघाडीतर्फे जवळजवळ निश्चित झाले आहे. विद्यमान भाजप खासदार रक्षा खडसे एकनाथ खडसे यांच्या सून असल्यामुळे रक्षा खडसे विरुद्ध एकनाथराव खडसे यांच्यातील लढाईत कदाचित एकनाथ खडसे हे बाजी मारू शकतात. म्हणून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे नाव चर्चेत आले असण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. गिरीश महाजन विरुद्ध एकनाथ खडसे यांच्यात ही निवडणूक झाली, तर भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांचे रावेर लोकसभा मतदारसंघातील वर्चस्व सर्वश्रुत आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंना गिरीश महाजनांच्या विरुद्ध निवडणूक लढविणे सोपे नाही. म्हणून गिरीश महाजन यांनी पक्षाने आदेश दिला तर तो आदेश मला मान्य राहील, असं वक्तव्य केल्याचे दिसून येते. गिरीश महाजन विरुद्ध एकनाथ खडसे यांच्यातील सामना चांगलाच रंगणार आहे. गिरीश महाजनांचे नाव लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत येताच जिल्ह्यात खडबड उडाली आहे. परंतु अद्याप अधिकृत नावांची यादी जाहीर होणार आहे. गिरीश महाजन निवडणूक लढवणार नसतील, तर निवडून येणाऱ्या उमेदवारांचे नाव गिरीश महाजन सुचवतील. त्या नावावर पक्षश्रेष्ठी शिक्कामोर्तब करतील आणि निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा गिरीश महाजन यांच्यावर टाकतील. . पाहूया जळगाव रावेरसाठी भाजपचे अधिकृत उमेदवार कोण असतील. . . !

Leave A Reply

Your email address will not be published.