गिरणा परिक्रमेला पक्ष संवर्धनाची किनार

0

1 जानेवारी 2022 पासून भाजपचे जळगाव लोकसभा मतदारसंघातील खासदार उन्मेश पाटील यांचे नेतृत्वात गिरणा नदीच्या संवर्धनासाठी गिरणा परिक्रमा सुरू झाली आहे. 2022 या नवीन वर्षात गिरणा नदीच्या संवर्धनासाठी खा. उन्मेश पाटल यांनी गिरणा नदीकाठावरून परिक्रमा करून जनप्रबोधन करणाऱ्या संकल्प केल्याचे जाहीर केले. जळगाव जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेली गिरणा नदी वाचवण्यासाठी गिरणा नदीकाठावरून 300 कि.मी.ची परिक्रमा करण्याचे जाहीर केले. तसेच गिरणा परिक्रमा ही एका भाजप पक्षाची नसून त्यात कोणीही सहभागी होऊ शकतात असे खा. उन्मेश पाटलांनी जाहीर केले असले तरी अगदी परिक्रमा शुभारंभाच्या कार्यक्रमापासून तिला पक्षीय स्वरूपाचे लेबल लागले. त्यानंतर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी गिरणा काठावरून दररोज 20 ते 25 कि.मी. पायी प्रवास करून गिरणा काठावरील गावातील ग्रामस्थांशी संवाद साधून चर्चा करण्यात येणार असे स्वरूप राहील असे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात राजकीय स्वरूप निर्माण झालेले दिसत आहे.

गिरणा नदीच्या संवर्धनासाठी ही परिक्रमा आहे की भाजपच्या संवर्धनासाठी प्रचार यात्रा आहे? असा प्रश्‍न उभा राहतो. महाराष्ट्रातील आताच्या महाविकास आघाडीच्या सरकारने गिरणा नदीतील अमाप वाळू उपशाने गिरणेचे वाळवंट बनविले असा आरोप खा. उन्मेश पाटलांनी करून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला. परंतु अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रात भाजप – सेना युतीचे सरकार सत्तेवर होते. त्यांच्या पाच वर्षाच्या सत्तेच्या कालावधीत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचेच होते. त्यामुळे भाजपच्या पाच वर्षाच्या कालावधीत गिरणा नदीतील वाळू उपसा झाला नाही का? भाजप सुध्दा गिरणा नदीचे वाळवंट करण्यात सहभागी नाही का? त्यामुळे गिरणा नदीच्या आगामी काळातील संवर्धनासाठी प्रामाणिक परिक्रमा असली तर प्रथम एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करणे बंद झाले पाहिजे. कारण सर्वच राजकीय पक्ष धुतल्या तांदळासारखे नाहीत. सर्वच पक्षात वाळू माफिया पोसले जातात. वाळू माफियांचा पैसा बोलतो आणि त्यांच्या पैशांसाठी वाळू माफियांना सर्वच पक्षाकडून आश्रय दिला जातो हे कटूसत्य आहे.

खा. उन्मेश पाटील यांना याची कल्पना नाही असे म्हणता येणार नाही. कारण पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी खा. उन्मेश पाटलांवर लगेच पलटवार करून वाळू माफिया चेतन शर्मा कोण आहे याची खा. उन्मेश पाटलांना माहिती नाही काय? त्यामुळे गिरणा नदीच्या संवर्धनासाठी असलेल्या परिक्रमेतून खरोखरच गिरणेचे संवर्धन व्हायचे असेल तर गिरणा परिक्रमा ही राजकीय व्यासपीठ बनता कामा नये. परंतु गिरणा परिक्रमाला भाजप या पक्षाचे लेबल लागल्याचे दिसून येते. कारण यातून गिरणा काठच्या गावात जाऊन भाजपचा प्रचार – प्रसार केल्याचे लेबल लागल्याचे दिसून येते.

शिवसेनेतून भाजपत प्रवेश केलेले जळके येथील हभप ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर यांनी परिक्रमा यात्रेत पालकमंत्र्यांवर जी टीका केली ती अशोभनीय म्हणता येईल. गिरणा परिक्रमा यात्रेत भाजपचे मोजके कार्यकर्ते सहभागी आहेत. खा. उन्मेश पाटील म्हणतात हे राजकीय व्यासपीठ नाही. तथापि या परिक्रमेत सहभागी झालेले पूर्वाश्रमीचे शिवसेना पक्षात असलेले आणि आता भाजपत प्रवेश केलेले हभप ज्ञानेश्‍वर महराज जळकेकर यांनी आपली भावना व्यक्त करतांना हे जरी राजकीय व्यासपीठ नसले तरी उन्मेश पाटलांना मच्छर म्हणणाऱ्या पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे माजलेले रक्त काढण्याची भविष्यात वेळ आलेली आहे, अशा प्रकारे वक्तव्य गिरणा नदी संवर्धनाच्या परिक्रमा यात्रेला पोषक ठरणारे आहे की मारक? याचा विचार या परिक्रमेचे नेतृत्व करणारे खा. उन्मेश पाटलांनी विचारात घेण्याची गरज आहे.

शिवसेना पक्षात गुलाबरावांनी हभप जळकेकर महाराजांना किंमत दिली नाही अथवा त्यांचे विचार पटले नाहीत म्हणून भाजपत प्रवेश करणाऱ्या जळकेकर महाराज परिक्रमाच्या व्यासपीठावर दुरूपयोग करताहेत हे खा. उन्मेश पाटलांनी लक्षात घेऊन यावर वेळीच प्रतिबंध घातला नाही तर परिक्रमा ही चांगली संकल्पना बदनाम होईल. खा. उन्मेश पाटलांचा जो चांगला हेतु आहे त्याला गालबोट लागेल. शुभारंभापासून परिक्रमा वादग्रस्त ठरलेले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या परिक्रमेतून काही निष्पन्न होईल याची शाश्‍वती कमी आहे. कारण गिरणेवरील प्रलंबित बलून बंधाऱ्यांचा प्रश्‍न कुणामुळे केवळ महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला दोष देऊन चालणार नाही, अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रात भाजप – सेनेचीच पाच वर्षे सत्ता होती.

जलसंपदा मंत्री भाजपचेच होते. त्यांनीच बलून बंधाऱ्यांची घोषणा केली. परंतु घोषणेच्या पलिकडे त्याला मूर्त स्वरूप आलेले नाही. त्यामुळे राजकारणाच्या पलिकडे जाऊन गिरणा नदीच्या संवर्धनासाठी परिक्रमात विचार केला गेला तरच परिक्रमा यशस्वी होईल. अन्यथा परिक्रमाच्या नावाखाली राजकीय व्यासपीठाचा उपयोग करून आपला कंड शमविण्याचा प्रकार जळकेकर महाराजांसारख्या तथाकथित अध्यात्मिक नेते म्हणविणाऱ्यांकडून केला जाईल. हाती काहीही लागणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.